संजय राऊतांनी घेतली श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट
कोल्हापूर : शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यू पॅलेसला भेट श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून महाराजांची भेट घेऊन दर्शन घेतल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा फोनवरून शाहू महाराजांशी फोनवरून संवाद झाल्याचे राऊत म्हणाले. संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप केला होता. तसेच छत्रपती घराण्याचा अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांना खडे बोल सुनावताना उमेदवारी नाकारली म्हणून छत्रपती घराण्याचा अपमान कसा होऊ शकतो ? अशी विचारणा काल केली होती.
या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी न्यू पॅलेसला जात शाहू महाराजांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. प्रबोधनकार ठाकरेंपासून छत्रपती घराण्याशी नाते आहे, आमच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे राऊत यांनी सांगितले. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांनी महाराजांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा समाचार घेत त्यांनी महाराजांना कोण चुकीची माहिती देईल असा सवाल केला.