“ऋणानुबंधाची दुसरी बाजू म्हणजे मायेचा ओलावा…”; सविता पाटील ठाकरे

“ऋणानुबंधाची दुसरी बाजू म्हणजे मायेचा ओलावा…”; सविता पाटील ठाकरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_

माझं घरकाम करणारी रखमा…. तसं. नावाला घरकाम करणारी. पण, स्नेहाचा ओलावा आम्ही एवढा छान जपलाय, की कधीच परकेपणा वाटला नाही. तिला आणि मला देखील. दिवसागणिक आमच्यातला ‘मायेचा ओलावा’ हळूहळू वृद्धींगत झाला. थोडं भूतकाळात जाते…!! मला आठवतं…तसं तिचं विश्वच मुळी सिमित होतं. नवऱ्याचं अकाली निधन, गरिबी, जाच, त्रास सारं काही दिलं होतं देवानं तिच्या वाट्याला. यातून सुटका करत आपल्या लहानशा गीताला घेऊन तिने शहर गाठले. कर्मधर्म संयोगाने तिची आणि माझी गाठ पडली आणि आमचं स्नेहवलय गडद होत गेलं दिवसेंदिवस.

रखमा खूप प्रामाणिक होती. पडेल ते काम आणि माझा शब्द तिच्यासाठी प्रमाण होता. तशी मिही एकटीच..यांना जाऊन अनेक वर्ष झाले, मुलगा परदेशी तर मुलगी स्वतःच्या संसारात… कुणालाच वेळ नव्हता माझ्या सुखदुःखात वाटेकरी व्हायला. एके दिवशी काळाने डाव साधला, माझ्या घरी येतांना घरासमोरच रस्ता ओलांडताना रखमाला अपघात झाला व होत्याचं नव्हतं झालं ,गीतावरचा मायेचा हात कायमचा निखळला. खूप विचारांती मी निर्णय घेतला.. किंबहुना दुसरा इलाजही नव्हता माझ्यासमोर,गीताला मीच सांभाळायचं ठरवलं. तसं तिचं कोण होतं? हळूहळू ती मोठी होत गेली माझ्या घरात, माझं आणि तिचं मायेचं नातं घट्ट होत गेलं अन् रक्ताचं मात्र धुसर..!!

माझ्या सुखदुःखात, आजारपणात तीच माझी सखी झाली. आईरुपी मी आणि माझ्या ‘मायेचा ओलावा’ तिच्या डोळ्यात कित्येकदा अश्रुंच्या रूपांत पाहिला मी. मी ऍडमिट होते पुष्कळ दिवसापासून…..! आज डोळे उघडलेत, समोर गीताचा हसरा चेहरा दिसला अन् मी अर्धी बरी झाले. माझ्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती. गीताने माझ्या प्रेमाची परतफेड करत माझ्या ‘मायेचा ओलावा’ जोपासत मला पुनर्जीवन दिले होते. होय…. तिने न सांगता एक किडनी मला दान करून पुन्हा उभं केलं होतं. मुलगा परदेशी सुनबाईत रममान, तर मुलगी स्वतःच्या चौकटी कुटुंबात एवढी व्यस्त होते, की मी जिवंत आहे की मेली? याचा तपास करून दहा वर्ष तरी लोटली होती. पण माझ्या मायेचा ओलावा मला हातात घेऊन हसत हसत म्हणत होता. “ये आई… भिऊ नकोस मी आहे तुझ्यासाठी” हे बोलणं माझ्या काळजापर्यंत पोहोचले होते.

माझी आजी नेहमी म्हणायची. “जंगल ना पाखरुले मया लाई तर ते बी जवळ येस, माणसं जोडो तोडू नई ” तिच्या शब्दांची आज मला राहून राहून आठवण येत होती. ‘मायेचा ओलावा’ किती सुखद असतो नाही. निस्वार्थी असतो, प्रामाणिक असतो, अपेक्षा विरहित असतो आणि महत्त्वाचा म्हणजे बेगडी तर अजिबात नसतो. जोपासला की घट्ट होतो निरपेक्ष असतो म्हणूनच तर टिकतो. धेनूसाठी व्याकुळ झालेले वत्स दश दिशा अवलोकीत असते, पक्षिणीचे पिलू द्वाराजवळ येऊन आपले कोवळे लालट मुख पसरित असते. माहेरचे बोलावणे येईल का? यासाठी सासुरवाशीन प्रतीक्षा करीत असते. यात वात्सल्य आणि मायेचा पाझर दिसून येतो. मायेचा ओलावा आत्मविश्वासाचे बळ देतो, त्यात कधी आर्जव तर कधी आग्रह, कधी सांशकता तर कधी विश्वास, कुठे हुरहुर तर कुठे व्याकुळता, कधी बौद्धिक युक्तिवाद तर कुठे वकिली पक्ष समर्थन सारं प्रतीत होतं.

आपणही अनुभवलं असेलच…! डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत मुंबईतील फूटपाथवर कुडकुडत झोपलेल्यांना गुपचूप अंगावर चादर टाकणारे. आपली मदत कोणाला दिसू नये म्हणून स्वतःचं तोंडही बांधून रात्रभर फिरतात. तीव्र उन्हात पक्षांसाठी दाणापाणी गॅलरीत ठेवणारे..सेवाभावी वृत्तीने आणि मायेच्या ओलाव्याने रुग्णांची सेवा करणारे,घरच्या गरीब परिस्थितीमुळे किंवा वडिलांच्या आत्महत्येमुळे लग्न न करू शकणाऱ्या मुलींचा सार्वजनिक विवाह सोहळा आयोजित करून त्यात स्वतःच्या मुलांचे देखील लग्न लावणारे…. यात मायेचा ओलावा ओतप्रोत भरला आहे. सारस्वत दादा ताई…..ऋणानुबंधाची दुसरी बाजू म्हणजे मायेचा ओलावा…!!

“माझे घट्ट इवले घरटे, त्याला स्नेहाचा गिलावा,
बंध रेशमी नात्यांचे ,त्यांना मायेचा ओलावा. ..”

आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी “मायेचा ओलावा” हा विषय दिला आणि भावनांचा नव अविष्कार तोही सर्जनशील लेखणीतून पहावयास मिळाला. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील लेखनास भरभरून शुभेच्छा..!!

सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/प्रशासक/कवयित्री/कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles