सहजरित्या न लाभणारा प्रेमकिनारा’; सविता पाटील ठाकरे

सहजरित्या न लाभणारा प्रेमकिनारा’; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मराठीचे शिलेदार समूह आयोजित बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण

‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं,
प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. कवी मंगेश पाडगावकरांच्या या ओळी प्रेमाची संकल्पना स्पष्ट करणाऱ्या आहेत तर…

‘वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा.
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा.’

कवी विंदा करंदीकरांच्या या ओळी किनाऱ्याची व्यथा मांडण्यासाठी पुरेशा ठरतात. जेव्हा प्रेम आणि किनारा हे दोन्ही शब्द एकत्र येतात, तेव्हा ‘प्रेमकिनारा’चे महत्त्व काही वेगळेच होते. प्रेम ही एक सुंदर भावना, एका हृदयातून जन्म घेणारी आणि दुसऱ्याच्या हृदयाला स्पर्श करणारी. स्नेह, प्रेम, आदर, ममता, भक्ती, एकरूपता ही प्रेमाची काही स्वरूपे आहेत. खरंच प्रेम या अडीच अक्षरी शब्दात साऱ्या विश्वाला आपलंसं करण्याची उमेद आहे. ‘प्रेम’ या भावनेला अनेक पदर आहेत.

प्रत्येक पदराला तलम आणि तरल असे अनेक पापुद्रे आहेत आणि प्रत्येक पापुद्रा अलवार नाजूक, पण एकसंघ आहे. प्रेमाचा खरा अर्थच निस्वार्थ भावनेने समोरच्याला सर्वस्व अर्पण करणे हा आहे. प्रेम त्याग आहे, प्रेम लोभ आहे, प्रेम भास आहे, प्रेम श्वास आहे. प्रेम ही एक विशुद्ध सर्वस्पर्शी भावना आहे तिचे निःसंकोचपणे स्वागत करण्या कुठल्याही प्रकारचे उणेपण नाही. प्रेम बाजारी, शेजारी मिळत नसून त्याचा शोध करावा लागतो. तोही हृदयात…काळ आणि कष्टदशा यामुळे इतर साऱ्या गोष्टी क्षीण होत असल्या तरी, प्रेमाचा जोम मात्र वाढत आहे. प्रेमाचा पथ वर्तुळाकार आहे. स्वार्थाला मरण आहे, पण प्रेम मात्र अमर आहे. प्रेमाचा गंध चिरकाल तुष्टी देत राहतो. परंतु कुणालाच आजवर सहजरित्या ‘प्रेमकिनारा’ लाभला असेल असे वाटत नाही. त्यासाठीही भाग्य लागतं आणि विश्वासही तेवढाच महत्वाचा ठरतो.

शृंगार आणि मनोमिलनाचा हा प्रेमकिनारा याच्या प्रवाहास कधी वीरत्वाची धार येऊन मिळते. तर कधी भयानकाच्या काठाकाठाने ते प्रवाह वाहू लागतात. अद्भुततेचे धुके कधी सर्वत्र पसरते, तर कधी लीनतेची छटा आर्जवाच्या कोंदणात जडते. प्रेमातून अनेक नात्यांमधील एकात्मतेचे, एकरूपतेचे दर्शन घडते. भक्ती, प्रीती, ममता ,वात्सल्य यात मग निकटची द्वंद्वे सुरू होऊन परस्पर एकरूपतेच्या मंत्रघोषात धुंद होतात.तेव्हाच तर..!!

तू वृंदावन मी चिरी, तू पावा मी मोहरी
तू चांद मी चांदणी, तू कृष्ण मी रूक्मिणी

अशी प्रेमछटा एकमेकात मिसळलेली दिसते. असे हे प्रेम कसं करावं हे सांगताना कविवर्य कुसुमाग्रज ही म्हणतात, ‘प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा, मेघांपर्यंत पोहोचलेलं’ आणि अशा या प्रेमाला आज किनारा दिला, ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतून. आणि मग काय?? सर्व कवी कवयित्रींनी दिलखुलासपणे आपली लेखणी रंगवली. समूहात अनेकाविध रचनांचा जणू ओघच सुरू झाला.

अनेकांनी आपापल्या नजरेतून प्रेमकिनारा अनोख्या पद्धतीने गाठला. खरं तर आज सर्वांच्याच रचना अप्रतिमच होत्या. प्रत्येकाने अंतर्मनातून शब्दकळा उजळवून प्रेमभावनेचा पाझर रचनेतून उमटवला. तेव्हा तुम्हा सर्व कवी कवयित्रींचे मनापासून अभिनंदन आणि पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा. परंतु ज्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणी नसते, अशा लोकांना वय वर्ष 65 नंतर लाभलेला वृद्धाश्रम म्हणजे त्यांच्यासाठी प्रेम किनाराच होय. पुष्कळ दाम्पत्य असे आहेत, ज्यांना मूलबाळ होत नाही अशा दांपत्याने एखाद्या बाळाला दत्तक घेणे म्हणजे स्वतःसाठी एक प्रेमकिनाराच निर्माण करणे होय. कबूल आहे कधी प्रेमात सफलता येते, तर कधी विफलता. पण किनाऱ्याचा आधार घेत आपण आपलं आयुष्य सुखद करू शकतो ना.!

आज मराठीचे शिलेदार समूहावरील प्रेमापोटी आणि भाषा मराठी सक्षमीकरणाच्या यज्ञातील आहुती म्हणून सल्ला नव्हे तर हट्ट करते तुमच्याजवळ. कधी कल्पनांचा आधार घेत तर, कधी प्रतीकांचे बोट धरत, कधी वास्तवातील दुःखांना निर्भयपणे सामोरे जात, अडखळत, चाचपडत का असेना आपला काव्यप्रवास चालूच ठेवा, थांबू नका. कधीतरी क्षितीजाच्या काळोखाला सुवर्णाचे पान फुटून आकाशाच्या ओंजळीत किरणांचे दान नक्कीच पडेल असा आशावादी दृष्टिकोन मनात रुजवा. पण आपल्या लेखणीवरती न रुसता भरभरून प्रेम करत सातत्याने लिहित रहा एवढेच.

सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कार्यकारी संपादक,लेखिका,समीक्षक, कवयित्री

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles