
“मजबुरी का नाम महात्मा गांधी’; नव्हे तर, मजबुती का नाम महात्मा गांधी”
“मजबूरी का नाम महात्मा गांधी” हा वाक्यप्रचार कसा’ कोठून आणि केव्हा आला, कोणी आणला असेल, हे सांगता येत नाही पण तो इतका रुजला आणि रुळला आहे की विचारता सोय नाही,. तो वाक्यप्रचार कोणी वापरला? तर त्यावर दात काढणाऱ्यांची संख्या ही कमी नाही, इतपत तो गांधींना चिटकविला गेला आहे.आज गांधी पासून त्याला वेगळं करता येणे शक्य नाही.
गांधींचं नेतृत्व या देशाने स्वीकारलं ते त्यांच्या सामर्थ्यामुळे. गांधींचं नेतृत्व स्वीकारावं लागलं असेल, तर ती एक वेळ देशाची मजबुरी होती असं फार तर म्हणता येईल; पण ती गांधींची मजबुरी कशी होऊ शकते ? आणि मग “मजबूरी का नाम महात्मा गांधी” असं कोणत्या अर्थाने म्हटलं जाऊ शकतं ? पण म्हटलं गेलं आणि आजही म्हटलं जातं.
काँग्रेसलाही गांधींचं नेतृत्व स्वीकारावं लागलं. कधी स्वेच्छेने तर कधी अनिश्चेने; पण ही मजबुरी असेल तर काँग्रेसची असेल पण गांधी मजबूर कसा आणि कोणत्या अर्थाने होतो? ब्रिटिशा सारख्या साम्राज्यवादी देशाला गांधींनी येथून त्यांच्या मायदेशी परतून जाण्यास भाग पाडले.त्यांच्याविरुद्ध लढायला, सामान्य माणसाला अदभुत पराक्रम करायला गांधींनी उद्युक्त केले.सामान्य माणसातला सामूहिक पराक्रम गांधींनी अशा प्रकारे जागवला की, शत्रूही नामोहरण झाला.बलाढ्य तोफा आणी बंदुकीसामोर निडरपणे, निर्भीडपणे उभे राहण्याची ताकद व हिम्मत ज्यांनी सामन्यातील सामान्य माणसात उभी केली, गांधींच्या आगळ्यावेगळ्या तंत्राने बऱ्याच वेळा ब्रिटिशांना त्यांना “धरावे की सोडावे” हेही कळत नसे. म्हणजे ब्रिटिशांची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी होऊन जायची. यात गांधीची मजबुरी कोठे आहे?
विलासपूर्ण एश आरामाचं जीवन सोडून देशातूनच नव्हे तर विदेशातून सुद्धा लोकं गांधींचा विचार व आचारणांशी प्रभावित होऊन आपले शहरातील अधुनिकपूर्ण सुविधांयुक्त घरदार सोडून गांधींनी उभ्या केलेल्या गाव खेड्यातील झोपड्या, आश्रमात गांधी समवेत, त्यांना समर्पित होऊन आयुष्यभर राहायला आलेत यात मजबुरी कुणाची ?
आयुष्यभर ज्यांनी गांधींचा द्वेष केला, तिरस्कार केला; त्यांचा परिणाम म्हणून त्यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येचा काहींना इतका आनंद झाला की, तो त्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून साजराही केला. पण कालांतराने ते गांधीचंच नाव त्यांच्या प्रात: स्मरणीय प्रार्थनेत घेत असतील तर, मजबुरी कोणाची गांधींची की त्यांची, हत्या करणाऱ्यांची? देश विदेशात पंतप्रधान मोदींनाही गांधींच नाव घ्यावं लागत असेल, तर मजबुरी का नाम नरेंद्र मोदी असं म्हणाल ,की मजबूरी का नाम महात्मा गांधी असे म्हणू? गांधींची हत्या करून राक्षसी आनंदाने पोट भरलं नाही म्हणून आजही गांधींच्या फोटोला त्यांना गोळ्या माराव्या लागतात व तरी सुद्धा राष्ट्रनेता बनण्याकरीता त्या दृष्ट गांधीच्याच कुबड्याचा आधार घ्यावा लागत असेल तर, मजबुरी कोणाची?मजबुरी का नाम महात्मा गांधी कसे ? हा प्रश्न तर वर्तमान विचारणारचं.
जगात गांधींचे पुतळे उभारल्या गेले. त्यांच्या नावावर टपाल तिकिटं देश विदेशात काढली गेली. त्यांच्यावर असंख्य पुस्तके लिहिली गेली आणि वाचली सुद्धा गेली, ज्या ब्रिटिश साम्राज्याने दीडशे वर्ष या देशावर राज्य केले त्याच ब्रिटिश सरकारने आज त्यांच्या देशातील संसदेसामोर गांधींचा पुतळा उभारावा ही मजबुरी कोणाची? गांधींची की गतकाळात साम्राज्यवादांचा अहंकार असलेल्या ब्रिटिश साम्राज्याची? जगभर गांधींचे पुतळे उभारले का गेले या प्रश्नाचे उत्तर देतांना, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सांगतो की भारतात गांधी नावाचा काळा माणूस जन्माला आला नसता तर तुमच्या सामोर बसलेला हा काळा माणूस अमेरिके सारख्या जागतिक महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष कधीही होऊ शकला नसता, या एका वाक्यातूनच मजबुरी जगाची कि गांधीची, कोणाची? या प्रश्नाचं उत्तर बयाडातील बयाड माणसाला सुद्धा चटकन लक्षात येतं. पण ज्यांना लक्षातच घ्यायचं नाही त्या एड्यांचं काय?
ब्रिटिश साम्राज्याचा आरोपी म्हणून गांधींना पोलिसांनी बेड्या ठोकून ज्या न्यायालयात उभे केले ,त्याच न्यायालयातील न्यायाधीश गांधींना कठड्यात हजर करताक्षणी अभिवादन करण्या करीता स्वतः उभा होतो, तर त्यात मजबुर कोण? आणी मजबुरी कोणाची?
सामर्थ्याचेच नाव महात्मा गांधी होते, आणि आहे. तरीही “मजबुरी का नाम महात्मा गांधी” हे लांच्छन लावण्यात गांधी मुळे ज्यांचे हितसंबंध दुखावल्या गेले आणि धोक्यात आले ती मंडळी यशस्वी झाली हे तर उघड सत्य आहे. ज्यांनी गांधींची हत्या केली, त्यांना आजही गांधींची भीती वाटते आहे ती मंडळी आजही गांधीं विचारांचा आशय संपविण्याचा कपोलकल्पित कट रचत आहेत , कधी भगतसिंग, कधी सुभाषबाबू तर कधी आंबेडकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कबरीतून सुद्धा विवेकपूर्ण बोलण्याचं वचन देणाऱ्या गांधींवर निशाणा धरल्या जात आहे पण हा बंदुकीच्या नळीतसुद्धा येत नाही व छाताडावरून उतरत सुद्धा नाही म्हणून त्यांच्यातही कुजबूज आहे की मजबूरी का नव्हे मजबुती का नामचं महात्मा गांधी नव्हे ते आहेच…! हि त्यांची मजबुरी नाही का ?
“गांधी का मरत नाही”
चंद्रकांत वानखेडे यांच्या पुस्तकातून साभार