
दुरावलेली नाती
‘वसुधैव कुटुम्बकम’ म्हणजे संपूर्ण विश्व माझे कुटुंब आहे. टोळी जीवनात टोळीतील सर्व व्यक्ती एकमेकांचे नातेवाईक असत. विवाह सुद्धा टोळीतच व्हायचे. परंतु हळूहळू सुधारणा होत, गावातील वेगवेगळ्या जाती-धर्माचे असूनही काही ना काही नाते पाळत असत. एकत्र कुटुंब पद्धतीत आई, वडील, आजी, आजोबा ,मुले बाळे एकत्र राहायचे. सर्वांच्या भावना ,सुखदुःख एकमेकांशी गुंफलेले असायचे . आज मात्र विभक्त कुटुंब झालेत. फक्त कुटुंबच नव्हे तर; नातेसंबंधही विभक्त झाले. एकमेकांपासून दुरावले गेले आहेत. मुलांना आई-वडील, बहिण- भाऊ या व्यतिरिक्त कोणतेही नाते कळत नाही. आई वडील मित्र-मैत्रिणी एवढेच त्यांचे विषय आजची रक्ताची नाती फक्त संपत्तीपूर्ती मर्यादित राहिलेली आहेत. ज्याच्या जवळ पैसा आहे त्याला नातेवाईक चिकटून असतात, जणू गुळाला माशा. आज नाते संबंध दुरावलेले आहेत. भाऊ भावाचा वैरी आहे.
आई-वडिलांसाठी म्हाताऱ्या मुलांना वृद्धाश्रमाची गरज आहे. तर काही वर्षानंतर काय होईल? पती-पत्नी दोन्ही नोकरी निमित्त बाहेर असतील, .काही काही पती-पत्नी तर वर्ष, महिने भेटणार नाहीत. सोशल मिडियावरून वार्तालाप फक्त. एकत्र राहण्याची गरजही त्यांना वाटणार नाही. करिअर व पैसा मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतील. आई आणि मुलगी हा संबंध जोपासताना आईला मोठे सतर्क रहावे लागेल. आपल्या जीवनातील निर्णय घेताना मुलीला आईच्या परवानगीची गरज वाटणार नाही. आज मुलांसाठी विधवेचे जीवन जगणारी आई दिसते. पन्नास वर्षानंतर मुलगी स्वतःच आईचे दुसरे लग्न करून देईल.
लहान मुलांच्या चिमुकल्या जगात लाडक्या आजी आजोबांचे स्थान सर्वात प्रथम असते. त्यांना आजी-आजोबा लाड पुरवण्यासाठी, गोष्टी सांगण्यासाठी, प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी हवे असतात. पण आजच्या विभक्त कुटुंबामुळे आजी आजोबांचे चेहरेच वर्षातून एक दोन वेळा दिसतात. सासू सुनेचे पटत नाही, म्हणून किंवा इतर कारणांनी ते वेगळे राहतात. आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले जाते. आजचे नातेसंबंध इतके दुरावले गेले आहेत की ‘दोन्ही भाऊ शेजारी भेट नाही संसारी’ असे म्हणावे लागते. तर 50 वर्षानंतर हेच नातेसंबंध नदीच्या दोन काठांप्रमाणे असतील. जे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. आई-वडिलांनी मुलांना लग्नापर्यंत सांभाळावे आणि लहानपणी त्यांच्यासाठी खस्ता खाव्या आणि मोठे झाल्यावर सोडावे पक्षांप्रमाणे पंख फुटल्यावर ते जसे आई वडील ओळखत नाहीत तसे.. एकच खंत मनास वाटते येतील का कधी जवळ ही दुरावलेली नाती..?
उर्मिला गजाननराव राऊत
फ्रेंड्स कॉलनी नागपूर