
शिक्षणाच्या नंदनवनात बांडगुळांची भरभराट
_तेरा वर्षापासून ‘राशीत’ खेळणा-या गुरूजीला पडला बदलीचा विसर_
विशेष प्रतिनिधी, भंडारा
भंडारा: उदात्त भावना उराशी बाळगून आम्ही मुलांना घडवितो. ‘जे न देखे रवी वो कर दिखाये मुवी’ असा शिक्षणाच्या नावावर मुलांच्या पालकांकडून शाळेसाठी स्वमर्जीने ‘राशी’ मागण्याचा प्रकार मागील तेरा वर्षापासून स्मार्ट शाळेतील मुख्याध्यापकाकडून सुरु असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. शिक्षण क्षेत्राच्या या नंदनवनात बांडगुळांची यानिमित्ताने झालेली भरभराट जिल्हावासियांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सुसंस्कृत समाज व देशाचे जबाबदार नागरिक घडवण्याचे काम ज्या शिक्षण क्षेत्रातून होते त्याच शिक्षण क्षेत्राचा स्वार्थासाठी उपयोग करून घेत स्वतःची तुमडी भरण्याचा सपाटा काही पांढरपेशा व्यक्तींनी लावल्याची बाब अनेक वेळा उघडकीस आली आहे. साहजिकच त्यांचे हे ध्येय साध्य करण्यासाठी फितूर नोकरशाहांची व राजकारण्यांची शंभर टक्के मदत होते. त्यामुळे पांढरपेशांचीची उखळे पांढरी झाली की स्वराज्याचा स्वर्ग हाती आल्याचा आभास त्यांना होतो. परंतु काही वेळानंतर सत्य परिस्थिती समोर येते व त्यांचा हा भ्रमाचा फुगा फुटतो. परिणामी त्यांची ही बनवाबनवी जनतेसमोर उघड होते. यानंतर जनतेच्या दरबारात त्यांची किंमत शून्य होते.
असाच काहीसा किस्सा श्रावणाच्या पहिल्या आठवड्यात भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका राज्यभर नावाजलेल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांच्या बाबतीत घडल्याचे समोर आले आहे. हे मुख्याध्यापक तेरा वर्षापासून एकाच शाळेत ठिय्या मांडून बसले असून त्यांनी या कालावधीत ‘राशी’ जमविण्याच्या नादात स्वत:ची बदली करुन घ्यावी असे आजतागायत त्यांना वाटले नाही.
जिल्हा परिषद शाळा प्रवेशासाठी फि आकारात नसतांना या मुख्याध्यापकाने ग्रामस्थांची दिशाभूल करीत ‘देणगी’च्या नावाखाली रोख रकमेची मागणी करीत हा गोरखधंदा सुरु केला आहे. देणगी स्वरूपात प्राप्त रकमेची आजवर कोणत्याही पालकाला साधी पावती दिली नाही की, त्याबाबत ‘लोकसहभाग’ खाते बँकैतही उघडले नाही. थातूर मातूर दुरुस्तीच्या नावाखाली या रकमेचा विनियोग केल्याचे दरसाल गावक-यांना सांगण्यात येत असल्याचे ऐकिवात आहे. देणगी स्वरूपात रक्कम घेऊन त्याची पावती न देण्याचा ठराव शालेय व्यस्थापन समितीच्या परवानगीने झाल्याचे हे महाशय सांगतात. परंतु कोणतीचा शा व्य स ही अशा प्रकारचा ठराव पारीत करीत नाही. ही बाब गुन्हेगारी स्वरूपाची असून यावर आजतागायत शिक्षण विभागातील कोणत्याही अधिका-यांनी साधे लक्षही घातलेले दिसत नसल्याची गंभीर माहिती उघडकीस आली आहे.
बाल हक्क शिक्षण व सक्तीचा कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याने, मुलांच्या पालकाकडून देणगी घेणे कितपत योग्य आहे. शिक्षण क्षेत्राची दिशाभूल करणारे असे अनेक ‘डिसले’ तयार होत असल्याने या क्षेत्राचा व बालकाचा सर्वांगीण विकास कसा होणार यावर सवाल उपस्थित केला जात आहे. ‘राशी’ जमविलेल्या गुरूजींनी शासनाची दिशाभूल केली असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.