
‘अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर…’;
_काकांच्या आठवणीने धनंजय मुंडे भावूक_
मुंबई: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. अजूनही आठवतो तो ३ जूनचा काळा दिवस… आजही असं वाटतं अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर… अप्पा तुम्ही नाहीत, पण तुमची चेतना आजही आमच्यात आहे, तुमचा आवाज आजही कानात घुमतो! भावपूर्ण आदरांजली अप्पा… , असे धनंजय मुंडे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
धनंजय मुंडे हे शुक्रवारी सकाळी गोपीनाथ गडावर जाणार आहेत. तसेच ते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्याकडून गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातून मुंडे समर्थक उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे यावर्षी या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेदेखील उपस्थित राहणार आहेत. मध्य प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची वाट सुकर केली होती. त्यामुळे पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावर शिवराज सिंह चौहान यांचा सत्कार करणार आहेत. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांच्याकडून आगामी राजकीय वाटचालीविषयी महत्त्वपूर्ण भाष्य केले जाऊ शकते. त्या विधान परिषद निवडणुकीसंदर्भात काही बोलणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
पंकजा मुंडे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत संकेत दिले होते. त्यांनी म्हटले होते की, माझी भूमिका मी कार्यकर्त्यांसमोर मांडेन. कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे मला न बोलता कळतं. त्यामुळं कार्यकर्त्यांचा आणि माझा भविष्यातील प्रवास कसा असणार याचा संकल्प करणार आहोत, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.