‘सर्जा राजा’ची दृष्ट काढा.. औक्ष लाभेल; स्वाती मराडे

‘सर्जा राजा’ची दृष्ट काढा.. औक्ष लाभेल; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गुरुवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण_

आला आला सर्जाराजा, बघ पोळ्याचा सण… उतराई होण्यासाठी, आज फेडतो ऋण.. किती राबतो राबतो तो रोजच शेतात, त्याच्या कष्टानेच होते, शिवाराची मशागत.. त्याच्या संगतीने, नांगरणी, वखरणी.. येते फळा मेहनत, येई पीक मोत्यावाणी.. झाली झाली लगबग, शिंगे घोटून काढली.. रंग हिंगूळाचा दिला, पट्टी बेगडाची सजली. न्हाऊमाखू झाले, खांदे शेकणीही केली, अंगावर नक्षीदार, रंगावली काढली.. गळा घातल्या घातल्या घुंगुराच्या माळा, पायी घातले तोरडे, आज लडिवाळा.. गोंडं रेशमाचं शिंगावर बांधलं, पांघरली पाठीवर, ऊबदार झूल.. ऐनेदार बाशिंगानं सजलं भाळ, लालेलाल फुलांची, गळा घातली माळ. आयांनो, बायांनो तुम्ही लागा तयारीला.. करा पुरणपोळीचा, गोड घास त्याला.. रोज देतोय त्याला फक्त वैरण पाणी, गोड घास भरवू, आज मायेनी.. आपल्याचसाठी तो रोज राबतो, दिस आजचा त्याचा, पूजा त्याची मी मांडतो. नेतो वाजत-गाजत गावामंदी वरात.. ताट औक्षणाचं घेऊन तुम्ही थांबा गं दारात.. येता माघारी त्याची दृष्टही काढा.. औक्ष लाभो तयाला, टळो सारी इडापिडा..!

आज चित्र चारोळी स्पर्धेचे चित्र पाहिले नि बालपणातील पोळ्याचे हे चित्र झर्रकन डोळ्यापुढे आले. पोळा जवळ आला की, कुंभारवाड्यात मातीचे बैल तयार करण्याची लगबग सुरू व्हायची.. अन् आम्ही मुले ती कलाकारी कितीतरी वेळ निरखत बसायचो. त्याचवेळी घरातील वडीलधाऱ्यांची पोळा सणासाठी खरेदीची लगबग चालायची.

प्राणीमात्रांप्रतीही कृतज्ञ असणारी आपली कृषीसंस्कृती.. वीस वर्षांपूर्वी खेड्यात घरोघरी दिसणारे हे चित्र सध्या लुप्त होताना दिसते आहे. लहान मुले मातीचे बैल हातात घेऊन घरातल्या मोठ्यांनी घेतलेल्या ख-याखु-या बैलाबरोबर वरातीत जायची. पण आता ‘जीवाशिवाची बैलजोड…!’ खरे बैल क्वचितच एखाद्या घरी उरलेत बैलांची जागा आता आधुनिक यंत्रांनी घेतली व पोळ्याच्या सणाला केवळ मातीच्या बैलांची पूजा होऊ लागली. ‘तान्ह्या-सर्जा तुवा नामजोडी तू न हवीत हाथीघोडी’ असे म्हणणारा शेतकरी होता.. पण शेतकरी व बैलजोडी हे अतूट असणारे नाते बहुतांशी डोंगराळ भागातच अस्तित्व टिकवून आहे.. कारण कदाचित डोंगराळ भागात अजूनही यंत्रे त्याची जागा घेऊ शकली नाहीत.

आजचे चारोळी चित्र पाहून मनात भूतदया जागली तसेच खंतही उफाळून आली. आजच्या धावपळीच्या युगात बैल टिकणार तरी कसे आणि पाळणार तरी कोण.. काळ बरेच बदल घडवतो.. मनाला खंत लावणारा हाही एक बदल. खरेतर आपण सर्व रचनाकारांनी श्रावणी पोळा विशेष लक्षात घेऊन रचना साकारल्या. आजचा दिन‌ ख-या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा ठरला. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार. 🙏

सौ स्वाती मराडे, पुणे
मुख्य परीक्षक,सहप्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles