मानवतेची गुढी उभारू या…!!! सविता पाटील ठाकरे

मानवतेची गुढी उभारू या…!!!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

महाकवी कालिदासांनी ‘उत्सवप्रिय: खलु मनुष्य:’ असे यथोचितच म्हटलेले आहे. लहान मोठे सर्वांना सण, उत्सव आवडतात. कारण. रोजच्या रुक्ष जीवनातून मुक्ती देण्याचे काम सण उत्सव करतात. भारतीय संस्कृतीत तर याला अनन्य साधारण असे महत्त्व आहेच. खरंतर भारताचा सांस्कृतिक इतिहास पुस्तकांच्या पानात नाही तर त्यांच्या जिवंत उत्सवात लिहिलेला आढळतो. या उत्सवांच्या मागे असलेली दृष्टी ही संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने असलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे.

असाच एक महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा..! चैत्र प्रतिपदेला महाराष्ट्रात ‘गुढीपाडवा’असे म्हणतात. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे. या दिवसापासून शालिवाहन शकाची सुरुवात होते. मराठी नववर्षाचा आरंभ होतो. यामागे अनेक आख्यायिका, कथा आहेतच. गुढी उभारल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते व आनंद उल्हासाचे पर्व सुरू होते. असेही कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी पूर्वीपासून गुढी उभारण्याची परंपरा आपण जोपासत आलेलो आहोतच. चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून त्यामुळे नाना प्रकारचे आजार होतात. अश्या आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडूनिंबाचे पूजन सांगितले आहे.

आज विज्ञान युगात वावरताना नव्या पिढीला सण व उत्सवाचे महत्त्व कमी होत असताना मी नेहमीच पाहत आहे असे सण घरात साजरा केल्याने त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होण्यास मदत होते व हा वारसा पुढे जपण्याच्या दिशेने पाऊल ही टाकले जाते. पहाटे लवकर उठून गुढी उभारतात, गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात.

असेही माणसा माणसातली मानवता कमी होताना आपण पाहत आहोत, तेव्हा असे सण उत्सव हे मृतवत बनलेल्या मानवामध्ये नवचेतना भरून त्याची अस्मिता जागृत करण्याचे काम करतात. सोबतच आपण जन्माला येताना काहीही घेऊन आलेलो नाहीत व जातानाही घेऊन जाणार नाहीत त्यामुळे इथे मिळालेली शक्ती, संपत्ती बुद्धी हे सर्व ईश्वरदत्त आहे हे समजावून,समर्पणाची भावना उत्सव माणसांमध्ये वाढीस लावतात. तेव्हा सण उत्सवांचं प्राचीन स्वरूप जोपासताना त्यात आवश्यकतेनुसार थोडाफार बदल करून हे सण साजरा करण्याचा आनंद लुटुयात व नव्या पिढीकडे हा वारसा संक्रमित करण्याचे पुण्य कर्म पार पाडूया हीच अपेक्षा.

नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा

सविता पाटील ठाकरे,सिलवासा
कार्यकारी संपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध’
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles