
अमेरिका पुन्हा हादरले; गोळीबारात तिघांचा मृत्यू
अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथे रविवार, ५ जून रोजी गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. अमेरिकेत वारंवार गोळीबाराच्या घटना घडत असून या घटनांमध्ये निरपराध लोकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. त्यामुळे आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे आज पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आठवड्याचे शेवटचे दिवस असल्याने फिलाडेल्फियाच्या रस्त्यांवर गर्दी होती त्याचवेळी हा गोळीबार झाला. घटनास्थळावरून दोन गन्स जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. गोळीबार करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.
*…म्हणून बायडेन यांना सुरक्षित स्थळी हलवले*
अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत असून २ जून रोजी ओक्लाहोमा येथील सेंट फ्रान्सिस हॉस्पिटलच्या आवारात गोळीबार झाला होता, यामध्ये शुटरसह चार जणांना प्राण गमवावे लागले होते. याशिवाय टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात २१ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने सारं जग हादरलं होतं. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही अमेरिकेतील या घटनांबद्दल काळजी व्यक्त केली होती.