सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकरण : आंदोलनप्रकरणी काही जणांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल; स्थानिकांचा विरोध तीव्र होण्याची शक्यता, दोन डॉक्टरांची औद्योगिक वाटचालही नक्की वाचा

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखनिज उत्खनन सातत्याने वादग्रस्त ठरत आले आहे. स्थानिकांचा विरोध दुर्लक्षित करून लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व त्रिवेणी अर्थमूव्हर्स कम्पनी हे काम करत आहे. याचा रोष आता रस्त्यावर व्यक्त व्हायला लागला आहे. काही नागरिकांनी याबाबत आंदोलन केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सुरजागड पहाडावर उत्खननाचे काम सुरू करणाऱ्या त्रिवेणी कंपनीला स्थानिक स्तरावर विरोध व्हायला लागला आहे. यातूनच काही नागरिकांनी कंपनीच्या
टोपी, जॅकेटची होळी केली. सुरजागड लोहखनिज प्रकल्पात स्थानिक लोक घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मात्र सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी आंदोलन करणे, जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्याचे आरोप ठेऊन काही जनावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यात राहुल मोहूर्ले, नसरू शेख, तुडुकवार, प्रसाद नामेवार यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे. या कारवाईनंतर आता स्थानिक विरुद्ध कंपनी असा थेट संघर्ष पुन्हा एकदा पेट घेण्याची शक्यता आहे.

नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर कुणालाही अजिबात न घाबरता उत्खननाचे कार्य करणाऱ्या त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीला आता स्थानिकांच्या रोषाचा व विरोधाचा सामना करावा लागत आहे. कंपनीने येथे कामासाठी परराज्यातून मजूर आणल्याने स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी काही ग्रामस्थांनी सुरजागड परिसरात कंपनीची टोपी व जॅकेट जाळून आपला रोष व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातून कंपनी स्थानिकांवर मोठा अन्याय करीत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

विपुल लोहखनिज असलेल्या सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाची लीज लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीकडे होती. या कंपनीकडून उत्खननाचे अधिकार आता त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीकडे आले आहेत. या कंपनीने सुरुवातीपासूनच हॉट अ‍ॅण्ड कोल्ड धोरण अवलंबिले आहे. म्हणजे नक्षल्यांप्रती हॉट म्हणजे गरम, तर स्थानिक ग्रामस्थांप्रती कोल्ड म्हणजे थंडपणाने काम करायचे, असा एकूण कंपनीचा अजेंडा आहे. स्थानिकांचा आपल्याला पाठींबा मिळाला की, नक्षलवादी आपले काहीच बिघडवू शकत नाहीत, असाही या कंपनीचा होरा आहे. त्यामुळेच येथील ग्रामस्थांप्रती ममत्व दाखवत या कंपनीने येथे कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर ऑक्सिजन प्लँट उभारणे, आरोग्य केंद्राची स्थापना, अशी कामे हाती घेतली आहेत. तसेच स्थानिकांना रोजगार, प्रशिक्षण देण्याबद्दलही उत्सुकता दाखवली आहे. समाजोपयोगी कार्य करण्याचे दाखवत ग्रामस्थांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी कंपनीची धडपड दिसून येत आहे. या खेळीमुळे नक्षलवाद्यांना शह बसेल म्हणूनच या कंपनीने अदम्य आत्मविश्वासाचा परिचय देत अद्याप उत्खनन किंवा वाहतूक प्रक्रियेत पोलिस विभागाकडून कोणतीच सुरक्षा मागितली नाही. आतापर्यंत ग्रामस्थ आपल्याच बाजूने असल्याचा कंपनीला ठाम विश्वास होता. पण, रविवार (ता. ११) ग्रामस्थांनी कंपनीची टोपी व जॅकेट पेटवून त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यालाही आग लावली आहे.

आतापर्यंत स्थानिक नागरिक कंपनीच्या बाजूने होते, असेच चित्र निर्माण करण्यात आले होते. पण, आता हे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान येथील ग्रामसभाही कंपनीच्या विरोधात असल्याचे कळते. कंपनीला स्थानिक नागरिकांसाठी येथे रुग्णालय सुरू करायचे आहे. त्यासाठी ग्रामसभेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून कंपनी प्रयत्न करत आहे. यासंदर्भात रविवारीच ग्रामसभेची एक बैठक झाल्याची चर्चा आहे. मात्र, कंपनीचा डाव ‘आवळा देऊन कोहळा काढण्याचा’ आहे, अशा समजातून ग्रामसभेने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याचे कळते. त्यामुळे पुढील काही दिवसांत पुन्हा विरोधाचे वारे जोरात वाहू लागण्याची शक्यता आहे. असे असले, तरी त्रिवेणी कंपनी अतिशय धीरगंभीरपणे, हिंमत न हारता व नक्षलवाद्यांच्या प्रभावाला न घाबरता आपले कार्य करत आहे. त्यांचे अधिकारी, कर्मचारी, मजूर अगदी आतपर्यंत मुक्त संचार करत नक्षलवाद्यांना जणू आव्हानच देत आहेत. त्यामुळे ही कंपनी ठरवलेले कार्य निर्धास्तपणे पूर्ण करेल, असाही विश्वास व्यक्त होत आहे. मात्र त्याचवेळी स्थानिक विरुद्ध कंपनी असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

….आणि ते दोघे निघाले ‘छुपे रुस्तम’

सुरजागड प्रकरणात दोन डॉक्टरांची कथा मोठी अजब आहे. हे दोघेही या प्रकरणातील ‘छुपे रुस्तम’ आहेत. यातील एक शासकीय सेवेत आहे, तर दुसरा खासगी वैद्यकीय व्यवसाय करतो. यातील एक जण जिल्हा सोडून पळाला आहे, तर दुसरा जिल्ह्यातच मोठा दवाखाना उभारून आरोग्य सुविधा पुरवीत आहे. मात्र या दोघांचा सुरजागड प्रकरणात मोठा सहभाग आहे. काही वर्षांपूर्वी लॉयड मेटल्स कंपनीच्या वतीने सुरजागड पहाडावर उत्खननाचे कार्य सुरू झाले, तेव्हा शासकीय सेवेत असलेल्या एका प्रसिद्ध डॉक्टरने कंपनी व ग्रामस्थांमध्ये मध्यस्थी केली होती. पुढे या डॉक्टरला नक्षलवादी व ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला हा जिल्हाच सोडावा लागला होता. आणि सध्या तो नागपूर जिल्ह्यात सेवारत आहे. लवकरच तो देश सोडण्याच्या मार्गावर असल्याचे बोलल्या जात आहे. याला अनुसरून दुसरा डॉक्टरदेखील या क्षेत्रात दाखल झाला. जिल्ह्यात मोठा दवाखाना थाटून समाजसेवी कार्य करण्याची कसब बाळगणारा हा डॉक्टर सध्या सुरजागड प्रकल्पात स्थानिक काम पाहत आहे.
एक विलक्षण योगायोग म्हणजे नव्याने आलेल्या त्रिवेणी कंपनीसाठीही एक डॉक्टरच मध्यस्थी करत आहे. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात वैद्यकीय सेवेऐवजी या औद्योगिक सेवेवर या डॉक्टरांनी लक्ष केंद्रित केले आहे. २०१६ मध्ये वरिष्ठ नक्षलवादी नर्मदाक्का हिने या परिसरात जाहीर सभा घेतली होती. या सभेत सुरजागड प्रकरणी अनेकांनी पैसे घेतल्याचा आरोप करत येथील कामाला विरोध करण्यात आला होता. तरीही कंपनीचे काम सुरूच होते.त्यानंतर २३ डिसेंबर २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी कंपनीची ८३ वाहने जाळून भस्मसात केली होती. शिवाय तेव्हा उत्खननाला पाठींबा देणाऱ्या काहीजणांचे खूनही केले होते. आताही नक्षलवादी या परिसरात विरोधाची पत्रके टाकत असून याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles