
गडचिरोली शहरातील बहुचर्चित दुर्योधन रायपूरे हत्याकांड प्रकरणात गडचिरोली नगर पालिकेच्या एका सभापतीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात देसाईगंज येथील नगर पालिकेच्या गोटातील एक काँग्रेस नेता सहभागी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
गडचिरोली शहराच्या फुले वाॅर्डात सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांच्या हत्या प्रकरणात गडचिरोली पोलीसांनी गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक तथा नियोजन व विकास सभापती प्रशांत खोब्रागडे यास आज दुपारी चौकशी करीता ताब्यात घेतले असुन रात्री 8 वाजताचे दरम्यान अटक केली आहे. त्याचेवर 302 व 201 कलम लावण्यात आले आहे. खोब्रागडे हे अपक्ष निवडून आले होते. त्यांनी नंतर भाजपचे समर्थन केल्यामुळे त्यांना यावेळी नियोजन व विकास समितीचे सभापती पद मिळाले.
सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपूरे यांची 24 जून च्या रात्री त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी 3 जुलै रोजी अमन कालसर्पे (18) या पहिल्या आरोपीला अटक केली होती. अन्य तीन आरोपींना 6 जुलै रोजी अटक केली. या तिन्ही आरोपींना 7 जूलै रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 13 जुलैपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींमध्ये प्रसन्ना रेड्डी (24), अविनाश मत्ते (26), धनंजय उके (31), सर्व राहणार गोंदिया यांचा समावेश आहे. या चारही आरोपींवर भादंविचे कलम 302, 201 अन्वये गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास करताना संंशयाची सुई नगरसेवक प्रशांत खोब्रागडे यांचेकडे वळली. प्राप्त माहितीनुसार हे चारही आरोपी नगरसेवक प्रशांत खोब्रागडे सोबत 4 दिवस होते. ते या आरोपींना गडचिरोली नगर परिषदेतही घेऊन गेले होते. या मााहितीच्या आधारेच तपास अधिकाऱ्याने खोब्रागडे यांना चौकशी करीता ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. पोलीसांनी नगरपरिषदेतील सीसी टीव्ही फुटेज मागितले असल्याचे समजते.
सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांच्या हत्येप्रकरणी गडचिरोली पोलीसांनी गतीने तपास करून चार आरोपींना अटक करून पाचव्याला चौकशी करीता ताब्यात घेतले आहे. प्रशांत खोब्रागडे हे भाजपचे नगरसेवक आहेत. सदर हत्या पैशाच्या लालसेपोटी आणि एखाद्या महिलेशी संबंधातून झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र ठोस पुरावा हाती लागेपर्यंत कोणाला आरोपी करता येणार नाही, असे पोलीसांचे मत आहे. या हत्याकांडातील आरोपींची संख्या वाढू शकते असे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात देसाईगंज येथील एक मोठा व्यावसायिक आणि नगर पालिकेच्या गटातील काँग्रेस नेता सहभागी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्याबाबत ठोस पुरावे उपलब्ध नसले तरी संबंधित हत्याकांड हे राजकीय करणातून झाले, त्यातुन हे कनेक्शन गडचिरोली-वडसा-गोंदिया असे पोहोचले, अशीही चर्चा आहे. पोलिसांनी त्यादिशेने तपास करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.