‘दगाबाज’ मृगसरीच्या प्रतीक्षेत…!!

‘दगाबाज’ मृगसरीच्या प्रतीक्षेत…!!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️सविता पाटील ठाकरे, सिलवासा

खरच गावाकडचा पाऊस मला आवडतो; कारण तो मला जवळचा वाटतो. तो आला की मला गावाकडचा नातलग भेटल्यासारखा वाटतो आणि तो माझ्याशी जणू काय गावातील सुख-दु:खाच्या गोष्टी करतो. कसं काय चाललंय असं विचारतो. तेव्हा माझा शेतकरी बांधव त्याला म्हणतो,
‘काय राव औंदा फारच उशिरा येणं केलं. एवढा येळ कुठं अडकला व्हता? माती वाट बघून कटाळली आता. पेरण्या खोळंबल्यात राव.’ मग पाऊस गडगडाट केल्यासारखा हसतो आणि मनापासून खेद व्यक्त करत घरादारावर कोसळतो. मग सारेच जण सुखावले जातात..!

होय …..मला भिजायचंय पहिल्या पावसात… अगदी चिंब -चिंब..! पहिला पाऊस आणि माझंही पहिलं प्रेम… पहिल्या सरीत मला तुझ्या हृदयाला साद घालायची आहे. तुझ्या आणि माझ्या नवीन आयुष्याचा साक्षीदार. हवाय मला तो पाऊस, आणि विश्वास आहे नक्कीच आपल्या प्रेमाचा साक्षीदार होईल तो..

*तुझा हात हातात घेऊनी*
*त्या पावसात मस्त रमावं*
*निखळ रूप तुझं पहावं*
*आणि तुझ्या सौंदर्यात भिजावं…*

तुझी ती निरागसता, तुझे ते टपोरे डोळे, गुलाबी गाल डोळ्यात साठवायचं आहे मला. हे प्राणप्रिय सखी…..मृगसरींच्या अभिषेकाने भिजलेल्या तुझ्या कपाळावर कायमचे स्थान मिळवायचेय मला….

मेघु राया हो पडू द्या तुम्ही हो पाणी….
लोक झाले बहु केविलवाणी ….

हे मृग देवता नको ना अंत पाहू …होतं नव्हतं ते सारं विकून तुझ्यावरील विश्वासा पोटी मातीत टाकलं. नांगरलं, पेरलं, घाम गाळला …आता गरीबाची झोळी भर ना धनधान्याने.

नको अंत पाहू..तुझ्या त्या मृगसरींनी सारी धरणीमाता तृप्त होईल. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल खूप आशेने आम्ही तुझ्या आगमनाची वाट पाहत आहोत. हे मृगराजा, तहानलोय मी खूप …तुला ठाऊकच आहे माझी तहान केवळ तुझ्या जलधारांनीच भागते …नको ना मला माझा स्वाभिमान विकायला लावूस… मी चोच आ…करून तुझ्या तुषारांची वाट पाहत आहे माझी ‘पीयु पीयु’ ऐकायची ना तुला तर मग तुझ्या मृगधारांनी मला तृप्त कर ना …मी आणि माझी घरधनी तुझ्या स्वाती नक्षत्राच्या पावसासाठी आसुसलेलो आहोत. यंदा मृगसरी बरसल्याच नाही. या दगाबाज मृगसरींना एकदा भेटायचे…खरच नी सांगायचे, ‘वेळेवर आलात, बरसलात तर निसर्ग वैभव टिकेल, आम्ही सारे निसर्गाची लेकरे आहोत. किमान आमच्यासाठी तरी येत जा… पुन्हा असा दगा फटका सहन होणार नाही.

रसिक सज्जनांनो…. जून महिना म्हणजे पावसाच्या आगमनाची तयारी.. आपण सारे जण त्या मृगसरींची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहोत .प्रत्येक जण आपापल्या परीने त्यांना साद घालीत आहे. या रुसलेल्या मृग सरींच्या आर्जवासाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनीही सर्व कवी कवयित्रींना साद घातली.

आज बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी ‘मृगसरी’ हा विषय घेऊन अनेक कवी कवयित्रींनी स्व- परीने मृगसरींना बरसण्याची विनंती केली. मराठीचे शिलेदार समूहाचे हे एक वैशिष्ट्यच आहे की.. सर वेळ आणि प्रसंग खूप छान साधतात आणि तेही प्रसंगाचे भान राखून…त्यामुळे वास्तविक भावना आविष्कारला खूप मोठे व्यासपीठ मिळते आणि कवी कवयित्री मनमोकळेपणाने व्यक्त होतात. परिक्षणार्थ रचना वाचतांना आज पुन्हा एकदा याची प्रचिती आली..तेव्हा सर्व प्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. 💐💐💐

शेवटी एकच….

आपल्या काव्यांगणात नवनवीन काव्य फुलांचा सुगंध दरवळावा असे प्रत्येकाला साहजिकच वाटते. पण त्यासाठी स्वतःचे भावविश्व सक्षम करा. नवीन कल्पना विस्तार अनोख्या पद्धतीने रचा. काव्याला वास्तविक आधार द्या. बघा तुमची कविता तुम्हाला स्वानंदाचे बक्षीस नक्कीच देईल. सध्या काही दिवसांपासून प्रकृतीची साथ नसल्याने, ना कुणाला दाद देता येते. ना कुणाला साद घालू शकते. पण शिलेदारीय आपलेपणा निश्चितच मला समजून घेईल या आशेने थांबते…!!

✍️सविता पाटील ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली, दीव दमण
मुख्य परीक्षक/ प्रशासक/ समीक्षक/ लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles