
देशभरात पेट्रोल व डिझेलसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करित आहे. विविध राज्यात याविरुद्ध आंदोलन केले जात आहे. केंद्रातील भाजपा सरकार तरीही जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यास तयार नाही, त्यामुळे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाभरात स्वाक्षरी अभियान राबवून जवळपास दीड लाख स्वाक्षरी घेऊन राष्ट्रपती, पंतप्रधान यांना निवेदन पाठविण्यात येणार आहे. सदर आंदोलन ११ जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली आहे.
मागील काही महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर आदी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहे. इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल व डिझेलचे दर शतक पार केले आहे. यामुळे इतर क्षेत्रांवर सुद्धा याचा विपरीत परिणाम झालेला आहे. यामुळे सर्वच साहित्याचे तसेच दळणवळणाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपावर स्वाक्षरी अभियान राबवून दीड लाख स्वाक्षऱ्या घेण्यात येणार आहे. यादरम्यान, जिल्ह्यात सायकल रॅली काढण्यात येणार असून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली आहे.