आंतरिक प्रेरणेने सर्वांना एकत्र आणणारं ‘भगवं वादळ’; स्वाती मराडे

आंतरिक प्रेरणेने सर्वांना एकत्र आणणारं ‘भगवं वादळ’; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण_

“पहा त्या पूर्वेकडे..तांबडं फुटलंय,
चैतन्याचं नभात..भगवं वादळ उठलंय..!”

काळोखाला मागे टाकायला आकाशात केशरी, अर्थात भगव्या रंगाची उधळण होते. उगवत्या सूर्याचा रंग, अग्नीच्या ज्वाळांचा रंग, तेजाचा रंग, त्याग, समर्पणाचा रंग. प्राचीन काळातील राम, कृष्ण यांच्या रथावरील ध्वजाचा रंग. मंदिर असो वा आश्रम, हिंदू संस्कृती असो की बौद्ध संस्कृती असो. त्याग, समर्पणाच्या रंगासाठी आपलासा वाटला तो हाच भगवा रंग..! एवढंच नाही तर चैतन्य घेऊन उगवलेला भास्कर तेच भगवं चैतन्य घेऊन मावळतो व पुन्हा तेच चैतन्य घेऊन हजर होतो. जणू जन्माला आलेला त्याच चैतन्याने जावा व पुन्हा माघारी यावा.. याचाही संदेश देणारा.

….अन् हाच भगवा माझ्या राजाच्या स्वराज्याच्या ध्वजाचा रंग. मरगळलेल्या निखा-यात अंगार भरून फुलवावा तसा हा भगवा रंग. त्याकाळी परकीय वर्चस्वाखाली दबलेला मराठी समाज मुकाट्याने अन्याय सहन करत खालमानेने जगत होता. ही मरगळ झटकली ती बालशिवबाने स्वराज्याचे स्वप्न दाखवून. जुलमाविरूद्ध प्रतिकार करायला मनात अंगार फुलवला, नि स्वराज्याचे स्वप्न साकार करत केवळ स्वराज्याचे छत्रपती झाले नाहीत; तर आजही मनामनावर राज्य करणारे ते राजराजेश्वर झाले. याच अंगाराचे, वीरतेचे, शौर्याचे, त्याग-समर्पणाचे प्रतिक म्हणून त्यांनी स्वराज्यावर भगवा ध्वज फडकवला. तोच भगवा पाहून आजही अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो. जेव्हा भगवे हातात घेऊन आंदोलन उभारले जाते तेव्हा आंतरिक प्रेरणेने अनेकजण एकत्र येतात.. अन् उठतंं भगवं वादळ…!

मग ते आंदोलन मराठी माणूस उभा करण्यासाठी असो की, मायमराठीची अस्मिता जपण्यासाठी उभारलेले असो, किंवा मग सद्यकाळात सुरू असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा असो. हाती भगवा ध्वज घेऊन जेव्हा लाखोंच्या संख्येने लोक जमा होतात तेव्हा नक्कीच ते भगवं वादळ ठरतं. आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी ‘भगवं वादळ’ विषय आला नि विचाररूपी मंथन वाचायला मिळाले. विशिष्ट रंगाचा संबंध एखाद्या समाजाशी जोडून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा यावर राजकारणही कसे रंगते. याशिवाय महापुरुषांविषयी वाटणारा अभिमान. भगव्या रंगाचे महत्व सांगणा-या रचना अशा अनेकविध विचारांची गुंफण चारोळीरूपाने आपण व्यक्त केलीत. असेच मंथन करून शब्दरूपी नवनीत बाहेर पडू द्या. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन.

स्वाती मराडे, पुणे
मुख्य परीक्षक, सहप्रशासक, कवयित्री, लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles