
फडणवीसांचा ‘गनिमा कावा’ यशस्वी; अपक्षांना एकवटण्यात ‘मविआ’ला अपयश
मुंबई/ नागपूर: राज्यात काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीबाबत बोलताना राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात की, ”देवेंद्र फडणवीस यांनी चतुराईने कोणतीही बडबड न करता शांतपणे रणनिती आखली आणि यात त्यात यश आलं. मतपत्रिका कोणाला दाखवावी, कशी दाखवावी याबाबत महाविकास आघाडीच्या आमदारांना नीट प्रक्षिशण द्यायला हवं होतं. पण तसे न झाल्याने मतदानांवर आक्षेपाचा मुद्दा उपस्थित झाला. तसेच अपक्षांना आपल्या बाजूला घेण्यात महाविकास आघाडीला अपयश आले आहे. पण भाजपला अपक्षांना आपल्या बाजूला घेण्यात यश आलं. एकूण भाजपनं सायलंट ऑपरेशन राबवलं आणि राज्यसभा निवणुकीत बाजी मारली. फडणवीसांनी केलेला ‘गनिमी कावा’ अखेर यशस्वी झाल्याचे पहायला मिळाले.
*अपक्षांना एकवटण्यात ‘मविआ’ अपयशी*
राज्यसभा निवडणुकीत २८७ पैकी २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना मात्र उच्च न्यायालयानेही परवानगी नाकारल्याने मतदान करता आले नाही. एकूणच महाविकास आघाडीला अपक्षांची नाराजी दूर करण्यात अपयश आलं.
काल उमेदवारांबरोबरच नेत्यांचीही धाकधूक वाढविणार्या राज्यसभेच्या चुरशीच्या लढतीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. या आखाड्यात त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय पवार यांना चितपट करून अस्मान दाखविले. शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरविल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत व काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हे निवडून आले.
मतदानाच्या आक्षेपानंतर अखेर साडेआठ तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निर्णय राज्य निवडणूक आयोगाला कळविला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ही प्रत निवडणूक यंत्रणेला दिली. त्यावेळी शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत अवैध ठरविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली. त्यानंतर पहाटे ३.४७ वाजता धनंजय महाडिक जिंकल्याचा निकाल जाहीर झाला. महाडिक यांनी या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. फडणवीस यांनी आखलेल्या रणनितीमुळेच आपण जिंकल्याची प्रतिक्रिया महाडिक यांनी विजयी झाल्यानंतर दिली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, आमचे एक मत बाद केलं. काही बाहेरची अपेक्षित मत आम्हाला पडली नसल्याचे म्हटले आहे. भाजपनं जागा नक्कीच जिंकली पण विजय झाला असं मी म्हणत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीनंतर मतमोजणीपूर्वी शह-काटशहाचे राजकारण रंगले. पण अखेर फडणवीस यांची पहाटेची राजकीय खेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भारी पडली. याआधी २०१९ मध्ये फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी अजित पवारांना सोबत घेऊन राजभवनावर पहाटेच्या वेळी शपथ घेतली होती. त्या पहाटेच्या राजकारणाची आठवण जनतेला पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने झाली आहे.