
पुन्हा एकदा आढळली तोफगोळासदृश्य वस्तू; परिसरात खळबळ
अहमदनगर: विदर्भातील चंद्रपूर येथे अवकाशातून काही वस्तू जमिनीवर पडल्याच्या घटनेस काहीसा कालावधी लोटला असताच, नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारात पुरातन तोफगोळासदृश्य वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
या वस्तूची पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाने पाहणी केली असून लष्कराच्या अधिकार्यांनाही माहिती दिली आहे. लष्कराचे अधिकारीही या वस्तुची तपासणी करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. नारायणडोह गावच्या शिवारात पारगाव फाट्याजवळ बांगरवस्ती येथे मुरूमामध्ये तोफगोळा सदृश्य गोल आकाराची लोखंडी वस्तू दिसून आली. नगर तालुका पोलीस, बॉम्ब शोधक पथकाला याबाबतची माहिती देण्यात आली.
बॉम्बशोधक पथकाने तोफगोळा सदृश्य वस्तूची पाहणी केली. स्फोटक शोधक यंत्राच्या साहाय्याने केलेल्या पाहणीत या लोखंडी वस्तुमध्ये कोणताही स्फोटक पदार्थ नसल्याचे आढळून आले आहे. उपनिरीक्षक रणजित मारग यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराच्या अधिकार्यांनाही माहिती देण्यात आली असून लष्कराचे पथक या वस्तुची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले.