“…आणि मग कालचा काळोख आजचा प्रकाश होतो”; विष्णू संकपाळ

“…आणि मग कालचा काळोख आजचा प्रकाश होतो”; विष्णू संकपाळपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेचे परीक्षण

“फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश,
दरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश प्रकाश”

सुप्रसिद्ध गीतकार सुधीर मोघे यांचे हे शब्द आज आपसूक ओठावर आले. तुम्ही म्हणाल हायकूचा आणि याचा काय संबंध ? मंडळी आजचे चित्र बारकाईने पाहिले तर; लक्षात येईल जेव्हा रात्रीच्या घोर तमाला भेदून प्रकाश शलाका बाहेर येते तेव्हा अवघे चराचर जागे होते.. आणि मग कालचा काळोख आजचा प्रकाश होतो. पाखरांच्या ओठी जुनीच गाणी नव्याने गुंजू लागतात. अंधार आणि प्रकाशाचा हा खेळ नित्य निरंतर चालूच असतो. मानवी जीवनाचा विचार केल्यास सुखदुःखाचा ही खेळ असाच चालू असतो.. दुःखाच्या घोर तमातून बाहेर पडण्यासाठी एक आशेचा प्रकाश बिंदू पुरेसा असतो.

आजचे चित्र पाहता घनगर्द काळोखात इवलीशी पणती तेवताना दिसते. यामध्ये जीवनाचे खूप मोठे शास्वत सत्य लपलेले आहे. अंधार हे नैराश्याचे प्रतिक तर प्रकाश हे आशेचे प्रतिक आहे. मानवी जीवनात येणार्‍या हर दुःखावर मात करण्याचा सूक्ष्म विचार मनात चिरंतन चालू असतो. तोच एक प्रकाश बिंदू असतो जो पुढे प्रयत्नांची मशाल होवून यशाचा प्रकाश झोत होतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नैराश्यातून आत्महत्या हा प्रकार रूढच होत चाललाय. याच पार्श्वभूमीवर आदरणीय राहुल दादांनी हायकू स्पर्धेसाठी सदर चित्र देऊन शिलेदारांच्या सकारात्मकतेला आवाहन केले. आणि समस्त हायकूकारांनी अक्षरशः रचनांचा पाऊस पाडला.

जपानी हायकूकारांच्या नजरेतून हायकू हा सुखकारी, आनंददायी, मनप्रसन्न करणारा जसा असतो तसाच तो काळजाचा ठाव घेणारा, दुःखदायी, वेदनादायी बहुतांश वेळा मृत्यचा विचार करण्यास भाग पाडणाराही असतो. शेवटी जगात चिरंतन असे काहीच नसते. जशी पानगळ आहे तशी पालवी आहे. उदय आहे तसा अस्त आहे. जसा जन्म तसा मृत्यूही आहे. आणि मृत्यू हेच अंतीम सत्य आहे. हायकूकाराने बहराचे, सृजनाचे जसे विस्मयाने स्वागत करावे तसेच विनाश किंवा र्‍हासाचाही स्विकार करावा. देठातल्या कळीचे फूल होते, ते उमलते, आणि कोमेजते हा प्रवास अल्पकाळच असतो मात्र त्यातला आनंद चिरकाल टिकणारा असतो. इथे जे काही आज आहे ते सर्व उद्या संपणार आहे हे गृहीत धरूनच त्यातला आनंद मनसोक्त पणे आहे त्याच क्षणी लुटावा. अशाच आशयाचा तात्विक दृष्टिकोन जपानी हायकू मध्ये प्रकर्षाने जाणवतो.. याच कलेचा प्रभाव शिरिष पै यांच्यावर पडला आणि त्यांनी मराठीत हायकू रूजवला.. शिरिष पै यांनी विपुल लेखन करून हायकू म्हणजे वसंताची बहर असल्याचे सिद्ध केले.

जाता जाता इतकेच सांगू इच्छितो की हायकू लिहितांना, प्रतिभेचा कस लागू द्या. कल्पकता आणि कलात्मकता याचा सुरेख संगम साधत परिणामकारक कलाटणी देण्याचा प्रयत्न करावा. जास्त रचना लिहिणे आणि दर्जा सांभाळणे यात गल्लत होता कामा नये. आजच्या स्पर्धेत सहभागी हायकूकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आज मला परिक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय राहुल दादांचे मनापासून खूप खूप आभार.

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles