
*प्रेमकिनारा*
सुवर्णकांती नाजुक बांधा
बघुनीया मन झुरते गं..
गालावरची बट चावट
हळूच हृदयी शिरते गं..
कितीक वादे किती बहाणे
वाट तुझी मी बघतो गं..
कातरवेळी येशी जवळी
या आशेवर जगतो गं..
गौर काया प्रभातीला
लालेलाल झाली गं..
जणू नभातून अप्सरा
अशी धरेवर आली गं..
डाळींबी ओठांना जणू
रंग गुलाबी चढला गं..
हाय..धावत धावत वारा
तुला कसा बिलगला गं..
त्या पानांवर,त्या गवतावर
रंग कशाचे लाल गं?
ठसे उमटले तव प्रेमाचे
देहाचे नुसते हाल गं..
मिलनाचा तू वादा करता
सागरही आतुर झाला गं..
भरती येऊन मंथर झाला
प्रेमकिनारा हा ओला गं..
तू येता पाऊसही भिजला
फुलून आली बाग गं..
मी भ्रमर तू कमळीनी
कर बंद पाकळीत राज गं..
*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक, प्रशासक, कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*
प्रितभरी तुझे नयन
मनी प्रेम जागवी
होता हितगुज दोघात
बोलायचा तू लाघवी
रंगून जायचे गप्पात
ना कशाचे भान राही
मग कसा दिवस जाई
कळत नव्हते काही
प्रित तुझी मनी भावली
तुझ्या हृदयी विसावले
प्रेमकिनारा तू दिलास
तुझ्यात मी सामावले
प्रेमऋतू असा बहरला
आठवण तुझी मिटेना
क्षण क्षण तुझाच भास
समजावू कशी वेड्या मना
कधी कधी वाटतं मझं
आयुष्य तसच असत तर
विश्वासाने फुलवून नातं
आजवर जपलं असत तर
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेम किनारा*
सागरलाटा धावत येती
किनाऱ्या भेटण्याला
अडवी वारा भाग पाडतो
परत लोटण्याला
किती काळ तिष्ठत राही
किनारा मीलनाला
पुनरपि लाटा धाव घेती
किनारी मिटण्याला
आर्जवे तरी किती करावी
मनास उमगत नाही
अचल मी साद घालतो
त्यांस समजत नाही
वेल्हाळ लाटा उसळती
अधिर जाहल्या मनी
कवेत घेण्या आतुरसा
दाटली असोशी मनी
पूर्तता कधी प्रतिक्षेची
आर्त आर्त उर्मी
अनंतकाळ वाट पाहीन
वचनची दिधले मी
सागर हा उधाणला
नी लाटा नर्तन करिती
प्रेम किनारा भेटण्याची
ओढ अनावर किती!
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*प्रेमकिनारा*
बंद पडलेली कवाडे मनाची,
किती वर्षांनी ती आज उघडली
साठलेली जळमटे दूर सारून
आत पहात जरा डोकावली,
आज पुन्हा तुझी आठवण आली…
बालपणीचा तो खेळ बाहुल्यांचा
तुला ना आठवे साठा शिंपल्यांचा,
समुद्र किनारी वाळूच्या घराला
प्रेमाने बनवी तू त्याच्या दाराला,
वाळूची ती दारं पाण्यात वाहिली
आज पुन्हा तुझी आठवण आली…
नाही म्हणावे मी तरी तू येतोस,
छेडून भावनांना निघून जातोस,
कुठवर असे सांग मी जगावे
आठवणींना रे किती दूर सारावे
नको आठवणी आता त्या जीवघेण्या
एकदाच ये असा परत न जाण्या
खुणावतोय तो सागरी किनारा
लाटांनाही सहवेना वेदनांचा मारा
आतुर झालाय आपल्या प्रेमाची
साक्ष देण्यास तो प्रेमकिनारा..
तो प्रेमकिनारा…!!
*सौ.संध्या मनोज पाटील*
*अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*
सखे तुझ्यासाठी मी
खरा प्रेमकिनारा झालो
जिवलग मैत्री अपुली
प्रेमाचा सहारा झालो ॥
छान वाटले शेतकऱ्यांच्या
शेतातला बंधारा झालो
साचवले तळ्यात पाणी
पिके ओलणारा झालो ॥
पडका होता वाडा तिचा
राहुटीला निवारा बांधला
हृदयात आठवण कोरली
उंबऱ्याचा गाभारा झालो ॥
उदार मनाची प्रेमिका
तिने मला इशारा केला
दर्याकिनारी भेटलो दोघे
चमकता सितारा झालो ॥
*प.सु.किन्हेकर*
*वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*
नको आई तुझा
मर्यादी सागर.
मला हवा फक्त तुझा
अखंड प्रेमकिनारा
वात्सल्यमुर्ती तू
जगाची किर्ती तू
माझ्या सुखाचा आसरा
तू माझा प्रेमकिनारा
आई प्रेमसागर तू
प्रेमाचा आगर तू
गुरुच माझा खरा
तू माझा प्रेमकिनारा
त्यागाची मूर्ती तू
सार्यांचं करते तू
घरातला गं तू हिरा
तू माझा प्रेम किनारा
जीवन शिदोरी तू
बंधनाची दोरी तू
मनी प्रेम शोभे खरा
तू माझा प्रेम किनारा
*प्रतिभा गौपाले*
*नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेम किनारा*
तुझ्या प्रेमाच्या पावसात
हाऊस चिंब भिजण्याची
वृक्ष,लता,वेली,रस्ते, सारे
मनसोक्त न्याहाळण्याची….
टपोरे थेंब अंगावर झेलत
गाडीवरून मस्त फिरायचे
ओल्या चिंब कायेवर मग
प्रेमाचे पांघरूण पांघरायचे…
तुझ्या प्रेमाच्या पावसात
मिठीत मनसोक्त फुलायचे
बिलगुन एकमेकांना दोघेही
नजरेला नजरेने भिडायचे
गालांवरील थेंबांना प्रेमात
हळुवार सख्याने चुंबावे
प्रीतीच्या बहारदार पावसात
नेहमीच भिजायला मिळावे
तुझ्या प्रेमाचा प्रेमकिनारा
पावसाने मस्त फुलून येऊ दे
तुझ्या माझ्यातील दुरी सदैव
प्रीतीच्या आनंदात चिंब भिजू दे….
*वसुधा नाईक पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*
भरातली तू पूनाव म्हणू की, म्हणू नदीची धारा
भरतीचा मीही सागर, माझा आतूर प्रेमकिनारा. //
कधी उमटतील येथे, तुझे नाजूक पाऊल ठसे
पैंजण ध्वनी ऐकण्यास माझे, कर्ण वेधले असे..//
लागेना चाहूल अजूनही, तू सांग कितीशी दूर
कानोसा घेतो घडी घडी, मनी अनामिक हूरहूर.. //
उचंबळतो मन डोह, आता साहवेना तुझी दूरी
नाना उमंग तरंग उठती, घालमेल माजली उरी.. //
किती रमावे स्वप्नरंजनात, अवचित येते जाग
दग्ध करी तनामनाला, असह्य विरहाची आग.. //
झुरून मरण्याआधी घुमू दे,तुझी मनोहर गाज
प्रेमकिनारा असा सजू दे,जसा इंद्रधनूचा साज.. //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*
खुणावतोय तो प्रेमकिनारा
प्रेमांगणी न्हाऊ गं मस्तीत
तुझ्या नि माझ्या प्रेमपाखरा
चर्चा चालू आहेत वस्तीत
खुणावतोय तो प्रेमकिनारा
सुवर्णकांती तू का लाजली ?
नेत्रबाण तो हृदयात घुसला
प्रेमघंटा धुंदीत सखे वाजली
खुणावतोय तो प्रेमकिनारा
चांदराती करू नौकाविहार
केसांत गजरा तुझ्या माळतो
गळ्यात घालतो गं मोतीहार
खुणावतोय तो प्रेमकिनारा
मिलनातुर झालाय रानवारा
विसावताच तू बाहुपाशात
सुखावूनच गेल्या अमृतधारा
गाठताच सखे प्रेमकिनारा
सागरालाही गं भरती आली
हिरवा शालू उठून दिसतो
उमटली बेधुंद ओठांची लाली
*श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*
नाते तुझ्या नी माझ्यात
घट्ट विणले मैत्रीचे
प्रेमभाव तुझे माझे
आहे एक अंतरीचे
नाव प्रेमसागरात
हर्षभरी डोलते रे
कळलेना मज कसे
भाव असे जुळले रे
बंध जुळले जन्माचे
हळुवार हाती हात
झालो जन्मभरे साथी
सखा तू,तुझीच साथ
दोघे मिळून मांडला
संसाराचा गडे डाव
गाठू या प्रेमकिनारा
एक आता आम्हा ठाव
वेल अशी तुझ्यासवे
बहरली संसाराची
दोन तन एक प्राण
एक साद हृदयाची
*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*