नजरबंदी करणारा तो नजारा ‘खुणावतोय’ अजुनही; स्वाती मराडे

नजरबंदी करणारा तो नजारा ‘खुणावतोय’ अजुनही; स्वाती मराडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेतील परीक्षण

कितीतरी दिवस झाले कसल्यातरी विवंचनेत होता तो डोंगर.. चिंतेने काया काळवंडून गेलेली.. विचाराने रखरखीत झालेलं त्याचं मन वाट पहात होतं त्याच्या सख्याची.

तृषार्त त्याच्या मनास चिंब भिजवण्याची.. त्याची ती ओढ घेऊनच आली त्याच्या सख्याला..आले आले..आषाढघन आले भेटायला.. जिवाची काहिली मिटवायला.. किती आतुर होऊन त्यानं आलिंगन दिलं.. सखा भेटताच त्याचं तनमन आनंदात चिंब झालं‌‌.. तो मायेचा ओलावा घेऊन त्याचे डोळे आनंदाने झरू लागले.. सर्वांगावर झरे पाझरले.. ग्रीष्माच्या उन्हाने तापलेला तो.. सावळघनाचा पदर पांघरून निवांत कुशीत पहुडला.. उभारी आली मनाला‌, पालवी फुटली देहाला.. कृष्णमेघांनी हिरवा शेला दिला.. अवघा देह ओथंबला.. धबधब्याच्या रूपात हर्ष ओसंडून वाहू लागला.. तो सखा सोबत घेऊन आलेला त्याच्या लेकीला.. त्याच्या अंगाखांद्यावर सरिता खेळू लागली.. मायलेकरांची भेट पाहून तो आषाढघनही सुखावला.. त्यानं इंद्रधनूचा झुला त्यास भेट दिला‌.. स्वर्गसुख अनुभवत होता तो डोंगर. त्याच्या घराचं गोकुळ झालेलं.. रानफुलांनी तोरण बांधलेलं.. तरूवेलींनी धाव घेत त्याला सजवलेलं.. खळखळ वाहत लेकीने सप्तसूर छेडलेले.. अंगणात पक्षी बागडत होते.. त्याचं हे मनोहारी रूप रवीकिरणही डोकावून पहात होते.. नजरबंदी करणारा तो नजारा.. तो देखावा.. नजरेला खुणावतोय तो..!

आषाढमेघ ओथंबले
आणला धरेवरी स्वर्ग
कैद करून नजरेला
खुणावतोय तो गिरीदुर्ग..!

ते विलोभनीय रूप पाहून गिरीप्रेमींचे पाऊल तिकडे वळू लागतात.. आनंदशिखर सर करायला.. धबधब्याखाली तृप्त भिजायला.. वर्षासहलीचा आनंद घ्यायला. ढगांमधून चालायला.. दव अंगावर घ्यायला..‌ हे सगळं पाहून वाटतं.. ती झाडी.. तो डोंगर.. खुणावतोय नजरेला.. साद घालतोय पावलांना.. वर्षाऋतूतील तो डोंगर.. सुखद क्षणांची पर्वणी देणारा.. म्हणूनच तो पावलांना ओढ लावतो.!

गळाभेट डोंगराशी
कर नभांनी गुंफले
खुणावतोय तो नजारा
मन तिथेच गुंतले…!

आजच्या चित्र चारोळी स्पर्धेचे चित्र.. हिरवळ पांघरून मन मोहून घेणा-या दुर्गाचे. एरव्ही आधुनिक साधनांच्या मोहजालात अडकून पडलेल्या बालमनालाही साद घालून कवेत येण्यासाठी खुणावत आहे. तो भुरळ घालणारा निसर्ग वास्तव सुखाचं माप पदरात टाकतो. निखळ आनंद देऊन चेह-यावर समाधान फुलवतो. समाधानाचं हे पिक देणारा तो निसर्ग कायमच माणसाला खुणावतो. एरव्ही बोलताना माणूस ‘दु:खाचा डोंगर’ असा उल्लेख करतो. पण वर्षाऋतूच मुळात येत़ो सुखाची पर्वणी घेऊन.. मग डोंगरही साजिरेच होतात अन् आनंदच उधळतात. लेखणीलाही भुरळ पडते नि खुणावतो तो लिहायला. अगदी असेच आपण सर्वांनी साद घालणा-या चित्रास भरभरून प्रतिसाद दिलात. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन .आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार

स्वाती मराडे पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles