अरे , लग्न झालं वाटतं !; पल्लवी पाटील

अरे , लग्न झालं वाटतं !



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जोपर्यंत गाव छोटं होतं, प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखत होतं परकं , अपरिचित कुणीच नव्हतं , कोणीही असो ” आपलं ” होतं ! एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायला कुठलंही वाहन लागायचं नाही. आम्ही येउत का ? तुम्ही घरीच आहात का ? असं विचारावं लागायचं नाही . माणसं सतत एकमेकाला भेटत रहायची , बोलत राहायची , सारं काही सांगत रहायची . कुठल्यातरी निमित्याने भांडण झाल्या शिवाय संवाद खुंटतच नव्हता . भांडण म्हणजे उगी थोडीशी कुरबुर , अर्थात दोन दिवसात ” दो ” व्हायची आणि पुन्हा बोलणं सुरू व्हायचं ! म्हणजे लहानपणी , गावाकडे , ” न करमन्याला वावच नव्हता .”

बरं सगळ्या गोष्टी जवळ होत्या. दुकान , शाळा , राम मंदिर , मारुतीचा पार , बॉ फरीद , बस स्टॅण्ड सगळं हाकेच्या अंतरावर , त्यामुळे चालणं व्हायचं आणि ओळखीचं *माणूस दिसलं की बोलणं व्हायचं ! पुन्हा भजन , पूजन , रामायण , भागवत , हरिपाठ , देवळातल्या पंक्ती , दिंडी , पालखी , गुरवारची पंचपदी माणसाला रिकामपणच नव्हतं .समाणसं busy होती , पण income नव्हतं , त्याच्यामुळे स्पर्धा , आसूया , चिंता , काळजी या गोष्टींना थाराच नव्हता .
आणि बायांना तर भलतेच कामं होते .त्यांच्या वाट्याच्या कामाची नुसती यादी जरी नवीन पिढीने केली तरी त्यांच्या छातीत कळ येईल . अजून एक गोष्ट …. इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतं ABCD …….XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच ! आणि आता
ABP माझा , CID , MRI , X-ray , Z-TV विचारूच नका .
आमच्या लहानपणी , This is Gopal . अन That is Seeta .हे दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायचे तरी जबरदस्त कौतुक व्हायचं !

आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्या सारखंच वाटायचं ! अहो कंडक्टर याच्यामुळे की …..आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने , हं sss काय रे बाळ मोठेपणी तू काय होणार ? असा प्रश्न विचारला की ते पोट्ट हमखास म्हणायचं ….. मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार ! तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळालं असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं. फक्त एवढंच विचारायचे …पहिल्या झटक्यात पास झालास न ? आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा ! म्हणजे पहा सुखाच्या , आनंदाच्या , मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या ! लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो , त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं .

तुम्ही बघा पूर्वी …. गाव छोटं , घर छोटं , घरात वस्तू कमी , पगार कमी , त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी
उसनपासन केल्या शिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता , तरीही मजा खूप होती! तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं ! उसनपासन करावंच लागायचं …… साखऱ्या , पत्ती , गोडेतेल , कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता त्यामुळे कोणाकडे ” हात पसरणे ” म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही . उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा ” कमीपणा ” वाटत नव्हता ! डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृत अंजनच एक बोटं उसन मागायला सुद्धा अजिबात लाज वाटली नाही .
घरातल्या वडील माणसासाठी 10 पैश्याच्या तीन मजूर बिड्या किंवा 15 पैशाचा सूरज छाप तंबाखूचा तोटा आणतानाही मान कशी ताठ असायची !

कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं ! गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती , कारण शेजाऱ्या-पाजाऱ्या कडून पोह्याच्या प्लेट , चमचे , बेडशीट , तक्के , उषा , दांडी असलेले कपं आदी साहित्य मागून आणल्या शिवाय ” पोरगी दाखवायचा कार्यक्रम ” होऊच शकत नव्हता ! आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती , ते आत्ता कळतंय ! आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही ! जेंव्हा States वर डान्सचा व्हिडीओ येतो तेंव्हा कळतं , अरे लग्न झालं वाटतं ! हे सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश आहे. भेटत रहा , बोलत रहा , जाणे-येणे ठेवा , विचारपूस करा ….. जेवलास का ? झोपलास का ? सुकलास का ? काही दुखतंय का ? असे प्रश्न विचारतांना लागलेला मायेचा , काळजीचा , आपुलकीचा कोमल स्वरच जगण्याचं बळ देत असतो. माणसा शिवाय ,गाठीभेटी शिवाय , संवादा शिवाय काssssही खरं नाही !

ऐड.पल्लवी पाटील, नागपूर
निवासी संपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध’
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles