
‘वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन’ हाच उपाय बापूजी अणे जयंतीनिमित्त परिसंवादातील सूर
नागपूर : महाराष्ट्रात राहून विदर्भाचे भले होणार नसल्यामुळे वेगळे होण्याचा एकमेव पर्याय आहे आणि त्यासाठी मोठे जनआंदोलन उभारणे आवश्यक आहे असे मत आज एका परिसंवादात व्यक्त झाले.
लोकनायक बापूजी अणे जयंतीनिमित्त अणे स्मारक समिती, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे उपाध्यक्ष विश्वास इंदूरकर होते. सिंचनाच्या कमतरतेमुळे विदर्भातील शेतीची आणि शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. ती सुधारण्यासाठी जोमाने प्रयत्न होण्याची गरज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी बोलून दाखविली. विदर्भाच्या हक्काच्या योजना आणि निधी योग्य तऱ्हेने मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दक्ष राहून पाठपुरावा केला पाहिजे. अशी मागणी जनमंचाचे प्रमोद पांडे यांनी यावेळी केली.
वेगळा विदर्भ मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांनी एका व्यासपीठावर यावे आणि जनतेने आळस झटकून तेलंगणासारखे निर्णायक आंदोलन उभारले पाहिजे. असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी केले. अणे स्मारक समितीच्या सचिव एडवोकेट भारती दाभाडकर यांनी परिसंवादाचे संचालन केले.