‘लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी सर्वात मौल्यवान’; सिने-नाट्य दिग्दर्शक, केदार शिंदे

‘लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी सर्वात मौल्यवान’; सिने-नाट्य दिग्दर्शक, केदार शिंदेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे: “माझे आजोबा शाहीर कृष्णराव साबळे हे माझे दैवत आहेत. त्यांची लोककलेवरची निष्ठा, त्यांची दमदार शाहीरी, सामाजिक जागृतीचे थोर कर्तृत्वं, तेजस्वी व्यक्तीमत्त्वं यांचा माझ्यावर खोल प्रभाव आहे. त्यांच्या सहवासात लहानचा मोठं होताना त्यांचा सगळा जीवन प्रवास आणि कलाप्रवास मी जवळून पाहिला. यामुळे त्यांच्याविषयी मनात सदैव नितांत आदराची भावना होती. त्याच्या कलेचा वारदार म्हणून आणि त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची पुढच्या अनेक पिढ्यांना माहिती व्हावी यासाठी त्यांच्या जीवनपटाची निर्मिती हे माझे स्वप्नं होते.

‘महाराष्ट्र शाहीर’ हा फक्त एक सिनेमा नाही, तर तो माझ्यासाठी एक ऐतिहासिक दस्तऐवजाईतका मौल्यवान आहे. म्हणूनच या जीवनपटाला ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहे” अशा भावपूर्ण शब्दात लोकप्रिय सिने-नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन, ललित कला केंद्र, गुरुकुल आणि मिती फिल्म क्लब यांनी संयुक्तपणे श्री. केदारजी शिंदे यांना “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” पुरस्कार प्रदान व जाहीर सत्कार असा समारंभ आयोजित केला होता. रू.5000/-रोख, शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह- सावित्रीबाई फुले यांचा पुतळा आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे श्री. रविंद्र शिंगणापूरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त, उद्योजक श्री. अनिल रावसाहेब सौंदडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला शाहीर हेमंतराजे मावळे व सहकारी यांनी महाराष्ट्रगीत आणि आण्णाभाऊ साठे लिखीत सुप्रसिध्द “माझी मैना गावाकडे राहीली” हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डाॅ. सुनिल भंडगे यांनी केले. ललितकला केंद्राचे प्रमुख मा. प्रा. डॉ. प्रविण भोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात केदार शिंदे यांची प्रकट मुलाखत घेऊन पत्रकार अमृता खाकुर्डीकर आणि शाहीर हेमंत मावळे यांनी केदार शिंदे यांना बोलते केले. या संवादात बालपणच्या आठवणींपासून शाहीरी परंपरा ते नाट्य चित्रपट सृष्टीतील यशस्वी कारकीर्द अशा अनेक विषयांना स्पर्श करून केदार शिंदे यांनी उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधला.
शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती बाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रांजळ उत्तर दिले. ते म्हणाले, ” मला नक्कीच चित्रपट करायला आवडेल. पण,आण्णाभाऊंचे कार्यकर्तृत्वं, त्यांचे विपुल साहित्य आणि संघर्षमय जीवन यावर चित्रपट करणे ही सोपी गोष्ट नाही. त्या जीवनपटाचे गांभीर्य आणि सखोलता जपणे हे शिवधनुष्य आहे. याशिवाय, सध्या माझ्या हातात असलेले नाट्यसिने क्षेत्रातले प्रकल्प पूर्ण होईपर्यंत लगेच तरी हे शक्य होणार नाही. तरीही आपल्या सगळ्यांच्या आग्रहाची विनंती बघता मी यावर नक्कीच विचार करीन..” सध्या अतिशय गाजत असलेला “बाईपण भारी देवा” हा त्यांचा चित्रपट, रिॲलीटी शोचे वास्तव, सध्याच्या काळात समाज माध्यमांचे माजलेले स्तोम डिजिटल माध्यमांचा गैरवापर अशा विषयावर उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आण्णाभाऊ साठे पुरस्कार समितीचे सर्व सदस्य, विद्यापीठाचे विविध पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles