
वंशावळ…स्मृतीगंध हळव्या नात्यांचा….!; वैशाली अंड्रस्कर
*ऎसी मोडीलिपी अक्षरे*
*जतन वंशावळ उतारे..*
*कुल, वंश, गोत्र आडनावे*
*भाटसंस्कृती जाणून घ्यावे*
मानवाच्या पन्नास-शंभर वर्षांच्या उण्यापुऱ्या आयुष्यात आपल्या पूर्वजांबद्दल असून असून किती माहिती असणार ? आजच्या त्रिकोणी, चौकोनी कुटुंबाच्या परिघात DINK ( Dual Income No Kids ) संस्कृती जितक्या वेगाने फोफावते आहे. तितक्याच वेगाने आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मावशी ही नाती पण संपुष्टात येत आहेत. मी, माझे, मला ह्या संकुचित मनोवृत्तीचा फास मानवी मनावर पडत आहे. मग वंश, वंशावळ ह्या तर अगदी दंतकथाच वाटतील ना ?
पण एक काळ असा होता जिथे माणसांचे बंध भावनेनी जोडलेले असायचे. जीवंत, हयात व्यक्तीमत्वांसोबतच काळाच्या पडद्याआड गेलेल्या माणसांना काळजाच्या कोपऱ्यात जागा असायची. आणि सोबतच पिढ्यानपिढ्यांचे दस्तऐवज ठेवणारी भाट संस्कृती महाराष्ट्रात अस्तित्वात असायची. आताही काही भागात ही संस्कृती जपल्या जात आहे आणि ज्याची मी स्वतः साक्षीदार आहे. आपल्यासोबतच आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा आणि या उपरही आपल्या वंशात कुळात जन्माने किंवा विवाहसंबधाने आलेल्या व्यक्तींची नोंद भाटबुवांच्या चोपड्यांत मोडीलिपीच्या माध्यमातून केलेली असायची. सध्या ती नोंद आपल्या मराठी भाषेत केली जाते. अशी ही नात्यांची यादी म्हणजेच आपली वंशावळ.
ही वंशावळीची माहिती जेव्हा एखाद्या पराक्रमी घराण्याविषयी असेल तर त्याला ऐतिहासिक दर्जा प्राप्त होतो. आलेख स्वरूपात तो इतिहासाच्या पुस्तकात अभ्यासाला असतो. उदा. महाराष्ट्रातील शूर भोसले घराण्याची वंशावळ. भोसले घराण्यातील बाबाजी भोसल्यांपासून, मालोजी भोसले, विठोजी, शहाजी, शरिफजी इत्यादींची वंशावळ आपण आलेख स्वरूपात अभ्यासू शकतो. सध्याच्या काळात Family Tree किंवा कुटुंब वृक्ष या नावाखाली अभ्यासला जाणारा हा घटक म्हणजे खरेतर वंशावळच. नशीब हेच की कुटुंबाचे महत्व जाणून अभ्यासात हा घटक समाविष्ट करण्यात आला. नाहीतरी कुटुंबसंस्था विस्कळीत होण्याच्या आणि नातेसंबंध दुरावण्याच्या या काळात तेवढीच मनाला दिलासा देणारी बाब.
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहात काव्य-चारोळी लेखनाकरीता माननीय मुख्य प्रशासक राहुल पाटील यांनी ‘वंशावळ’ हा विषय दिला आणि मन नकळत भूतकाळात गेले. इतिहासाच्या पुस्तकातील पानावरून मन नुकत्याच १० सप्टेंबर २०२२ ला घरी येऊन गेलेल्या आमच्या सुतार भाट काका-काकूंच्या आठवणींत रमले. सध्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ, व्यवसाय नोकरी या निमित्ताने जात प्रमाणपत्र, जात पडताळणी या अनुषंगाने वंशावळ मागितली जाते. त्यानिमित्ताने का होईना मुलांना आजी आजोबा आणि नातेसंबंधातील नावांची ओळख होत आहे हेही नसे थोडके.
समूहांमध्ये नजर फिरवताना शिलेदारांनी वंशावळीची मांडणी छानच केलेली आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी लेखणीस भरभरून शुभेच्छा….!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह