
‘धुरांच्या रेषा’ आपणच जपायला हव्यात; प्रा. तारका रूखमोडे
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
‘ती’ सोनेरी दुपार, तोफांच्या सलामीचा आवाज पसरला आसमंती. महाकाय इंजिनांच्या आवाजांचे भोंगे वाजवले गेले कर्णभेदी. काळ्या पोशाखातील पोटात बसलेले खलाशी कोळसा ओतत होते आगीत. सर्वांच्या नुरावरील भाव होते विस्मयादि..नि बिनबैलांची, बिनअश्वाची..झुकू झुकू आवाज करीत. छोट्या लोखंडी रुळांवर ती दिमाखात मिरवत होती. सोडलेल्या धुरांच्या रेषा आषाढ मेघांसम नभात फिरकत होत्या.
होय, अगदी बरोबर. ‘झुकूझुकू झुकूझुकू आगीनगाडी’ धुरांच्या रेषा हवेत काढीत. कोळशाच्या आगीवर 16 एप्रिल 1853 रोजी देशात पहिल्यांदा बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे धावली. घोड्याच्या मदतीशिवाय नुसत्या वाफेने आगगाडी चालणे व हत्तीपेक्षा जास्त वजनाचे ओझे वाहून नेणे हे सर्वसामान्यांच्या आकलना पलीकडले होते. म्हणून हा सोहळारूपी जल्लोष बघण्यासाठी लोक जागा मिळेल तिथे रस्त्याच्या कडेला दुतर्फा दाटीवाटीने उभी होती. डोंगरी किल्ल्यांच्या तटावरून तोफांची सरबत्ती झाली. नि राज्याचा परिवहनरूपी विजय ध्वनिरूपात सर्वांनी अनुभवला. तब्बल पाचशे प्रवाशांनी हा जादुई चमत्कार निसर्ग आस्वाद घेत स्वतः प्रवास करून अनुभवला. झुकूझुकू आगीनगाडी व तिचं हे गीत म्हणजे रेल्वे नामक युगाशी आपली झालेली बालपणीच ओळख. जी देते प्रवासाचा आस्वाद व पुढे ठरली क्रांतीचे हत्यार..! व आता दळणवळणाचे आरामदायी साधन.
खरंच शक्ती निर्माणाचं साधन म्हणून ‘जेम्स वॅट’ यांनी वाफेवर चालणारं पहिलं इंजिन बनवलं व पुढे ब्रिटिश इंजिनियर जाॅर्ज स्टीफन्सन याने राॅकेट नावाचं वाफेवर चालणारं डबे ओढणारं इंजिन तयार करून लिव्हरपूर ते मँचेस्टर या जगातल्या पहिल्या रेल्वेमार्गावर चालवलं. नंतर आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठच्या विनंती प्रस्तावावरून देशात पहिली आगगाडी रुळावर धावू लागली व याच जाळ्यातून माल वाहतूक अद्यापही सुरू आहे व जग जवळ आले आहे.
पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेलं. या तंत्रज्ञानात रेल्वे वीज ऊर्जेवर धावू लागली. नॅरोगेजचे ब्रॉडगेज झालेत, तरीही ज्या ठिकाणी वीज नाही अशा दुर्गम भागात वा आदिवासी भागात मात्र अजूनही याच जीवनवाहिन्या तेथे दळणवळणाचा दुवा सांधत आहेत..! नवीन वंदे भारत, शताब्दी यासारख्या अतीजलद वाहिन्या जरी आल्या. तरी वाहिन्यांच्या नूर तोच आहे; पण झुकूझुकू आवाज बदललाय, धुरांच्या रेषा राहिलेल्याच नाहीत.ज्या धुराच्या ऐतिहासिक परिश्रमावर ही क्रांती घडून आलेली. त्या धुरामागचा इतिहास मात्र काळाच्या धुरांड्यात वाहून जाऊ नये. पुढच्या पिढीची ह्या आगगाडीच्या धुरांच्या रेषेशी नाळ जुळलेली रहावी. त्याच्या किमयारुपी आविष्कार खुणा मिटू नयेत व वाफेच्या इंजिन बनवणाऱ्या त्या दिग्गजांच्या निर्मात्यांच्या आठवणी राहाव्यात. कवी व साहित्यिकांनी त्याला आपल्या काव्यात गुंफून त्याची रुजवण पुढच्या पिढीत करावी. त्यामागचे परिश्रम कळावेत, ह्या सर्व बाबींना उजाळा देण्यासाठी आ. राहुल सरांनी कदाचित हे चित्र दिलेलं. झुकूझुकू गाडीचं हे गाणं रेल्वे अस्तित्वात आहे तोपर्यंत मात्र अजरामर राहील. यास अधिक उजाळा आपण सर्व कविवर्यांनी आपल्या हायकूतून दिलाय. तेव्हा
सर्वांचं अभिनंदन. आ. राहुल सर आपण मला हायकू परीक्षण लेखनाची संधी दिलीत.त्याबद्दल आपले हृदयस्त ॠणाभार..!
प्रा. तारका रूखमोडे
अर्जुनी मोर,जि गोंदिया
मुख्य परीक्षक, सहप्रशासक, कवयित्री, लेखिका, सहसंपादक