“पाहिजे जातीचे” विविध भाषिकांनी एकत्र येऊन निर्माण केला – एक मराठी सिनेमा; उमा कुलकर्णी

“पाहिजे जातीचे” विविध भाषिकांनी एकत्र येऊन निर्माण केला – एक मराठी सिनेमा; उमा कुलकर्णीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुलाखतकार: अमृता खाकुर्डीकर, पुणे

“पाहिजे जातीचे” या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या मराठी सिनेमाचे लेखन प्रसिध्द अनुवादक, लेखिका उमा कुलकर्णी यांनी केले असून हा सिनेमा दि. 4 ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याच्या बातम्याही येत आहेत. नामवंत नाट्यलेखक विजय तेंडुलकर यांच्या “पाहिजे जातीचे” नाटकावर आधारीत या सिनेमा निमित्त सिनेमाचे संहिता लेखन, नाटकाचे माध्यमांतर, माध्यमांसाठी लेखन या सर्व गोष्टी उमाताईंकडून जाणून घेताना अनेक गोष्टी उलगडत गेल्या.

आजपर्यंत कानडीचे श्रेष्ठ लेखक शिवराम कारंथ यांचे साहित्य मराठीत आणल्याचे श्रेय उमाताईंकडे जाते. गिरीश कर्नाड या दिग्गज अभिनेत्याचे लेखन सुध्दा त्यांच्यामुळेच मराठीत वाचायला मिळाले. आजही अनुवादाचे नवे मोठे प्रकल्प आणि स्वतःचे स्वतंत्र लेखन सुरू असताना, या सिनेमाच्या चंदेरी पडद्यासाठी उमाताईंनी हे लेखन कसे केले, यापूर्वी असा काही अनुभव त्यांच्याकडे होता का, असे विचारताच त्यांनी माध्यमांसाठी केलेल्या लेखनाचा पटच उलगडून दाखवला.

यापूर्वी 2018 साली आलेल्या ‘पुरूषोत्तम’ नावाच्या सिनेमाचे पटकथा लेखन उमाताईंनी केले आहे. पुरूषोत्तम भापकर यांच्या अनुभव कथेवर आधारीत या सिनेमाचे दिग्दर्शन रीमा अमरापूर यांनी केले होते. यात उमाताईंनी ऐनवेळी एक गाणं सुध्दा लिहीलेलं आहे. त्यानंतर ‘मिस्टर. & मिसेस सदाचारी’ या सिनेमाचे कथा रूपांतरण आणि संवाद लेखन त्यांनी केलं होतं. या सिनेमांपूर्वी
आकाशवाणीसाठी ‘वंशवृक्ष’ आणि ‘केतकर वहीनी’ अशा नभोमालिका त्यांनी लिहील्या. त्यानंतर ‘ई टीव्ही’ साठी “सोनियाचा उंबरा” ही 400 भागांची दीर्घ मालिका खूप गाजली. त्या वर्षीचा “उत्कृष्ट मालिका” हा पुरस्कार आणि उमाताईंना ‘उत्कृष्ट संवाद लेखन’ हा मटा सन्मान मिळाला. ‘सुवासिनी’, “मंथन” या पासून अलिकडे नुकतीच प्रसारीत झालेली ” जिवाची होतीया काहीली” पर्यंत अनेक मालिकांच्या लेखनात त्यांचा सहभाग होता. पण, एकूणच मालिका लेखनासाठी फार वेळ द्यावा लागतो. कित्येकदा सेटवर थांबून लिहावे लागते. खूप ट्रॅक बदलतात..मूळ कथा अगदीट नवी वळणं घेऊन सादर होते. यासाठी मुंबईत राहून इतका वेळ देणे त्यांना शक्य नसल्याने पुढे हे मालिकालेखन नियमित होऊ शकले नाही. तरीही यासाठी जमेल तितका सहभाग देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

मालिका लेखनाचा हा अनुभव आणि सिनेमा लेखन यात काय फरक असतो, याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले, हे दोन्ही कलाप्रकार कॅमे-याच्या माध्यमातूनच प्रेक्षकांसमोर येतात, पण नाटक खूप वेगळे असते. लेखनातला खरा फरक आहे तो; नाटक व सिनेमा यामध्ये. या दोन्हीत बरंच अंतर आहे. हे अंतर विविध प्रसंग, स्थळ-काळ, दर्शन, गाणी यातून लेखक भरून काढतो. ‘पाहिजे जातीचे’ यात गाणीही उमाताईंनीच लिहीली आहेत. स्टोरी पुढे नेण्यात त्या गाण्यांचा मोठा वाटा आहे. एकूणच नाटकाचा सिनेमा करणं, हे मोठं आव्हान आहे.

सिध्दहस्त नाट्यलेखक विजय तेंडुलकर यांच्या “पाहिजे जातीचे” नाटकासाठी तर हे मोठं आव्हान उमाताईंनी स्वीकारलं असे म्हणावे लागेल. ‘जातीभेद’ या ज्वलंत सामाजिक प्रश्नाला हात घातलेल्या या नाटकाचा सिनेमा करावा, असं का वाटलं, या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ” मुळात ही संकल्पना कन्नड दिग्दर्शक श्री. कब्बड्डी नरेंद्र बाबू यांची. कन्नड- मराठी अनुवादामुळे ते ओळखत असल्याने त्यांनी या सिनेमा लेखनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली.”

या सिनेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, निर्माता – दिग्दर्शक कानडी भाषिक, संगीतकार बंगाली, तर काही कलाकार आसामी आहेत. संगीत बंगाली गायिका, अन्वेषा दासगुप्ता हिने केले आहे. ती संगीताच्या टीव्ही रिॲलिटी कार्यक्रमात गाजलेली तरूण गुणी कलाकार आहे. संगीत, पार्श्वसंगीतासह गायनही तिनेच केले. तिचा हा पहिलाच सिनेमा. याशिवाय, निर्माता, मुख्य भूमिकेतील कलाकार आणि काही त॔त्रज्ञ यांचाही हा पहिलाच सिनेमा आहे. या सगळ्यांनीच जीव ओतून काम केलं आहे. अशाप्रकारे मराठीतल्या एका गाजलेल्या नाटकावर जर कन्नड, बंगाली आणि आसामी लोक एकत्र येवून सिनेमा करीत येत असतील तर मराठी लेखिका म्हणून माझेही हे कर्तव्य होते, म्हणूनच मी या प्रोजेक्टसाठी जास्तीत जास्त सहभाग दिला, असे सांगताना त्यांनी विशेषत्वाने नमूद केले की, “मनोरंजनपर सिनेमापेक्षा एका ज्वलंत विषयाला हात घालण्याचं धाडस करणा-या या मंडळींच्या सोबत राहणे ही माझीही काही सामाजिक जबाबदारी आहे, असे मला वाटले आणि त्याच जबाबदारीच्या भूमिकेतून मी या सिनेमासाठी सहयोग दिला आहे.”

नाटकाचा सिनेमा करताना या टीमने कथेच्या मांडणीत काही बदल केले आहेत. कथेचा आत्मा जराही हलू न देता हे बदल छान चपखल बसवले आहेत. आशयानुरूप नव्याने काही प्रसंगांची भर घालून, काही पात्र नव्याने रेखाटली. नायकाचा जीवन प्रवास अधोरेखित करण्यासाठी नायकाची मूळ कथेत नसलेली “आई” ही महत्वाची व्यक्तीरेखा सिनेमात दिसणार आहे. कथेचा शेवट पटेल अशा तार्कीक पध्दतीने ठोस मुद्दा घेऊन एका टोकावर येऊन थांबतो, तो प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येवूनच पहायला हवा.

नाटकातली पात्र स्थळ-काळाच्या सीमा ओलांडून प्रत्यक्षात मुक्तपणे सिनेमाच्या पडद्यावर पाहाण्यास उत्सुक असलेल्या प्रेक्षकांना आणि नाटक माहित नसलेल्या रसिकांनाही हा सिनेमा एका नवा कसदार अनुभव द्यायला सिध्द झाला आहे. दक्षिणेतल्या सिनेमांना हल्ली आपणही गर्दी करू लागलो आहोत, तर दक्षिणात्य लोकांनी निर्मिती केलेल्या आपल्या मराठी सिनेमाला तर आपण गर्दी करायलाच हवी ना..!

– अमृता खाकुर्डीकर, पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles