‘आढावा मनाचा’ घेता,’निर्मळ प्रेमाचा मंत्र यशस्वी होवू शकतो’; विष्णू संकपाळ

‘आढावा मनाचा’ घेता,’निर्मळ प्रेमाचा मंत्र यशस्वी होवू शकतो’; विष्णू संकपाळपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

‘सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला,
रंग कधी दिसणार तुला लाजणार्‍या फुलातला’

मंडळी आठवले का कांही.. की लागली भावसमाधी?.. लागायलाच हवी. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या अपराध चित्रपटातील, मधुसुदन कालेलकरांच्या या शब्दातील हे गीत “आढावा मनाचा” काव्य परिक्षण लिहायला घेतले आणि हलकेच ओठावर आले. तसेही व्यावहारिक जगात अनेक गोष्टींचा अनेक पद्धतीने आढावा घेतला जातो. कोणत्याही समारंभाच्या संपूर्ण तयारीचा संबंधितांकडून अंतीम आढावा घेतला जातो. जेणेकरून कोणतीही उणीव राहू नये. मात्र इथे मनाचा आढावा घ्यायचा आहे. सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे कांही शब्द तर कमालीचे बोलके आहेत.

‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला हाकला, फिरी येई पिकावर’

मानवी मनाच्या चंचलतेचे अचूक विश्लेषण बहिणाबाई करून गेल्या. मानवी मन हे एक अजब रसायन आहे. जिथे स्वतःच्याच मनाचा थांग लागणे मुश्किल असते तिथे इतरांच्या मनाचा ठाव घ्यावा तरी कसा? वार्‍यापेक्षाही कैकपटीने वेगवान, चंचल असलेले मन ताब्यात ठेवणे भल्याभल्यांना असंभव. ज्याला आपण आत्मा, प्राण, जीव म्हणतो त्याचा मनाशी संबंध असतो. या शरीररूपी रथाचे सारथ्य मनच करत असते. इंद्रिये रूपी अश्वांना हवे तसे दौडत शरीररूपी रथाला ते हवे तसे उधळत असते. ज्यातून अनेक सकारात्मक नकारात्मक गोष्टी घडत असतात.

अशा या कधी विध्वंसकारी तर कधी शांतीदूत बनणाऱ्या मनाला ताब्यात ठेवण्याची किमया साधणे भल्याभल्यांना असंभव असते. अशा मनाचा आढावा घेण्यासाठी नेमके कोणते तंत्र वा यंत्र अस्तित्वात नसते मात्र निखळ निर्मळ प्रेमाचा मंत्र जरूर यशस्वी होवू शकतो. कारण असे म्हटले जाते की, प्रेमानेच जग जिंकता येते. यासाठी मनाने मनात खोलवर शिरावे लागते. मनाचिया गुंती मन गुंतवावे लागते. खरे तर यात सुद्धा मनाला मनासारखा कौल मिळेलच याची हमी नसते कारण मनामनाचा ताळमेळ घालणे म्हणजे, वाहत्या धारेला विरूद्ध दिशेला वळवणे. चंचल वार्‍याला लगाम लावणे.कोणतीही गोष्ट करायला अथवा नाकारायला आधी मनाचीच तयारी लागते. मन तयार झाले की शरीर आपोआप खेचते. कारण इंद्रिये मनाची गुलाम असतात. इंद्रिये आणि मन यांच्यात समन्वय साधून योगी बनणे म्हणजे जग जिंकणे. अशा चंचल मनाचा आढावा घ्यावा तरी कसा…???

जाता जाता थोडेसे.. समूह प्रमुख आदरणीय राहुल दादा कोणताही विषय देतात तेव्हा काहीतरी कार्यकारणभाव नक्की असतोच. विषय आला की विचारचक्र सुरू होते. मनातल्या मनात आखणी चालू होते. कधी सहज साधते. तर कधी घोडे अडून बसते. आपण सर्व अनुभवी आहातच. कविता लिहिताना विषयासोबत मनाला जोडले जावे. जो आशय मांडायचा असेल तसे चित्र डोळ्यासमोर उभे करावे, आणि मनाला प्रश्न विचारावा की पुढे काय..? जे उत्तर मिळेल ते मांडत जावे. तटस्थपणे स्वतःच परिक्षण करावे. हे करताना कमालीची संवेदनशीलता आणि सूक्ष्म निरीक्षण दृष्टी तसेच जोडीला वाचन, चिंतन, मनन ही त्रिसूत्री कायम सोबत असू द्यावी. एक एक शब्द गुंफताना अशी काही बहारदार माला तयार व्हावी की, शब्द वाचताक्षणीच वाचकांच्या तोंडून “वाह क्या बात” अशी उत्स्फूर्त दाद निघाली पाहिजे. अवास्तव पसारा टाळून सुंदर मोरपिसारा भासला पाहिजे. यासाठी समूहात येणारी दिग्गजांची परीक्षणे, रचना काळजीपूर्वक वाचाव्यात. बोलते व्हावे. बस्स बाकी आपण सूज्ञ आहातच. आज काव्य परीक्षण लिहिण्याची संधी मला दिल्याबद्दल मी आदरणीय राहुल दादांचा ऋणी आहे. सर्व शिलेदारांना काव्यवाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देत माझ्या परीक्षणास येथेच विराम देतो.

श्री विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles