कविमनाला भुरळ घालणारी ‘पाऊलवाट’

कविमनाला भुरळ घालणारी ‘पाऊलवाट’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️स्वाती मराडे, इंदापूर जि. पुणे

भवताली वा-यावर आनंदाने डोलतं गवताचं पातं.. मधेच एखादं रानफूल खुशीत झुलतं..‌ टिपाया मधुरस सुरेख फुलपाखरू भिरभिरतं.. मातीशी अजूनही जपून ठेवलंय पावलांचं नातं..! शेतातून, माळरानातून, वनातून, डोंगरदऱ्यातून.. कधी सरळसोट तर कधी वळण घेत, कधी नागमोडी धावत.. मनसोक्त भटकंती करायला लावते, तीच ती तुमची आवडती पाऊलवाट..!

ओढ लागली रानाची जे
सय मनी दाटली
हुंदडणा-या आठवांना
पाऊलवाट भेटली..!

कधी मऊ मऊ माती, तर कधी दगडगोटे.. कुठे खाचखळगा तर कुठे चुकार काटे.. मऊ मातीवर पाऊस पडून निसरडी होते.. तर कधी दगडगोट्यांची ठेचही लागते.. खाचखळग्यात पाय अडकतो तर एखादा काटा पायाला जवळ करतो.. अशावेळी चर्रर होतं हो तिच्याही काळजात.. पण ही छोटी छोटी संकटंच तुम्हाला मोठं बळ देतात आयुष्याची लढाई लढताना.. अनुभवाचं गाठोडे बांधताना.. कठोर होऊन पाऊलवाटेनं दिलेली शिदोरीच बरं का ही..! कधीतरी कुणीतरी मळवलेली पाऊलवाट अनेकांना जीवनाची दिशादर्शक अचूक मार्गदर्शक ठरते.. इवलीशी पाऊलवाटच पुढे हमरस्ता बनते.. एक छोटी चाकोरी कुणीतरी अज्ञाताने पाडलेली असते. आणि त्याच चाकोरीतून पुढे आख्खा माहोल चालत पळत राहतो.. अशीच एखादी पाऊलवाट आपल्याला मुक्कामी घेऊन जाते…

एकेक पाऊल टाकत माणूस पैलतीर गाठतो.. त्याच्या या प्रवासात अनेक पाऊलवाटांचा वाटा असतो.. सुंदर स्वप्न दाखवत यशाच्या मार्गावर चालायला लावणा-या.. संकटाशी लढायला शिकवणा-या.. कधी अवतीभवती हिरवेगार गवत.. तर कधी कुसळकाटे मिरवीत आपली ओळख जपणा-या.. इच्छा आकांक्षाच्या याच पाऊलवाटा अलगद यशाचं क्षितिज कवेत घ्यायला मदत करतात.. एकाच सरधोपट मार्गाने जाणारे अनेक असतात.. पण जेव्हा नवा मार्ग निवडायचा असतो तेव्हा सुरूवात पाऊलवाटच करते..स्वप्नामधील गावा पोहचवणारी तीच..!

ही सान पाऊले जिथे चालली
कधी हुंदडली, कधी धडपडली
ती होती पाऊलवाट आपुली
ही पाऊले जिने कणखर केली..!

एखाद्या चकचकीत रस्त्यापेक्षाही कवीमनालाही भुरळ घालते ती हीच पाऊलवाट.. गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेली हीच ‘पाऊलवाट’.. आपणा सर्वांच्या प्रतिभेला साद घालून गेली. आणि तुम्हीही तिला छान प्रतिसाद दिला.. जीवनाचा थाट, आठवणींची सय, नागिणीची उपमा, हिरवाईने नटलेली, साज चढवणारी, कठोर संदेश‌ देणारी, मऊ मखमली वाटणारी.. अशी एक ना अनेक रूपात ही पाऊलवाट भेटली.. प्रतिभेच्या या पाऊलवाटा अशाच हिरवळत राहोत.

स्वाती मराडे, इंदापूर जि. पुणे
मुख्य परीक्षक, लेखिका, कवयित्री, सहप्रशासक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles