
जगण्याचं सार सांगणारा युगंधर…!!
स्वाती मराडे, पुणे
(गुरूवारीय परीक्षण)
अवघ्या सृष्टीने हिरवाईचा चढवला आहे साज.. पानाफुलांवर, तृणपात्यांवर सजली आहे दवबिंदूंची आरास.. आकाशी सांडला आहे लखलखणारा चांदणचुरा.. त्यातूनच डोकावतो आहे मेघ तो वेडा.. अर्धरात्री क्षितिजावर चंद्र स्वागता उभा.. चंद्रकिरणांची आज आगळीच आहे प्रभा.. वसुदेवाच्या पायातील शृंखलाही गेल्या आहेत गळून.. ती यमुनाही खळखळत आहे आनंदाने दुथडी भरून.. अधीर मनाने सगळेच आज पहात आहेत वाट कुणाची.. चाहूल लागली अष्टमीला श्रीकृष्ण जन्माची..!
श्रीकृष्णजन्म आहे आज
झालीय सृष्टी सगळी आतुर
आसुसली पदस्पर्शासाठी
आला यमुनेलाही पूर..!
श्रीकृष्ण.. प्रत्येक घरातील देवघराला कृष्णमूर्तीशिवाय पूर्णत्व येतच नाही. एवढेच नव्हे तर कोणतीही मुलगी प्रथम सासरी निघते ती पाठीराखा म्हणून सोबत कृष्णमूर्ती घेऊनच.. प्रिती असो वा मैत्री.. वा असो अन्याय, अधर्माविरूद्ध लढणं.. पाठीराखा म्हणून धावणारा बंधू.. गोपांसाठी लोणी चोरणारा माखनचोर.. अलगुजाच्या सुरांनी अवघ्या जनास मोहिनी घालणारा मनमोहन.. गाईगुरे सांभाळणारा गोपालक.. गवळणींमध्ये रासक्रीडा रचणारा चितचोर कान्हा.. फलेच्छा न करता कर्म करत रहा हे गीतारूपात जगण्याचं सारं सांगणारा युगंधर.. स्त्री रक्षणकर्ता.. गरज असेल तिथे नातीगोती जपणारा हितचिंतक.. मार्गदर्शक.. अन् कर्तव्यपूर्ती होताच या गुंत्यातून अलगद स्वत:ला बाजूला करणारा तो श्रीकृष्ण.. चारदोन शब्दांत त्याला सामावणार तरी कसे.. आज त्याचा जन्मोत्सव.. त्यानिमित्ताने हा केवळ ओझरता शब्दस्पर्श
अर्ध्या रात्री कारागृहात जन्माला येऊन..जन्मत:च आईवडीलांपासून दूर होऊनही युगानुयुगे आकाशाची उंची गाठता येते याचा आदर्शपाठ घालून देणारा.. तो श्रीकृष्ण तर आहेच.. पण त्याचवेळी क्षणिक मोहमायेच्या बेड्या तोडून मुलाच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी पुराच्या पाण्यात शिरून स्वतःचा जीव धोक्यात घालणारा एक बापही या जन्मोत्सवावेळी आवर्जून आठवतो.. म्हणूनच श्रीकृष्णजन्म एक अविस्मरणीय सोहळा आहे.
आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी विषय आला तो ‘श्रीकृष्णजन्म’.. काव्य रसिकांना नेहमीच ज्याने भुरळ घातली तो हा सावळा.. लेखक, कवींच्या लेखणीचे प्रेरणास्थान.. ज्याच्या उल्लेखाशिवाय भारतीयांचं साहित्यविश्व अधुरं ठरेल..विशेषत: गवळण हा काव्यप्रकार तर कृष्णालाच अर्पण केलेला.. खरेतर त्याचे जीवनच परिपूर्ण आदर्शांनी भरलेले.. तरीही अनेक लोकगीते, लोककथांमधून त्याच्यावर काल्पनिक पुटं चढवली गेली कारण त्याच्या जीवनाने खरोखरच सर्वांना मंत्रमुग्ध केलेले.. असा हा ‘श्रीकृष्ण’ मराठीचे शिलेदारांनाही भुरळ घालून गेला नि चारोळीरूपात शब्दबद्ध झाला. सहभागी सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन.
स्वाती मराडे, पुणे
परीक्षक, कवयित्री, लेखिका