“….आणि…’सातारचा म्हातारा शेकोटीला आला”; स्वाती मराडे

“….आणि…’सातारचा म्हातारा शेकोटीला आला”; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘यंदा थंडी पडणार नाही.’, ‘यंदा थंडी कमी पडणार..’ असेच म्हणत होते सगळे. दिवाळीत ती गावात येते अशी आपली जुनी समजूत पण.. अं हं..! ती यायचे नावच घेईना. थोड्याच दिवसात थंडीऐवजी पावसाने हजेरी लावली. नक्की कोणता ऋतू आहे हाच प्रश्न पडला मनाला‌. पण बहुतेक पाऊसच सोबत थंडीला घेऊन आला असावा अन् थंडी इथे ठेवून निरोप घेऊन गेला असावा. पण थंडीने मात्र सोबत धुकेही आणलेय आणि दवबिंदूही. ती येणार नाही हा सर्वांचा कयास तिने सपशेल बाद ठरवला आणि हवीहवीशी गुलाबी थंडी अंगाखांद्यावर खेळू लागली. गुलाबी थंडीने सोबत आणले वारे नि अंगावर आले शहारे.. कुडकुडणारे अंग ऊब शोधू लागले. धुक्याची चादर धरणीने पांघरली की अंगावर रजई पांघारावीशी वाटते.. पण कितीवेळ नुसतं पडून रहायचं. मग हळूच मन जातं आठवणींच्या राज्यात.. पिंगा घालत ते पोहचतं शेकोटीभवती.

दिवेलागण होऊन थोडा अंधार व्हायला लागला की आजी गोव-या रचून शेकोटी पेटवायची. हात-पाय ताणून शेकून झाले की डोकंही शेकायला लावायची. डोकं शेकताना कधी कधी चुर्रर करत केस भुरभुरायचे. त्या शेकोटीत आजी कधी मक्याची कणसे भाजायची, कधी ज्वारीची कणसं भाजून हुरडा करायची, तर कधी हरभ-याचा हावळा भाजायची. ते लिंबू पिळून चटणी कालवून खाणं.. आहाहा..! अजूनही चव जीभेवर रेंगाळतेय. त्याचवेळी काही मोठी मुलं रस्त्याच्या कडेला शेकोटी करुन गप्पांचा फड रंगवत भोवताली बसलेली असायची. आम्ही लहान मुले तिथे गेलो की आम्हाला म्हणायची अरे आधी सासू घेऊन या बरं..! मगच शेका. भारी गंमत वाटायची ते ऐकून. (सासू-शेकोटीत टाकायला काटक्या) नंतर मैत्रिणींसोबत शेकोटीची मजा आली ती काॅलेजकॅम्पमध्ये. फक्त शेकोटीची ऊबच नाही तर ‘सातारचा म्हातारा शेकोटीला आला’ असे म्हणत बालगीतापासून ते चित्रपट गाण्यांची मैफलही रंगली. तेव्हा घरापासून दूर असताना तिने केवळ गरमाईच दिली नाही तर मायेची ऊबही दिली.

अशी ही अनेक आठवणी जागवणारी ‘शेकोटी.’ अनेक चित्रपटातील गाण्यांमध्ये स्थान मिळवणारी, गप्पांमध्ये मन मोकळं करायला लावणारी, केवळ ऊबच नाही तर मायेची ऊब देणारी. आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आली. किती वैविध्यपूर्ण रचना लिहिल्यात सर्व सारस्वतांनी. मायेच्या ऊबदारपणाबरोबरच, तिची परोपकारी भावना, स्वतः राख होणारी ती शेकोटी, तिच्या रंगाने भगव्याची आठवण देणारी, शहरी गर्दीतून गायब झाली तरी गावागावात अस्तित्व टिकवून असलेली, मनसखीची आठवण देणारी.. एकापेक्षा एक सरस रचना मनभावनच. असाच शब्दगंध दरवळत राहो या शुभेच्छांसह सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन..!!

स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक, लेखिका,सहप्रशासक
मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles