
‘काळं सोनं’ काढणा-या शौर्यवान कामगारांची व्यथा; प्रा.तारका रूखमोडे
_शुक्रवारीय हायकू काव्यपरीक्षण_
*कोल खाणीत*
*जीव घाली धोक्यात*
*देण्या प्रकाश*
कोळशाच्या खाणीत रापणारे हात.. संवेदनाहीन झालेला काळेशार घट्ट्यांचा सोललेला बाज.. रात्रंदिवस भूगर्भाच्या अंधाऱ्या गर्भात काळ्या पाषाणाला फोडताना हृदयावर कित्येक घाव झेलणारे.. स्वतःच्या काळजावर दगड ठेवून.. परिस्थितीचे वज्रप्रहार पचवण्या तयार असलेले, पाठीचा कणा खिळखिळा झालेले.. तरीही पोटाच्या खळगीसाठी इंधन ज्योत शोधणारे .. दगडाच्या गाड्या घट्टे पडलेल्या खांद्यावर ओढणारे, स्वतःच्या भविष्याच्या किरणांच्या शोधात विषारी झोतभट्टीत संपूर्ण आयुष्य जाळणारे..पृथ्वीच्या गर्त पोटाला छेदून काळं सोनं काढणारे शौर्यवान कामगार….
काळ्या पाषाणाला सुरुंग लावताना कित्येक अडचणींचा उचलावा लागतो भार..खाणीत या दगड मातीवर चालतांना कित्येकदा चरर्कन पाय कापले जातात,वायूच्या अभावी श्वास गुदमरतो,पाषाणावर धूसर प्रकाशात हातोडा मारताना अक्षरशः अश्माचे बारीक तुकडे डोळ्यात रुतून बसतात व जीवनात कायमचा अंधार करून जातात पण लोकांच्या घरातील ज्योती पेटतात ते या सच्च्या श्रमिकांच्या या भीषण वास्तवाच्या दाहकतेवरच. सुरुंग लावताना त्याच्या भयंकर आवाजाने परिसरातील यांच्याच कुटुंबीयांच्या कच्च्या घरांना हादरे बसून कित्येक घरांची वाताहत होते.या बोगद्यात बरेचदा विषारी वायूची निर्मिती होऊन कित्येकांची कार्यक्षमता मर्यादित होते तर हायड्रोजन सल्फाइडमुळे गंभीर शारीरिक व्यंग निर्माण होते,कित्येकांना प्राणास मुकावे लागते.किरणोत्सारी पदार्थातून रेडॉन वायू बाहेर पडतो त्यामुळे फुफ्फुसाला इजा होऊन कर्करोग होतो. अशे कितीतरी आघात या कोळशाच्या खाणीत राबतांना होतात
खरंच हेच असं एकमेव क्षेत्र आहे की ज्यात कामगार इतकी मोठी जोखीम असतानाही यात पावलोपावली जीव धोक्यात घालून लाखो कामगार पृथ्वीच्या गर्भात कफन बांधून काम करतात. पहाटे आत गेलेला माणूस उद्याच्या सूर्य बघेल की नाही याची शाश्वतीही नसतेच.. इतके हे भयावह जोखमीचं काम पण पोटाच्या खळगी साठी व कर्जाच्या विळख्यामुळे हे सारं सहन करावं लागतं..कोळसा हे जीवाश्म इंधन..जाळल्यावर वीज मिळते सुंदर .या मूलोद्योगाच्या जोरावर अभिनव प्रगती झपाट्याने होत आहे, भूगर्भात साठलेल्या या ऊर्जा माणसांच्या श्रमाच्या स्पर्शाने.. तर कधी त्यांच्या आहुतीच्या राखेने ही काळी राख बाहेर येते व कित्येक घरे लख्ख प्रकाशाने उजळून जाते..
आज हायकू काव्यलेखनासाठी आदरणीय राहुल सरांनी कोळसा खाणीत दगड फोडण्यासाठी सुरुंग लावणाऱ्या कामगाराचं बोलकं चित्र दिलेलं ..आ.सरांच्या कल्पकतेतील हे चित्र कोल माईन्समध्ये श्रमिक जीवाची पर्वा न करता..नव्या संघर्षासाठी रोज ताठ पोलादी मानेनं उभा राहणारा..दगड फोडतांना स्वतःचे उभं आयुष्यही कर्पूरासम जाळणारा. या खाणीच्या तिमिरात जगणे जरी कठीण असले तरीही जिद्दीने जगायचेच..वाट्याला आलेली आव्हाने पेलायचेच..प्रत्यक्ष बिजलीचा हात धरून..जीवन कोळपून गेले तरी घामाचा तेल करून आयुष्याची वात जाळणारे हे कामगार..अपघाताची तमा न बाळगता एकनिष्ठतेनं कर्म करणं… खरंच श्रमनिष्ठतेचं किती बोलकं चित्र ना!! .. खूप काही सांगून जाणारं.. ह्याचच चित्रण आज लेखनात करायचं होतं पण आजही बऱ्याच जणांनी चित्र ओळखण्यात गल्लत केली..तर काहींच्या रचना खूप उत्कृष्ट अशा ह्रदयस्पर्शी झाल्यात.. सर्वांचं अभिनंदन ..💐 असेच लिहिते व्हा.. पण चित्रातील सूक्ष्मातील सूक्ष्म भाव ओळखण्याचा प्रयत्न करा व लेखणीत साकारण्याचा प्रयत्न करा..
आ. राहुल सर आपण मला हायकू परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल आपले हृदयस्त ॠणाभार🙏🙏
प्रा. तारका रूखमोडे
अर्जुनी मोर, जि गोंदिया
मुख्य परीक्षक/ सहप्रशासक/संकलक