‘सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत’; स्वाती मराडे

‘सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत’; स्वाती मराडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

काय सांगू मी अन् कशासाठी? माझ्या वेदनेचा बाजार मांडू की, सहानुभूती मिळवण्यासाठी तिची कथा विणू. मोफत सल्ले देणारे इथे खूप आहेत. ‘बोलाचा भात व बोलाची कढी’ चारणारे काय समजतील माझी भूक कसली आहे. इथे भेटतात फक्त सांत्वनाचे धडे देणारे. माझी व्यथा आणि कथा सांगून ती सरणार थोडीच आहे. शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं‌. कष्टाच्या ओझ्याखाली दबलेला मी.. जबाबदारी सांभाळत कर्तव्याची पालखी पेलत पुढचं पाऊल टाकू पाहतोय.पण कष्टाचं फळ तरी कुठं मिळतंय..? सांगा कुणाला सांगू मी मनातली ही सल.. त्या देवाला सांगावं तर त्याला तर सगळंच माहित असतं म्हणतात. माहित असूनही त्याला पाझर फुटत नाही.

शेवटी तोही दगडाचाच म्हणा. तरीही त्याला आठवतो अन् पुन्हा कामाला लागतो चेह-यावर हसू घेऊन.
काय सांगू मी
माझ्या वेदनेची कथा
हस-या चेह-याआडची
दु:ख भारली व्यथा…!
कष्टक-याच्या घरात जन्म झाला. कमावणारे हात व खाणारी तोंडे यांचा ताळमेळ कधी बसलाच नाही. एकवेळचं खाणं कसंबसं शिजायचं घरात.. ब-याचदा इतरांच्या घरातल्या शिजणा-या अन्नाचा वास घेऊनच पोटातले कावळे तृप्त व्हायचे. तेव्हा कळायची ती फक्त पोटाची भूक.. ज्ञानाची भूक कधी कळलीच नाही. माझी चूक होती की परिस्थितीचे चटके.. काय सांगू मी..? दोष कुणाला द्यावा. की हेच प्रारब्ध समजून पट चालत रहावा.
काय सांगू मी?
कष्टक-याचं जिणं की जीवनाचं रडगाणं
नाही नाही.. हेच सांगेन ठासून
जपलाय स्वाभिमान.. जगतोय आनंदानं..!

कळत्या वयाला पोटाची भूक कामाकडे घेऊन गेली. मिळेल ते काम करून चार पैसे कमवावे हेच ध्येय बनलं जीवनाचं..? अहं..! जगण्याचं.. होय जगणंच महत्त्वाचं होतं.. कामं करताना कधी चोरी, लबाडीचाही कलंक बसला नि माथा ठणकला. स्वाभिमान जागा झाला. चाकरीऐवजी पेलेल तो व्यवसाय करू आणि पोट भरू असा विचार करून केला कामाचा श्रीगणेशा.. चिकाटी, प्रयत्न, मेहनत, जिद्द.. सगळेच आहेत सोबतीला.. कधी यश येतं कधी अपयश.. जणू नियतीशी जुगार खेळतोय. पण स्वकर्तृत्वावर.. स्वकष्टावर जी कमाई होते ती किती समाधान देते.. याचं सुख काय सांगू मी.. ते ज्याचं त्यानंच अनुभवावं. नकोच होती सहानुभूती मला जगाची.. खजील होऊन जगणे जमणारच नव्हते
काय सांगू मी..? स्वाभिमानाच्या जगण्यात किती सुख असते..!

आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र.. छोटे-मोठे काम.. व्यवसाय करुन.. रोजच्या जगण्याची कसरत करणा-या कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे.. काय सांगू मी? या शिर्षका अंतर्गत वेदना, व्यथा सांगत असतानाच. घामाचे मोती माणसाला किती शोभून दिसतात.. त्यामुळे मिळणारे समाधान.. अशा दोन्ही बाजूंनी विचार करून लिहायला प्रेरित करणारे.. खरेतर ‘सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत’ याच ओळींची आठवण झाली. आपणा सर्व सारस्वतांच्या लेखणीतही याची चुणूक दिसली. कष्टकरी म्हटले त्यांचे रोजच्या जगण्यातील अनेक प्रश्न मनाला सतावतात. अगदी हेच लेखणीतून उतरले. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏

स्वाती मराडे, पुणे
मुख्य परीक्षक/ संकलक/ कवयित्री/ लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles