
श्रीनिवास प्रकाशन, देवळी, जि. वर्धा तर्फे उद्घाटन समारंभ व पुस्तक प्रकाशन
नागपूर: प्रसिद्ध लेखक ह.भ.प. प्रा. शांताराम ढोले महाराज यांच्या सिद्धहस्त लेखणीने व अभ्यासपूर्ण चिंतनाने निर्मित ‘वैष्णवाचा धर्म’ हा ग्रंथ श्री निवास प्रकाशन, देवळी, जि. वर्धा यांनी नागपूर महानगरीमध्ये प्रकाशन सोहळा रविवार दि. ७-८-२०२२ रोजी दुपारी ३ वाजता ‘श्री संत गजानन महाराज भक्तिकुंज आश्रम’, चिखली लेआऊट, नविन सुभेदार, नागपूर येथील सभागृहात सुप्रसिद्ध संत साहित्यिक व संशोधक डॉ. म.रा. जोशी यांच्या शुभहस्ते ह.भ.प. श्री पुंडलिक महाराज शरणागत (पंढरपूर), डॉ. गोपाल बेले, डॉ. दिनकर येवलेकर, प्राचार्य डॉ. गणेश मालधुरे यांचे उपस्थितीत आयोजित केला आहे. या संदर्भात आयोजित पत्रपरिषदेत प्रा. डॉ.गणेश मालधुरे देवळी आणि प्रा.शांताराम ढोले यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे उद्घाटन व पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती दिली.
या ग्रंथाचे लेखक ह.भ.प. प्रा. शांताराम ढोले यांनी विद्यार्थी दशेपासूनच कीर्तनाला व प्रवचनाला सुरूवात केली. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, नागपूर येथे मराठी विषयाचे प्राध्यापक होते. विदर्भात अनेक संस्थानमध्ये त्यांचे कीर्तन व प्रवचन चालत असतात. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण चिंतनाने या क्षेत्रात नावलौकिक मिळविला. उत्कृष्ट कीर्तनामुळे त्यांची श्री संत गजानन महाराज भक्तिकुंज आश्रमामध्ये तीस वर्षापासून अविरत सेवा चालू आहे. त्यांच्या ख्यातीमुळे शेगांव संस्थान व पंढरपूर संस्थान मध्ये अविरत सेवा असते. करोना काळातील विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी संत दासगणू विरचित ‘श्री संत गजानन विजय ग्रंथ’ या ग्रंथावर ‘श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ : एक तत्वचिंतन’ नावाचा अमूल्य ग्रंथ भाविकांसमोर सादर केला. यानंतर त्यांचा पारमार्थिक विचाराला चालना देणारा दुसरा ग्रंथ म्हणजे ‘वैष्णवाचा धर्म’ हा आपल्या सारख्या सुज्ञ वाचकासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
या वाङमयीन कलाकृतीच्या नवनिर्मितीच्या मागे इतिहासच आहे. पंचवीस तीस वर्षाआधी प्राचार्य डॉ. गणेश मालधुरे यांनी महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सोनेगाव येथील शिबीरात विद्वत्जन व विद्यार्थ्यांसमोर ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म’ या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या विषयवस्तुवर कीर्तन आयोजित केले. या कीर्तनावर आयोजक इतके प्रभावीत झाले की ते म्हणाले ‘संत तुकाराम महाजांचा हा अभंग तर वारकरी संप्रदायाचा जाहीरनामा आहे.’ ते आयोजक म्हणजे प्राचार्य डॉ. मालधुरे. नंतर ते म्हणाले आपण संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहात. आपण या अभंगावर आपल्या सिद्धहस्त लेखणीने लिहिलं पाहिजे. या ग्रंथाच्या प्रकाशनाची व आर्थिक बाजूची सर्वस्व जबाबदारी माझी राहील. त्यांच्या प्रेरणेने, सहकार्याने हा ग्रंथ पूर्ण करण्यास यशस्वी झालो.
हा ग्रंथ खरोखरच वाचकांना, अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगल।।’ या अभंगामधील अभिव्यक्त केलेले बारकावे, प्रत्येक विषय हाताळलेले आहे. अभंगाच्या प्रत्येक चरणातील शब्दाची उकल व चिंतन, त्यांचा दृष्टिकोन व त्यांच्या ज्ञानाची श्रेष्ठता प्रा. ढोले यांनी प्रगट केली आहे. तसेच प्रा. ढोले यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पारमार्थिक विचाराची समाजमनाला ओळख करून दिली.