‘आस अर्थात, दु:खाचा किनारा शोधणारा श्वास’; सविता पाटील ठाकरे

‘आस अर्थात, दु:खाचा किनारा शोधणारा श्वास’; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण_

दिनांक २२ जुलै २०१९ रोजी ‘भारतीय अंतराळ संशोधन’ संस्थेद्वारे चांद्रयान २ चे प्रक्षेपण झाले. त्यात ऑर्बिटर, लँडर, रोव्हर सारं काही होते. ७ सप्टेंबर २०१९ रोजी चांद्रयान २ ने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु टचडाऊनच्या काही वेळेपूर्वी त्याचा संपर्क तुटला. पण.. पुन्हा एकदा नव्या जोमाने उल्हास आणि आत्मविश्वासाने वैज्ञानिक कामाला लागले आणि आधीच्या चुका दुरूस्त करत २२ जुलै २०२३ रोजी चंद्रयान ३ चे प्रक्षेपण झाले. ते २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद उतरले, डोळ्याचे पारणे फिटेल असा हा गौरवास्पद क्षण माझ्यासह आपण सर्वांनीही ‘याचि देही, याचि डोळा’ पाहिला असेल.

जरा विचार करा…. चांद्रयानच्या अपयशाने खचून जर आपण थांबलो असतो, निराश झालो असतो, रडत बसलो असतो; तर हा सोन्याचा दिवस आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला नसता. आशा, उमेद, इच्छा, अपेक्षा, ओढ, अर्थात आस..!! होय , ‘आस एक श्वास’ असतो. जो राखेतून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्यास भाग पाडतो. ‘आस’ एक ऊर्जा असते, म्हणूनच तर गुलाब काट्यांना झेलतो तो सुगंधाच्या, सौंदर्याच्या आसवरच.

जीवनातील तिमिराचा नाश करून, मन गाभारा आशेच्या प्रकाशाने उजळून टाकणारी ही पणती…! अस्तित्व छोटे असले तरी, जीवनवाटा मात्र तेजोमय करून जगण्याचा मार्ग आणि नविन उमेद जागवण्याची तिच्यात क्षमता असते. तिला एकच आस असते, कधीतरी अंधार होईल आणि येईलच माझी आठवण. आठवतेय..? काही गावगुंडांनी तिला धावत्या रेल्वेतून खाली फेकले, डावा पाय गेला तिचा..मी पुन्हा उभी राहील या आसला श्वास करून ती उभी राहिली. केवळ उभे राहून ती थांबली नाही; तर जगातील सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट पादाक्रांत केले. होय मी ‘अरुणिमा सिन्हा’ विषयीच बोलत आहे.

मी मोठा होईल, खूप मोठा होईल ही ‘आस’ मनात ठेवून ‘रितेश अगरवाल’ यांनी ओयो कंपनीची स्थापना केली. अवघ्या पाच वर्षाच्या आत जगभरातील जवळपास साडेचार लाख हॉटेल त्यांनी जोडलेत. आपण तर खूप लहान आहोत. शब्दांची जुळवाजुळव करणारे आपले सारस्वत बंधू आणि ताई. होतील चुका…कधीकधी यमक जुळणार नाहीत, शब्द सापडणार नाहीत, नैराश्यही येईल पण लेखणीला नका ना थांबवू…!!

“आस ठेवा मनाशी,खूप मोठं होण्याची..
मनी आकांक्षा हवी,शिखर सर करण्याची.”

‘आस एक श्वास’ हा आगळावेगळा विषय देऊन, ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी सकारात्मक ऊर्जा भरण्याचा प्रयत्न केला आहे. दूर नका जावू आपल्या साप्ताहिक सहित्यगंधचेच उदाहरण घ्या. हा हा म्हणता शंभरवर पोहोचला. केवळ आशेच्या भरभक्कम पायावरच. आपण सर्व शब्दप्रभूंनी आपल्या प्रतिभाशक्तीचा कस लावत विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन..!

पण थोडं काही…भा.रा.तांबे म्हणतात, “माझ्या कवितेची वाट माझ्या जीवनाच्या संगतीने झाली”, अर्थात त्यांच्या काव्याकडे पाहिल्यावर याची प्रचितीही येते, त्यांच्या साहित्यात जीवनविषयक श्रद्धा आणि कलाविषयक निष्ठा याचा संगम पहावयास मिळतो. त्यांचे जीवन सुद्धा निसंधीग्धपणे आनंदवादी आहे व त्यांना हे जग म्हणजे, आनंदाचा मूर्तीमंत अविष्कार वाटतो. अनंत नामा रूपांमधून तो मूलभूत आनंदच परंपरेने प्रकटलेला आहे, असे त्यांना निशंकपणे वाटते. तेव्हा, आपणही आपल्या जीवनातली सुखी दुःखी क्षण कवितेत बद्ध करण्याचा प्रयत्न करूया कधी आनंदाला उधान, तर कधी दुःखाला किनारा शोधू या..!!

सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री,लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles