शाळा पूर्व तयारी व शाळेच्या नियोजनासाठी मुख्याध्यापक सभा संपन्न
भिवापूर: पंचायत समिती भिवापूर अंतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा दि १० जून रोजी बॉईज हायस्कूल भिवापूर येथे अनिता तेलंग गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवापूर यांच्या अध्यक्षतेखाली व विजय कोकोडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भिवापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
दि.27 जून 2022 पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून शाळा पुर्व तयारी संदर्भाने सभेचे आयोजन करण्यात आले होते. मा.तेलंग मॅडम यांनी सभेला मार्गदर्शन केले. डॉ.कोरडे सर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाळा यांनी शालेय विद्यार्थ्यांना कोविडची दुसरी लस देण्याच्या नियोजनाबाबत सर्व मुख्याध्यापकांनी सेवा देण्याबाबत संवाद साधला.
मा. विजय कोकोडे यांनी शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांची तसेच शालेय परिसराची स्वच्छता करून नवीन शैक्षणिक सत्रामध्ये उत्साहाने काम करण्याचे आवाहन केले.
सभेला दिलीप शहारे, राजेश शेटे विस्तार अधिकारी (शिक्षण), गोविंदा भोंडे शा. पो. आ. अधीक्षक , सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख, सर्व साधनव्यक्ती, समावेशित तज्ञ, विषेश शिक्षक व गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सभेच्या कार्यक्रमाचे संचालन संजय खोब्रागडे यांनी तर आभार श्रीमती मेघा गुरनुले यांनी मानले. वंदे मातरम गीताने सदर सभेची सांगता करण्यात आली.