हरिश्चंद्रगड; स्वाती मराडे

हरिश्चंद्रगड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सह्याद्रीतील अतिउंच शिखरामध्ये या गडाचा समावेश होतो. हरिश्चंद्र, तारामती व रोहीदास या तीन शिखरांचा मिळून हा गड. पुणे, नगर व ठाणे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हा किल्ला आहे. याची निर्मिती केव्हा झाली हे माहित नसले तरी येथील लेण्यांवरून हा अतिप्राचीन असावा. हरिश्चंद्र व तारामती यांच्या उल्लेखामुळे तो पुराणकाळात घेऊन जातो. स्थानिक कथांमधूनही हा संबंध दिसतो. मत्स्यपुराण, अग्निपुराणात याचा उल्लेख आढळतो. हा किल्ला ट्रेकर्ससाठी एक पर्वणी आहे. हा गड जितका सुंदर आहे तितकाच त्याचा प्रवास रोमांचक आहे‌. नागमोडी पायवाट, कारवी करवंदाचे रान, नदी-नाले, उंच कडे, अजस्त्र खिंडी, पायथ्याशी असणाऱ्या जंगलात विविध पशुपक्षी रोमांचित करतात.

या किल्ल्याला नैसर्गिक ताशीव कडा असल्याने कुठेही तटबंदी पहायला मिळत नाही. गडावरील आकर्षणाचे ठिकाण म्हणजे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर. अतिशय सुंदर अशा या मंदिराची निर्मिती नवव्या शतकात झाली. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर भिंतीवर सुरेख नक्षीकाम पहायला मिळते. मंदिराच्या मागील बाजूस सात आठ खोल्या आहेत. यातील काही खोल्यांत थंडगार व मधुर पाणी आहे. एका खोलीत गुहा असून चौथरा आहे. यावर चांगदेवांनी तपश्चर्या केली होती. याच ठिकाणी त्यांनी तत्वसार ग्रंथ लिहून या गडाचे सुरेख वर्णन केले आहे. मागील बाजूस गणेश मंदिर असून गणेशाची मनमोहक मूर्ती पहायला मिळते. याशिवाय येथे नारायणाचे मंदिर आहे. मंदिराच्या शेजारी पुलाखालून वाहणारा ओढा व त्याचा उगम म्हणजे मळगंगा नदीचा उगम. तीच पुढे मुळा नावाने ओळखली जाते. नदीच्या दिशेने पुढे गेल्यावर खडकात खोदलेली केदारेश्वर लेणी आहेत. यामध्ये मोठे शिवलिंग आहे. या गडावरील सर्वात उंच शिखर म्हणजे तारामती. याच्या पोटामध्ये लेणी आहेत त्यास गणेश लेणी म्हणतात. शिखरावरून भोवतालचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. याशिवाय हरिश्चंद्रगड कोकणकडा ‌व त्याचा वैशिष्ट्यपूर्ण आकार मन वेधून घेतो. येथून सूर्यास्त पाहणे एक पर्वणीच. याठिकाणी इंद्रवज्र नेहमी दिसून येतो. मंदिराच्या बाजूला सप्तर्षी पुष्करणी तलाव आहे. काठावर असणाऱ्या खोल्या सप्तर्षी ऋषींच्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातून हरिश्चंद्र गडला जाणारी वाट पाचनईतून जाते. मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी गावातून राजूर मार्गे पाचनई येथे यावे लागते. येथून गडावर जाणारी मळलेली पायवाट आहे. गडावर जाताना मात्र माहितगार व्यक्ती सोबत असावी.

स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles