कॉंग्रेस नेते राहुल गांधीवर पोलीसांची कारवाई
_रस्त्यावर बसून आंदोलन करीत होते_
नवी दिल्ली: ईडीकडून सोनिया गांधी यांची चौकशी सुरु आहे. याआधी एकदा त्यांची चौकशी करण्यात आली आहे. ही दुसरी फेरी आहे. सोनिया गांधींसोबत प्रियंका गांधींदेखील ईडी कार्यालात पोहोचल्या आहेत. आंदोलनात सहभागी होण्याआधी राहुल गांधीदेखील ईडी कार्यालयात पोहोचले होते. नंतर राजधानी दिल्लीमधील आंदोलनात सहभागी झालेले राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यांना पोलिसांनी आधी घेरले नंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात गेल्या महिन्यात राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची चौकशी लांबली होती. राहुल गांधी राजपथ मार्गावर रस्त्यावर बसून आंदोलन करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना घेरले. तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याविरोधात तसेच महागाई, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवर राहुल यांनी आंदोलन केले. रस्त्यावर बसुन जवळपास राहुल गांधी अर्धा तास आंदोलन करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतले व इतर नेत्यांसोबत बसमधून नेले.
यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजे असून, देशात पोलिसांचे राज्य आहे, अशी टीका केली. पोलिसांनी आंदोलनानंतर सर्व कार्यकर्त्यांवर कारवाई केली. त्यानंतर राहुल गांधी एकटेच होते. त्यांच्यावर कारवाई करायची की नाही याबाबत पोलिसांमध्ये चर्चा सुरु होती.