
मराठवाड्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया पूर्ण
मुंबई: महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांच्या नामांतरावरून वाद सुरू असल्याचे चित्र आहे. त्यात औरंगाबाद, अहमदनगर ही नावे आघाडीवर आहेत. औरंगाबादच्या नामांतरावरून मागील काही दिवसांत झालेले राजकारणही सर्वश्रुत आहे. दरम्यान आता शिवेसना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
मराठवाडा विभागातील औरंगाबादचं नाव संभाजीनगर व उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याची कागदपत्रं व संपूर्ण फाईल तयार झाली आहे. ही नवी नावं कधीही घोषित होतील, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदेशीर बाबी पूर्ण करणार आहेत, असे विधान खैरे यांनी केलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक चर्चाना उधाण आले आहे. औरंगाबादच्या आणि उस्मानाबादच्या नामांतराची मागणीही जुनी आहे. यावरून बऱ्याचदा राजकीय वाद झाले. परंतु अजूनही याबाबत ठोस निर्णय नाही. परंतु आता चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा नामांतराचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
कारण या नामांतरांना काँग्रेसचा विरोध आहे. यावरून महाविकास आघाडीत अनेकदा वादही झाला आहे. तर या नामांतराला एमआयएमनेही विरोध केला आहे. त्यामुळे आता खैरे यांनी केलेलं वक्तव्य खरे आहे का? जर खरे असेल तर ही प्रक्रिया कधी पूर्ण होईल? अन असे झाले तर महाविकास आघाडीत मतभेद होणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.