भाजपाने केले ‘यांना’ नाराज ?
मुंबई : २० जून ला होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहे. उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपाच्या मित्रपक्षांमधून नाराजीचा सूर निघू लागला आहे. भाजपाने पंकजा मुंडे यांना डच्चू दिल्यानंतर विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनाही भाजपाने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे ‘ते’ ही भाजपा वर नाराज असल्याचे बोलले जात आहे. भाजपाने आम्हाला काय फक्त वापरून घेतले काय ? असा प्रश्न मेटेंनी केला आहे.
आज जाहीर झालेल्या यादीत २०१४ पासून मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे नाव नाही. राज्यात २०१४ ते २०१९ या काळात भाजपची सत्ता होती. या सत्तेच्या काळातही मेटे यांना मंत्रीपदाची संधीही मिळाली नव्हती. तसेच इतर निवडणुकीतही त्यांना वाटा मिळाला नसल्याची तक्रार त्यांच्या कार्यकर्त्यांनी या आधीही केली होती.
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे आज संध्याकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहेत. भेटीनंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.