
‘जनतेला दिलासा फुटकळ बाब; मंत्र्यांना नव्या गाड्या, बंगले महत्त्वाचं’
मुंबई: वस्तू व सेवा करापोटी (GST) राज्यांना द्याव्या लागणाऱ्या भरपाईची रक्कम केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. महाराष्ट्र राज्यालाही रक्कम मिळाली असून राज्य सरकारने इंधनावरचा कर कमी करावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत होती. मात्र, जीएसटीचे पैसे हे केंद्र सरकारने पेट्रोल- डीझेलचे दर कमी करण्यासाठी दिलेले नाहीत, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यानंतर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “जनतेला दिलासा ही फुटकळ बाब. मंत्र्यांसाठी गाड्या, बंगल्याचे नुतनीकरण, विरोधकांचे खटले लढवण्यासाठी महागडे वकील हे महत्त्वाचे,” असे म्हणत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे.
राज्यात इंधनाचे दर कमी करण्याची मागणी होत असताना केंद्र सरकारकडे जीएसटीचे पैसे अडकल्याचे ठाकरे सरकारच्या मंत्र्यांकडून सातत्याने सांगण्यात येत होते. त्यामुळे अखेर केंद्र सरकारने सर्व राज्यांचे हे पैसे दिल्यावर आता तरी उठसूट केंद्राकडे बोट दाखवणारे ठाकरे सरकार आता तरी इंधनावरचा कर कमी करेल का? महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देईल का? असे प्रश्न भाजपाने उपस्थित केले होते.