किल्ले मिश्रदुर्ग..वासोटा (व्याघ्रगड)

किल्ले मिश्रदुर्ग..वासोटा (व्याघ्रगड)पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सह्याद्रीच्या पर्वतरांगेला समांतर अशी दातेगड डोंगराची रांग पसरली आहे‌. या दोन्ही रांगामधून कोयना नदी वाहते. या नदीवर हेळवाक येथे धरण बांधले आहे. त्यामुळे तयार झालेल्या जलाशय तापोळा ते वासोटा किल्ला असे पसरले आहे. या जलाशयास ‘शिवसागर’ असे म्हणतात. सह्याद्रीची रांग व शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट जंगल आहे. त्यामुळे वासोटा किल्ल्याची दुर्गमता खूप वाढली आहे. येथे वसिष्ठ ऋषींचा शिष्य रहात होता. त्यानेच आपल्या गुरूंच्या नावावरून हे नाव दिले अशी कथा आहे. किल्ल्याची मूळ बांधणी शिलाहार राजा दुसरा भोज याने केली‌.
वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. तेथील निर्जन व घनदाट जंगलामुळे याचा वापर तुरुंग म्हणून केला जात होता.

गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक कोकणातून व दुसरा घाटमाथ्यावरून. कोकणातील चिपळूण मधून वासोटा किल्ल्याच्या पश्चिम पायथ्यापर्यंत बस येतात. दुसरा मार्ग सातारा-कास-बामणोली असा आहे. तेथून शिवसागर जलाशय पार करण्यासाठी लाॅन्च आहेत. लाॅन्चने ४०-५० मिनिटांत किल्ल्याजवळील अवशेष रूपातील इंदवली गावात पोहचता येते‌. येथूनच गडावर जाणारा मार्ग आहे. काही अंतर गेल्यावर गडाच्या पायथ्याशी आपण पोहचतो. येथे मारूतीची मूर्ती आहे. येथून गडाची चढण व जंगल सुरु होते. सोबत पाणी ठेवावे लागते. घनदाट जंगलातून जाताना अनेक वन्य प्राण्यांचे व विविध झाडे, वनस्पतींचे दर्शन होते. सावधगिरीने व गोंगाट न करता चढाई करावी लागते. अर्ध्या अंतरावर उजवीकडे जाणारी वाट लागते जी नागेश्वर सुळक्याकडे जाते. सरळ वाटेने गेल्यावर जंगल विरळ होत गडाच्या भग्न प्रवेशद्वारातून आत प्रवेश होतो.

गडावर पोहोचल्यावर शिवसागर जलाशय व घनदाट जंगलाचा मनमोहक नजारा नजर खिळवून ठेवतो‌‌. येथेच पाण्याचे टाके आहेत. हे पिण्यायोग्य पाणी आहे. दक्षिण टोकाला जुना वासोट्याचा बाबू कडा पाताळवेरी दरीचे विहंगम दृश्य पहायला मिळते‌. वाढलेल्या झाडीमुळे गडावरील वास्तू लुप्त झाल्या आहेत. मारूती मंदिर, वाड्याचे अवशेष व महादेव मंदिर आहे. उत्तरेकडील माचीवरून नागेश्वर सुळक्याचे दर्शन होते. या सुळक्याच्या अलीकडे एक सुळका आहे. त्यास तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे म्हणतात. येथून कोकणचा विस्तृत भागही दिसतो. पूर्व दिशेला ठोसेघर पठारावरील पवनचक्क्या सौंदर्यात भर घालतात. गिरीदुर्गासोबतच हा वनदुर्ग असल्याने यास ‘मिश्रदुर्ग’ असेही म्हणतात‌.

स्वाती मराडे, इंदापूर पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles