
‘शिवचरित्राचे धडे देणारी जिजाऊ घराघरात निर्माण व्हावी’; जिजाऊ ब्रिगेड, प्रदेशाध्यक्ष सविता पाटील ठाकरे
सिलवासा: एक आदर्श पत्नी,आदर्श माता जिजाऊ. आऊंनी शिवबांना घडविले त्यांना ताकद दिली. अर्थात याची पायाभरणी संस्कार आणि शिक्षणाच्या माध्यमातून केली. भावना, नाती यापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या आऊ साहेबांचा इतिहास दैदिप्यमान आहे. छत्रपतींना ज्ञान, चारित्र्य ,चातुर्य , संघटन, पराक्रम अशा राजस व सत्त्व गुणांचे बाळकडू त्यांनी लहानपणीच दिले. आज आपण समाजात जेव्हा मुला मुलींबाबत अनेक वाईट गोष्टी घडताना पाहतो तेव्हा आई म्हणून आपण कुठे कमी तर पडत नाहीत ना? अशी शंका मनात येते. आज-काल मुलांवर संस्काराचे कोंदण करणे खूप गरजेचे आहे. तासनतास मोबाईल, इंटरनेटवर असणाऱ्या मुला मुलींना शिवचरित्राचे धडे देणारी जिजाऊ जोपर्यंत घराघरात निर्माण होणार नाही तोवर छत्रपतींचे विचार जनसामान्यात कसे बरे रुजणार? त्यासाठी प्रत्येक घरात जिजाऊ निर्माण व्हावी. असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेड सिलवासा येथील प्रदेशाध्यक्ष सविता पाटील ठाकरे यांनी केले. त्या दि ७ जानेवारी रोजी झालेल्या मराठा सेवा संघव जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री टॉवर येथील सभागृहात आयोजित ‘जिजाऊ उत्सव, मराठा जीवन गौरव पुरस्कार व गुणवंताचा सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, की दैववादाचा अतिरेक न करता प्रयत्नवाद स्वीकारणं हीच आजची गरज आहे. आदर्श आई तू, संस्कारांची ज्योती तू, निर्भीड रुपी खरा इतिहास जगी निर्मला तू असाच गौरवशाली इतिहास घडवणाऱ्या शिवछत्रपतींच्या जाज्वल्य विचारांवर चालणारा मराठा तथा मराठी समाजाला एकत्र बांधणाऱ्या मराठा सेवा संघाची विचारधाराच मुळी सेवा, स्नेह ,कर्म ,ज्ञान ,क्रीडा ,श्रद्धा, शक्ती व कृषी या तत्त्वावर आधारित आहे. तेव्हाच तर कर्तृत्ववान हातांना नेहमीच बळ देण्याचे सत्कर्म संघ पार पाडतो. आज या ठिकाणाहून मराठा जीवनगौरव पुरस्कार व गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून मान्यवरांच्या कौतुकाची थाप सन्मानर्थीसाठी प्रेरणादायी असल्याचे सविता पाटील ठाकरे म्हणाल्यात. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेड कार्यकारणीतील सभासदांना प्रेदशाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.