
अश्लील व्हिडीओ कॉल करत खंडणी मागणं पोलीस अन् पत्रकाराला पडलं महागात
नंदुरबार : सध्या अश्लील व्हीडीओ कॉल करून खंडणी मागण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेच. असाच एक प्रकार नंदुरबारमधून उघडकीस आला आहे. नंदुरबारमधील एका स्थानिक महिलेने पोलिसाला हाताशी धरून एका सज्जन माणसाला आपल्या जाळयात अडकवून तब्बल नऊ लाख रूपयांची खंडणी उकळल्याची घटना समोर आली आहे.
तसंच एका तथाकथित पत्रकारानेही सदर पीडित व्यक्तीकडून खंडणी मागण्यास सुरूवात केल्याने तो आत्महत्या करण्याच्या मनस्थित असतानाच या व्यक्तीला वाचविण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर या प्रकरणी महिला, पोलीस आणि एका पत्रकाराला अटक करण्यात आली असून या तिघांना शहादा न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.
मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar) विशेष करुन शहरात व्यापारी, नोकरदार वर्ग यांचेशी अश्लील व्हिडीओ कॉल (Video Call) करुन ते रेकॉर्ड केल्याचे भासवून त्यांना बदनाम करण्याची धमकी देवून त्यांच्याकडून खंडणी मागण्याचे प्रकार सुरू होते. असाच प्रकार एका महिलेने सज्जन व्यक्तीसोबत केला आहे. व्हिडीओ कॉल दरम्यान सदर महिलेने अश्लील चाळे करुन तक्रादार व्यक्तीस उत्तेजीत केले व त्या महिलेने सदरच्या अश्लील चाळ्याबाबतचा व्हिडीओ (Video) तयार करुन घेतल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी तक्रारदारास पोलीस छोटु शिरसाठ याने फोन करुन बदनामी करण्याची भीती दाखवून मध्यस्थी करण्यास सुरुवात केली.
तसंच पीडित व्यक्तीकडे तब्बल १४ लाख रुपयांची मागणी केली. सामाजिक प्रतिष्ठा व बदनामीच्या भीतीने तसंच व्हिडीओ कॉलची क्लिप नष्ट करण्याच्या अटीवर पोलीस छोटु शिरसाठ याच्यामार्फत तक्रारदाराने सदर महिलेस ९ लाख रुपये दिले. तसंच काही दिवसांनी एक तथाकथीत पत्रकार अतुल चौधरी हा देखील तक्रारदारांकडून पुन्हा नऊ लाख रुपयांची मागणी करु लागला. त्यावेळेस तक्रारदार याने छोटु शिरसाठ तसेच सदर महिला यांचेशी संपर्क साधून व्हिडीओ कॉल असलेली क्लिप का डिलीट केली नाही? अशी विचारणा केली.
परंतु, सदर महिला व पोलीस (Police) छोटू शिरसाठ यांनी तक्रारदार यास कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्याने व पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली. तसेच तथाकथीत पत्रकाराच्या बाबतीत सुध्दा तक्रारदाराला बदनामीची भीती दाखवून छोटू शिरसाठ याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर दाखल गुन्ह्यातील आरोपी अश्लील व्हिडीओ कॉल करणारी महिला तथाकथीत पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात (चौधरी) वय ५० राहणार दत्त कॉलनी, कोरीट रोड, नंदुरबार. पोलिस छोटू तुमडु शिरसाठ वय ४६ रा. सदाशिव नगर, शहादा नंदुरबार यांना ताब्यात घेवून तत्काळ अटक करण्यात आली आहे.
अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओ कॉल करुन व बदनामी करण्याची भीती दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार ज्या नागरिकांसोबत झाले असतील अशा नागरिकांनी कसलीही भीती न बाळगता समोर येवून पोलीस ठाण्याला तक्रार द्यावी. तक्रारदार यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर पाटील यांनी केले आहे.