गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील वादग्रस्त लोहखनिज उत्खननाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. मात्र या कामाच्या सुरुवातीलाचं पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. वाहतूक परवाना सोबत न बाळगता लोहखनिज वाहून नेणारा एक हायवा ट्रक नागरिकांनी अडविला. त्यानंतर एटापल्लीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी या ट्रकचा पंचनामा केला. ट्रक तहसील कार्यालयात जमा केल्यानंतर वाहतूकदाराने अचानक वाहतूक परवाना सादर केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
नागरिकांनी अडविलेला ट्रक
28 मे 2021 रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून या प्रकरणात आणि भविष्यात लोहखनिज उत्खनन, वाहतूक कशाप्रकारे होईल, यावर प्रशासकीय यंत्रणा कशी लक्ष ठेवेल, स्थानिकांचा आणि नक्षलवाद्यांचा याला काय प्रतिसाद राहील, हे पाहणे औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील पहाडावर मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे साठे आहे. या लोहखनिजाचे उत्खनन व वाहतूक करण्याची परवानगी लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला मिळाली होती. मात्र नक्षलवाद, स्थानिक विरोध, भौगोलिक परिस्थिती व अडचणीमुळे बऱ्याच वर्षापर्यंत हे काम सुरू झाले नव्हते. अशातच चार-पाच वर्षांपासून हे काम सुरू झाले. कामाच्या सुरुवातीपासून अनेक समस्या निर्माण झाल्या. नक्षलवाद्यांनी वाहने जाळली, त्यानंतर एका अपघाताच्या निमित्ताने लोकांनी देखील वाहतुकीची ट्रक जाळून टाकली. तेव्हापासून साधारणपणे अडीच वर्षांपासून हे काम बंद होते. मात्र आता अचानक गेल्या काही दिवसांपासून येथील लोहखनिज उत्खनन व वाहतुकीचे काम सुरू झाले आहे. त्रिवेणी अर्थ मूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड, सेलम तामिळनाडू यांच्याद्वारे हे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री व काही विशिष्ट कामगार पहाडावर तळ ठोकून बसले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित परिसर दुर्गम आणि नक्षलग्रस्त असतानादेखील याठिकाणी कुठलीच सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती आहे.
जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना तहसीलदार एटापल्ली यांनी पाठविलेले पत्र
हा सर्व अजब प्रकार सुरू असतानाच 28 मे 2021 ला परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत एक हायवा ट्रक पकडला. नागरिकांनी सांगितले की, लोहखनिज वाहतुकीची परवानगी नसताना ओडी 09 जे 3607 या क्रमांकाच्या हायवा ट्रकमधून लोहखनिज वाहतूक करण्यात येत होती. नागरिकांनी हा ट्रक परिसरातील वनउपज तपासणी नाक्याजवळ अडविला होता. नागरिकांचे रौद्ररूप पाहून एटापल्लीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे हे तिथे दाखल झाले. त्यांनी तिथे संपूर्ण चौकशी व पंचनामा केला. तेव्हा ट्रकचालकाकडे कुठल्याही स्वरूपातील वाहतूक परवाना उपलब्ध नव्हता. शिवाय ही वाहतूक त्रिवेणी अर्थ मूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार कारवाईचा भाग म्हणून हा ट्रक तहसिल कार्यालयात नेण्यात आला. मात्र त्यानंतर काही वेळातच अचानकपणे याठिकाणी संबंधित वाहतुकदारांनी वाहतूक परवाना सादर केला. विशेष म्हणजे, परवाना प्राप्त झाल्यानंतरदेखील ट्रकमध्ये नेमका किती लोहखनिज होता, हे यंत्रणेने स्पष्ट केलेले नाही. तर त्यात अंदाजे वीस मेट्रिक टन लोहखनिज होते, असा उल्लेख तहसीलदार शेवाळे यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना 29 मे 2021 रोजी पाठविलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे वाहतूक परवाना आणि नेमका किती लोहखनिज वाहतूक होत आहे, याचा स्पष्ट विरोधाभास प्रकर्षाने पुढे आला आहे. दुसरीकडे, स्थानिकांचा विरोध पुन्हा पेट घेण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.