
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पयडी गावच्या जंगल परिसरात आज 21 मे रोजी सकाळी 6 ते 7.30 या कालावधीत पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक उडाली. तब्बल दीड तास चाललेल्या या चकमकीत कसनसुर दलमचे 13 नक्षलवादी ठार झाले आहेत. यात 6 पुरुष, तर 7 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. घटनास्थळी नक्षलवाद्यांचे काही साहित्य व शस्त्र आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले आहेत. शिवाय सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्यात आली आहे. अनेक बड्या नक्षलवाद्यांचा यात समावेश आहे. जवळजवळ 60 लाख रुपयांचे या नक्षलवाद्यांवर बक्षीस होते, अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज गडचिरोली येथे येऊन घटनेचा आढावा घेतला व पोलिसांचे अभिनंदन केले.

गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. यातून नक्षलवादी मोठी आर्थिक खंडणी वसूल करतात. याच पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पयडीच्या जंगल परिसरात कसनसुर दलमचे सुमारे 60 ते 70 नक्षलवादी एकत्र आले असून तेंदूपत्ता हंगामाबाबत त्यांचे खलबते सुरू असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या विशेष अभियान पथकाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, नक्षल विरोधी अभियानाचे अप्पर पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया, प्रशासन विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, नक्षलविरोधी अभियानाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी विशेष अभियान पथक पयडीच्या जंगलात रवाना झाले. त्याठिकाणी भल्या पहाटे शोध मोहीम सुरू होती. सकाळी 6 वाजताच्या सुमारास 60 ते 70 नक्षलवादी तिथे आढळून आले.

पोलिसांची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. सुमारे दीड तास ही चकमक चालली. चकमकीत 13 नक्षलवादी ठार झाले. त्यात 6 पुरुष व 7 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटविण्यात आली आहे. या चकमकीत आणखी 5 नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी घटनास्थळी शोध मोहीम राबविली असता, तिथे नक्षली साहित्य व शस्त्र सापडले असून ते सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सध्या या परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.