गिरनार गुरुशिखर दर्शनाची ओढ..

गिरनार..गुरुशिखर दर्शनाची ओढ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बऱ्याच वर्षांपासून गुजरात सौराष्ट्र येथील जुनागढच्या भूमीवर उभ्या असलेल्या गिरनार पर्वतावरील गिरीशिखर दर्शनाची मनाला ओढ लागली होती. माझ्या काही मैत्रिणी जाऊनही आल्या होत्या. मे महिन्यात अशीच एक दिवस घरातील साफसफाई करत असताना, मला गिरी परिक्रमा पुस्तक मिळाले.निवांतक्षणी ते पुस्तक वाचताना माझ्या मनात गुरुशिखर दर्शनाची ओढ पुन्हा जागृत झाली.मी मनातच दत्त महाराजांना म्हटले ” माझा योग कधी येणार? मलाही तुमच्या दर्शनाची आस लागली आहे.” आणि मला एकदम भरुन आलं. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी माझ्या एका मैत्रिणीच्या मैत्रिणीचा म्हणजे मांजरेकर ताईंचा फोन आला.त्या म्हणाल्या आमचा गृप गिरनारला जात आहे, तुम्ही येणार आहात का? मी मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्यांना माझा होकार कळवला. आम्ही चौघीजणी मैत्रिणी बाकी एक गृप अशा सगळ्या मिळून आमचा पंधरा जणी होतो. चोवीस जून रोजी वापी वरुन ठिक ४ वाजून ३० मिनिटांनी आम्ही सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस पकडली.सकाळी आम्ही वेरावल इथे उतरुन रिक्षा केली आणि भारत सेवा संघ आश्रम , सोमनाथ इथे आलो. तिथे फ्रेश होऊन आम्ही सोमनाथ महादेवाच्या दर्शनाला निघालो.तिथे दर्शन व महाप्रसाद घेऊन आम्ही त्रिवेणी संगम, बाणगंगा, गीता मंदिर व भालका तीर्थ या स्थळांना भेटी दिल्या. दुपारी दोन च्या पॅसेंजर ने आम्ही जुनागढला आलो.

जुनागढला आम्ही आधीच मंगलम हॉटेल मध्ये रुम बुक केली होती. हॉटेल वर आल्यावर फ्रेश होऊन आधी चहा मागवला. पावसात भिजून आल्यामुळे गरमागरम चहा पिण्याची मजा काही औरच असते.दुपारी थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी आम्ही रोप वे ची माहिती काढण्यासाठी बाहेर पडलो.रोप वे ने पाच हजार पायऱ्या चढून अंबाजी मातेचे दर्शन घेऊन गुरुशिखरापर्यंत पाच हजार पायऱ्या चढून जायचा मानस होता. रोप वेच्या ठिकाणी गेल्यावर तिथल्या गार्ड ला रोप वे किती वाजता सुरू होतो विचारल्यावर त्याने सकाळी सात ची वेळ सांगितली. परंतु पाऊस आणि हवा असेल तर बंद ही राहू शकतो अशी शंकाही व्यक्त केली.आम्ही विचारात पडलो.पाऊस असला आणि रोप वे बंद असला तर काय करायचं? इथे येण्याची धडपड वाया जाणार का असा प्रश्न पडला. आम्ही मनातले सगळे विचार झटकून गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चढवावा हनुमानजीचे दर्शन घ्यायला गेलो. असं म्हणतात की आपण भक्तिभावाने दर्शन घेऊन चढायला सुरुवात केल्यावर आपल्याला चढण्यासाठी बळ मिळते. तिथेच असलेल्या अंबामाता आणि स्वामी समर्थ व दत्त प्रभूंचे सुध्दा दर्शन घेतले व त्यांना प्रार्थना केली की आम्हाला पाच हजार पायऱ्या चढण्यासाठी बळ दे आणि दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन सुखरूप होऊ दे. नंतर गिरी नारायणाच्या पहिल्या पायरीवर माथा टेकवून आम्ही पाच पायऱ्या चढायला सुरुवात केली. परंतु बघता बघता २१ पायऱ्या चढून गेल्यावर असं वाटू लागलं आपण आत्ताच चढायला सुरुवात करू. दहा हजार पायऱ्या चढूनच जाऊ. बहुदा तिथल्या सकारात्मक लहरींचा सुध्दा हा परिणाम होता.

आम्ही आमच्या मनाला आवर घातला आणि परत फिरलो.येताना लंबे हनुमान, श्रीराम मंदिर येथे दर्शन घेऊन आजुबाजुचा परिसर फिरून हॉटेल वर आलो. पुन्हा एकदा गरमागरम चहा घेतला आणि रात्री साडे आठच्या सुमारास जेवण केले.सकाळी लवकर उठायचं असल्यामुळे रात्रीच सॅग भरुन ठेवली. रात्रभर पाऊस कोसळतच होता.पहाटे पाच वाजता जाग आली. पाऊस अजूनही सुरूच होता. आपण इथपर्यंत आलोय तर आता माघार घ्यायची नाही.दहा हजार पायऱ्या जाऊ भले येताना संध्याकाळ झाली तरी चालेल यावर आम्हां चौघींच एकमत झाले. आम्ही तयार झालो. सॅग मधे पाण्याची बाटली ठेवली व सॅग पाठीला अडकवली आणि रुमच्या बाहेर पडलो.

अर्चना सरोदे, सिलवासा
दादरा नगर हवेली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles