अमृत मधुर व्हावे, स्वातंत्र्य भारताचे..!!

अमृत मधुर व्हावे, स्वातंत्र्य भारताचे..!!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

-अमृता खाकुर्डीकर, पुणे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एका शाळेने आयोजित केलेल्या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. 5 वी ते 7 वीच्या मुलांचे सादरीकरण सुरू होते. ती लहान लहान मुले मोठी समरसून, अगदी तालासूरात तयारीने गात होती. सुरवातीला जोशात “*सदैव सैनिका पुढेच जायचे*” आणि पुढे एकापेक्षा एक सुंदर गाण्यांनी वातावरण अगदी भारावून गेले.. ‘*ऐ मेरे प्यारे वतन*’ नी हृदयात कालवाकालव झाली. मूळात हे गाणं मन्ना डे यांच्या खर्जातल्या आवाजाने आणि धीर गंभीर गायिकीने हृदयात कोरलं गेलेलं.
त्यामुळे हे गाणं कुठूनही ऐकायला आलं तरी मनात काहीतरी दाटून येतं “कर चले हम फिदा जानो तन साथियों” ने डोळ्यातून पाणी घळघळू लागले.
‘जहाँ डाल डाल पर सोनेकी चिडियाँ करती है बसेरा*’ चे गोड शब्द सोनेरी भारताचं सुंदर चित्र रंग भरू लागले.
असे एकीकडे देशभक्तीत रंगून गेलेलं मन, मात्र दुसरीकडे अंतर्मुख होऊन वेगळाच विचारात गुंतले “कुठे स्वातंत्र्य?कुणा स्वातंत्र्य? किती स्वातंत्र्य?” या धारदार प्रश्नारार्थ कवितेने डोक्यात धुमाकूळ घातला.
खरंच आपण स्वतंत्र आहोत? एक व्यक्ती म्हणून, समाज म्हणून..! स्वातंत्र्य चळवळीत अगणित लोक ज्या स्वातंत्र्यासाठी लढले, ते स्वत्त्वं खरंच जपलं जातंय का? 75 वर्षापूर्वी मिळालेल्या स्वातंत्र्याचा पूर्वइतिहास त्याआधीच्या 100 वर्ष सुरू होता. या स्वातंत्र्य संग्रामात कुणी फासावर चढले. कुणी तुरूंगात अनन्वित छळ सोसले, परकीय जुलमी सत्तेकडून अनंत हाल आपेष्टा सहन केल्या. जिवाची पर्वा न करता भूमिगत राहून काम करीत राहीले. घरादाराची पर्वा न करता संसाराची राखरांगोळी करून स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडात उडी घेतली.लहान-थोर,स्त्रिया,गरीब-श्रीमंत-आदिवासी सर्वच वर्गातले,थरातले लोक आंदोलनात उतरले.
क्रांतीकारकांचा त्याग, स्वातंत्र्यसेनानींची तळमळ, दीर्घकाळ चाललेली आंदोलने, उपोषणे यातून मोठ्या कष्टाने मिळवलेल्या या स्वातंत्र्याचे मोल, खरंच आपण जाणतो का.. स्वराज्य,तर त्यांनी मिळवले, पण आपण त्याचे सुराज्य करू शकलो का…आजच्या भौतिक सुखात लोळणा-या, चंगळवादात बुडालेल्या वर्गाची सद्य स्थिती पाहता, त्या उदात्त त्यागाची, याद तरी ऊरली आहे का, असा प्रश्न पडतो.
सध्याचं भारतीय समाजजीवनाचं वास्तव म्हणजे, एकीकडे अतिश्रीमंत लोक आपल्या वेगळ्याच सुखलोलुप जगण्यात मश्गूल तर दुसरीकडे आजुनही साध्या साध्या सुविधांपासून वंचित असलेली खेडी. इथल्या व्यवस्थेत त्रूटींचा सामना करीत संघर्षमय जीवन जगणारा सामान्य मध्यमवर्गीय, शेतकरी,मोलमजुर,गोरगरीब! हे सत्य कसं नाकारणार?स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर अजुनही अनेक प्रश्न पोखरत आहेत. सत्ता हाती देऊन इंग्रज निघून गेले.त्यावेळचा आनंद गगनात मावत नव्हता. पण आज सत्तेचे वास्तव सुजाण वर्गाला आणि विचार करणा-या मनाला औदासिन्य यावं, असं आहे. सत्तापटलावरची साठमारी, त्या माध्यमातून गैरमार्गाने जमवलेली कोटी-कोटीची माया, पुढा-यांचे असंवेदनाशील वर्तन आणि बेताल वक्तव्ये, यात पराकोटीला गेलेले संघर्ष जनतेला एका नकारात्मकतेकडे घेऊन जात आहे.विरोधाचं
रूप द्वेश, इर्षा, आणि एकमेकांना संपवून टाकणे इथपर्यंत भयाण टोकाला जातेय…
बँका लूटणा-या बड्या धेंडांपासून देशाची लूट सुरू होते, ते बसस्टाॅप, उद्यानात उभारलेल्या लोखंडी शेड, बाकडे, मेनहोलची लोखंडी झाकणं चोरून नेणारे भुरटे, इथपर्यंत देश ओरबाडायला टपलेल्या विविध घटकांचा मोठा विस्तार आहे. त्यात टॅक्सचोरी आणि काळा पैसा यांची भूमिका किती मोठी आहे, ते आपण जाणतोच!
ग्लोबल जगाचे नागरिक होवू पाहणा-या आजच्या युगात आपल्या देशाची तुलना आपण जगातल्या प्रगत समृध्द देशांशी करतो आणि आपल्याच देशाला कमी लेखतो. पण असं जगाच्या तुलनेत बघायचंच झालं तर आपल्यापेक्षा इतर देश आपला देशाभिमान जास्त प्रखरपणे जपतात, हेच
जाणवेल. आपल्या राष्ट्राचं हित सांभाळून राष्ट्रीय भावना मनापासून जपणा-या देशांनी मोठी प्रगती केलेली दिसते.उदा.रस्त्यावर चुकूनसुध्दा कागदाचा कपटाही न टाकणा-या जागरूक नागरिकांचा देश, पदवी शिक्षण पूर्ण झालं की सैन्यात सेवा देणा-या युवकांचा देश, पाण्याचा थेंब थेंब वाचवून ठिबक सिंचनाने शेतीत प्रगती करणा-या शेतक-यांचा देश, अशी कितीतरी उदाहरणं जगाच्या पाठीवर आहेत, अशी उदाहरणं बघून आपलं देशप्रेम आपल्याला तपासून घ्यावं लागेल. स्वतःच्या देशाच्या संपत्तीची लूटमार करणारे देशबांधव असल्यावर या देशाचे हितरक्षण कठीणच.
‘यथा राजा तथा प्रजा’ या न्यायाने जनतेचीही वर्तणुक कर्तव्याचा विचार न करता हक्कासाठी भांडणारी. विविध गटांची स्वहितार्थ आंदोलने. दंगली, हिंसा. त्यातून न भरून येणारं राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान, याचा आपण एक राष्ट्र म्हणून विचार करत नाही, हेच दिसते.
या सगळ्या उलट-सुलट घडामोडीत दूर फेकला गेलेला सामान्य माणूस, जो अजुनही लोकशाहीच्या कल्याणकारी राज्याचे स्वप्नं पाहतो. निवडून आलेले आपले लोकप्रतिनिधी जनहितासाठी काहीतरी करतील या विश्वासाने दर पाच वर्षांनी मतपेटीतून आपले कर्तव्य बजावतो. स्वतःचे दैनंदिन जगणे विविध व्याप-तापांनी कसबसं ओढत राहतो. यातून पदरी पडते, फक्त निराशा.
येथे नसो निराशा …थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला .. येथेच माधवाने
सद्यस्थितीचा असा लांबलचक आढावा मनाशी घेत असताना समोरच्या बालचमूच्या मुखातून कानावर हे शब्द पडले..
……………. ……………
शीर उंच उंच व्हावे.. हिमवंत पर्वतांचे
आ चंद्र सूर्य नांदो .. स्वातंत्र्य भारताचे*

विचारांचे भोवरे थांबवून मी समोर बघितलं. ती
गाणारी मुलं-मुली अबोध वयातली. गोड चेहरे. त्यावरची अपार निरागसता. निस्सीम देशभक्ती स्फूरण चढलेल्या स्वरांमधून ओसंडून वाहात होती… बाईंनी-सरांनी जितक्या जोशात त्यांना शिकवलं असेल, त्याच्या दुप्पट जोशात मुलं आपल्या देशाचं गुणगाण गात होती. त्यांच्या मनाच्या पाट्या स्वच्छ को-या. त्यावर आपण जे रेखाटू ते उमटेल अशा. इतकावेळ मनातल्या मनात ज्या कुठल्या नकारात्मक विचारांच्या रेघोट्या मी ओढत बसले होते,त्याचा मागमूसही त्या समोरच्या वातावरणात नव्हता. उलट,आपल्या वर्गमित्रांनी गायलेली गाणी मनापासून ऐकणा-या समोरच्या बालगर्दीच्या चेह-यावर खू..प मोठासा आनंद विलसत होता.त्यांचा शिक्षकवृंद उत्साहाने टाळ्या पिटून मुलांना प्रोत्साहन देत होता. पालक मुलांच्या कौतुकात भिजले होते. ड्रम,ढोल,ताशा,बिगुल,अशा वाद्यवृदांच्या झणात्कारातून सगळा भोवताल चैतन्य
मय झाला होता.
हेच चैतन्य, हाच जोश, हाच उत्साह, हेच देशप्रेम या मुलांच्या मनात खोलवर ठसावे,समोर दिसणारी ही भावी पिढी मनात कायम अशीच देशभावना जागती ठेवून मोठी व्हावी, या विचाराने माझ्या मनातली निराशा पार विरून दूर पळून गेली.
वाटलं…अजुनही इतकं काही बिघडलं नाही, जे बिघडलंय ते पुन्हा घडवता येईल.
स्वातंत्र्य लढ्याच्या गाथा या मुलांच्या मनात अशा ठसायला हव्या. हुतात्म्यांचे बलीदान यांना विसरू देता कामा नये.देशाने सर्व क्षेत्रात केलेली प्रगती, ज्ञान-विज्ञान- तंत्रज्ञान या क्षेत्रातील आधुनिक जगासोबत सुरू ठेवलेली घोडदौड यांना सांगायला हवी. इस्त्रोने श्रीहरीकोटातून शालेय मुलींनी तयार केलेला उपग्रह अंतरिक्षात पाठवला,
तो पहिल्या प्रयत्नात पोहचू शकला नाही, याचे वृत्त आपण ऐकले, पाहीले. पण..म्हणून ईस्त्रोने आपला इरादा बदलला नाही. ती मोहीम पुन्हा आखली जाईल,अशा मोहीमा पुन्हा नक्की व्हायलाच हव्या.
सुईपासून क्षेपणास्त्रापर्यंत विकासाच्या मार्गावर आपला देश पुढे जातो आहे. हे घवघवीत यश ठळक व्हायला हवे.आजचा भारत जगात जो मान
सन्मान मिळवतोय ते दाखवून द्यायला हवे. मैदानी खेळापासून ते काँम्प्युटर तंत्रापर्यंत नवे शोध लावणा-या ऊभरत्या प्रतिभांची ओळख करून द्यायला हवी. तसंच कुठल्याही क्षेत्रात जिद्दीने कोणतेही कठीण ध्येय साध्य होते, हा सामर्थ्याचा प्रेरणामंत्र लहानपणीच मुलांना मिळाला, तर आजचा वर्तमान काहीही असो, भविष्य मात्र आशादायक असेल. पंचविस वर्षांनी हिच मुलं स्वातंत्र्याचा शतक महोत्सव दिमाखाने आणि सार्थ अभिमानाने साजरा करतील.
त्यासाठी आज देशप्रेमाची गाणी शिकवणारे मुलांचे हे शिक्षक फक्त कार्यक्रमापुरते नव्हे तर विद्यार्थ्यांना घडवताना पुढेही देशभक्तीचा संस्कार असाच देत राहोत. पालकांनी आपल्या आचरणात देशहित जपले तर मुले आपोआपच अनुकरण करतील. त्याचं मोल मुलांना वेगळं समजावून सांगावे लागणार नाही.
जगातल्या बलाढ्य देशात महायुध्द झाली, त्याचे भयाण परीणाम सा-या जगाने भोगले. ती होरपळ आजही नको वाटते म्हणून पुन्हा महायुध्द होवू नये, यासाठी भारतासह सर्व शांतताप्रिय देश प्रयत्नशील आहेत. याच भावनेतून त्याहीवेळी शक्तीमान अशा इंग्रजांकडून शांततेच्याच मार्गाने भारताने स्वातंत्र्य मिळवले.
“भारत छोडो” ,”चले जाव” या जनआंदोलनाच्या माध्यमातून अहिंसेच्या मार्गाने स्वराज्य मिळाले. त्यामागे सामान्य माणसाची शक्ती एकवटली होती.
स्वातंत्र्य लढ्याचा हा दैदीप्यमान इतिहास सामान्य माणसाने रचला. क्रांतीकारकांनी सुरू केलेला उठाव जनआंदोलनात रूपांतरीत झाला, आणि स्वातंत्र्याची पहाट बघण्याचे भाग्य एतद्देशियांच्या पदरी पडलं! सामान्य जनतेच्या मनात जाग्या झालेल्या प्रखर चेतनेमुळे बलाढ्य इंग्रज नामोहरम झाला. परदास्याच्या जड शृंखला गळून पडल्या आणि स्वातंत्र्याचे मधुर फळ हाती आलं. जन आंदोलनाचा हाच प्रभाव आजही आपला खरा मौल्यवान ठेवा आहे, 75 वर्ष उलटून गेले तरी हे सत्य बदलेलं नाही. उपोषण आणि आंदोलन करून आजही हे अहिंसक हत्यार लोकशाही राज्यात सर्वात प्रभावी ठरते.
हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या निमित्त सरकारी पातळीवर,अनेक संस्था, शाळा- काॅलेज यांनी विविध उपक्रम राबवले. गुणी गाणी गायिली, कुणी व्याख्याने दिली, कुणी वृक्षारोपण केले तर कुणी बिया पेरल्या. परीणामतः स्वातंत्र्याची ही उदात्त गौरवगाथा मुलांच्या मनातही पेरली गेली.
प्रेरणेची ज्योत जागली.हे चित्र असेच कायम रहावे.
ज्यामुळे नवी लढाई लढायला बळ मिळेल. फरक ईतकाच; की आजची ही लढाई परकीय शत्रुशी नाही, तर स्वकीयांमध्ये लपलेल्या शत्रुशी आहे. म्हणूनच ती अवघड आहे पण..अशक्य नाही…
येथे सदा निनादो
जयगीत जागृताचे
*अमृत मधुर व्हावे*
*स्वातंत्र्य भारताचे*….

-अमृता खाकुर्डीकर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles