
हे भारतमाते, जरा भीक मिळेल का लोकशाहीची..
_प्रिये..! माणुसकीचा रंग केवळ तिरंगाच असतो..!_
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला वैनगंगेच्या किनारी, किर्रर अंधारलेल्या व झुल पडलेल्या सांजवेळी माझ्या आणि मित्राच्या हातात बाॕटल होती एक एक बिअरची… आमची सुरू होती छेडाछेडी मनसोक्त… वरून मायबहिणी वरून शिव्या एकमेकांच्या जातीला देत, स्वातंत्र्याचे सुख भोगत बियर रिचवत होतो आम्ही पोटात तर्रर…
तशी खपन्यारी एक कमरेत लाथ बसली… मी मागे वळून कोण आहे? असं चवताळून पाहिलं…. तशी बियर सांडली.
कारण शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, वल्लभभाई पटेल, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी होते माझ्यासमोर अचानक उभे… एका क्षणात माझी दातखीळी व बोबडी वळली…
मागून मानेला पकडत महाराजांनी मारलं मग मला अन् मित्रालाही खूप लाथाबुक्क्यांनी तुडवलं…
दोन-चार कानाखाली लगावले आंबेडकरांनी, जेव्हा त्यांना मी सांगितलं होतं माझं शिक्षण…
राजे म्हणाले यासाठी नव्हता धरला आम्ही स्वराज्याच्या अट्टाहास… कित्येक वार छातीत झेलत तेव्हा कुठे कमावले हे इतके किल्ले. हे बघ माझी आग्र्याहून सुटका झाली तेव्हाची मानेला झालेली जखम… सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटलो तेव्हा पायाला पडलेले काटेरी पापुद्रे… जावळीच्या खोर्यातून अफजलाच्या मागे पडतानाचे हे संहार.. केवळ अभिमानाने मिरवत होतो.. माझ्या जनतेसाठी, रयतेसाठी… पण तुला बघून फुकट गेलं अस वाटू लागलं हे स्वराज्य!
शेवटी स्वराज्य म्हणजेच तर स्वातंत्र्य होतं पहिलंवहिलं… पण, साडेतीनशे वर्षानंतर इथल्या प्रत्येकाने आणले स्वतःचेच राज्य… जन्माला आलीत 135 कोटी जनतेची 135 कोटी देश…!
महाराजांच्या डोळ्यात आलेल्या पाण्यात मी स्वतःला शरमेनं मान खाली टाकताना पाहिलं…
पाठीमागून आलेल्या पोलादी वल्लभभाईनी खांद्यावर हात ठेवत विचारले, 565 संस्थानिकांची समेट घडवून मी तरी काय सिद्ध केलं… आज तूच सांग..! मी निरुत्तर झालो.
भगतसिंग तर खवळलेच होते. त्यांनी इंकलाबचा अर्थ सांगितला मला धगधगता इतिहास.. असचं नाही मिळालं आपल्याला हे स्वातंत्र्य… हे बघ माझ्या गळ्याला फासाने मरेपर्यंत कापलेलं..
त्यांचा तो गळ्याला फासामुळे झालेला जीवघेणा व्रण मी पहिल्यांदा पाहिला…
आंबेडकरांनी दाखवली मला शाईने रक्ताळलेली बोटं… माझ्या आजच्या मिनरल वाॕटरच्या चोचल्यामागं.. कित्येक पिढ्यांच्या जीवांची तहान आहे… ही तहान भांडून कमवावी लागली. जरा लक्षात घे.. असे सांगितले त्यांनी.
महात्मा फुल्यांनी दाखवलं मग दीडशे वर्ष मागचं शेण त्यांच्या अंगाखांद्यावरच. सावित्रीबाई तर ओक्साबोक्शी रडल्या. त्यांचे एक एक कातर अनुभव सांगताना…
ती रडली खूप मात्र… तिची आजची सुशिक्षित पिढी कशी वागते हे ऐकताना…
बापू म्हणजे गांधीबाबा बिचारा कुडकुडत होता… बिन कपड्यात सालोसाल… तो बिचारा हसला तरीही… बाळा काय करतोस असं? नको करू… काळजी घे…
मी ज्याचा इतका द्वेष केला, त्याची काळजी बघून मीही गहिवरलो पार..
मला आठवले… त्याला शिव्या घालतानाचे एकएक प्रसंग.. त्याच्या नावाचे खोटे फॉरवर्डेड मेसेज आणि चाळीस पैशांवर तोलून धरलेल्या सोशल मीडियातल्या किमतीवर ही त्याचा सविनय चेहरा बघून स्वतःच्या माॕबलिंचिंग विचारांची वाटते मला अक्षरशः लाज…
मागून आलेल्या आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी सांगितलेली ईस्ट इंडिया कंपनी विरुद्धची बंडाळी आणि मग झाशीच्या राणीने ऐकवल्या 1857 च्या बंडातील मेरी झाँशी नही दूँगी या गर्जनेसह तिच्या वेदना…
सिराज उद्दौलानं गमावलेली प्लासी आणि अश्फाक उल्लाची फाशी ही मला त्यादिवशीच कळाली.
खांद्याला खांदा लावून भिडणारे नेहरू, मौलाना आझादचे खांदे उखडून फेकलेत आपणच… त्यामुळे आता नेहरुच वाटतात प्रत्येक कार्यालय दोषी…. आणि मौलाना आझाद वाटतात मोहम्मद अली जिना..!
स्वातंत्र्योत्तर हमीद दलवाईची झाली या देशात केव्हाच राख… प्रत्येक धोरणात पाक… देश खाक..
धर्म म्हणजे चौकातले परधर्मियांचे बॅनर फाडणे… स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार… काय खरं, काय खोटं? मी पुरता गोंधळून गेलो आतल्या आत…
इतक्यात पाठीमागून एक व्यक्ती आली… खूप प्रयत्न केला पण मी त्यांना ओळखू शकलो नाही… तसा एक जोराचा दणका माझ्या पाठीत परत बसला…
आंबेडकर म्हणाले, अरे ज्यांनी दलितांसाठी अक्का देह झिजवला त्यांचं कार्य तू कस विसरलास? किमान त्यांचं नाव तरी लक्षात ठेवायला हवं होत…
तू वाचतोस की नाही काही?
हो मी वाचतो रोज… मोबाईल वर आलेला फारवर्डेड इतिहास…
आंबेडकर परत हसले.. त्यांचा प्रॉब्लेम ऑफ रुपीचा प्रबंध आणि मुकनायकाचे अंक किती कोसो दूर ठेवल्या गेलेत षडयंत्राने? तेव्हा मनुवाद्यांनी, आज आयटी सेलवाल्यांनी…
आंबेडकरांनी नाव सांगितलं मला तत्क्षणी विठ्ठल रामजी शिंदेचे…
मी ते पहिल्यांदाच ऐकलं..!
मला आता हा भार सहन होत नव्हता.. माझ्यातला देश मेलेला मलाही पाहावत नव्हता… स्वातंत्र्यदिनाच्या स्टेटस सिम्बॉल करून मी कशी करू शकतो बेइमानी माझ्या देशाशी, गावाशी? देशभक्तीला धर्माशी, लष्कराशी, नेत्याशी, निरो आणि हिटलरशी जोडून?
मी विसरून गेलो बेरोजगारी, महागाईही असतो महत्वाचा मुद्दा.. आपल्या कुठल्याही जातीय धार्मिक अभिनिवेशापेक्षा…
माणसाचे असतील रंग भगवे, निळे, हिरवे, पिवळे… पण, माणुसकीचा रंग केवळ तिरंगाचा असतो..!
14 ऑगस्टच्या सांजवेळी नशा उतरून मी खाडकन डोळे उघडले आता स्वातंत्रदिनाच्या भल्या पहाटे… महापुरुषांच्या जीर्ण झालेल्या हातांनी मला माझे थोबाड, मुस्काड खाल्लेले गाल खरतर अभिमानाने मिरवायचे नव्हते… दुःखाने गोठवायचेही नव्हते..
मग मी खिशातून काढली पाचशेची नोट.. त्यावर दिसली मला गांधींच्या चष्म्यात पाणी.. त्यात मिसळलेले माझे दोन अश्रू.. तिथेच अडकलेली आजची आजादी…
हे भारतमाते, जर मला भीक मिळेल का लोकशाहीची…., तू काळजातला तिरंगा, प्रिये!