‘खऱ्याले मिळते गोळी, खोटे खाते पुरणपोळी’

‘खऱ्याले मिळते गोळी, खोटे खाते पुरणपोळी’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

संजय सेवकांचा नवख्या व निष्क्रीय प्रशांत सुनील समोर आव्हान – चौरंगी लढतीचे आसार

भंडारा – भंडारा गोंदिया लोकसभेच्या मैदानात भाजपाकडून लोकसभेचे ‘निष्क्रीय’ पण विद्यमान खासदार सुनील मेंढे व पुर्वाश्रमीचे भाजपाचे पण आता ‘निळ्या वादळात भगव्याची रंगसंगती’ जमवत भंडाऱ्याचे माजी नगरसेवक बसपाचे संजय कुंभलकर,काँग्रेस कडून बापाच्या पुण्याईची ओंजळ भरत नानाकाकाजी असा एकच सुर आवळत ‘यादो की बारात’ म्हणून नावारुपास आलेला नवखा प्रशांत पडोळे आणि चरित्रापासून चारित्र्यापर्यंत नानाजीं विरुध्द गळा आवळत काँग्रेसपासून ‘वंचीत’ राहिलेले सेवक वाघाये पाटील यांनी शड्डू ठोकले आहेत. हे कसलेले मल्ल आता आमने सामने उभे ठाकल्याने भंडारा गोंदिया जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे यंदाची निवडणुक म्हणजे खऱ्याले मिळते गोळी खोटे खाते पुरणपोळी अश्या वळणावर येवून ठेपली असून ही निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठतेची झाली आहे. पहिल्याच टप्प्यात अटीतटीची लढाई पोहोचली आहे.
निवडणूक हा खरोखर ‘उत्सव’ आहे आणि इतर उत्सवांप्रमाणेच यातसुद्धा ‘रंगत’ असते. हे आता चांगलेच जाणवायला लागले आहे. रणांगणावर जाण्यापूर्वी जसे योद्ध्यांचे बाहू फुरफुरतात, तशा ‘रंजनपरायण’ नेत्यांच्या जिव्हा सळसळू लागल्या आहेत. कधी एकदा माईक समोर येतो आणि आपण ‘टीआरपी’ वसूल करतो, या चिंतनात ते दबा धरून बसलेत. बऱ्याच जणांनी ‘हेडलाईन’ होतील असे मुद्दे जमवूनही ठेवलेत. पण तोफेला बत्तीच देता येत नाही अशी अवस्था झाल्यामुळे हा दारूगोळा आतल्या आत खदखदतोय. कोण कुणाचे काम करणार, कोण करणार नाही, कोण नाराज होणार, कोण यू-टर्न घेणार वगैरे बाबी येत्या काही दिवसांत हळूहळू खुल्या व छुप्या प्रचारातून स्पष्ट होत जातील. पक्षांची आणि आघाड्यांची चेहरेपट्टी एकदा निश्चित झाली, की मेकअप करून प्रयोगाला सुरुवात होईल. फेरबदल किंवा भूकंप वगैरे शब्दही आता प्रभावशून्य ठरलेले असल्यामुळे नव्या भिडूंना नव्या घरात ‘अ‍ॅक्लमटाईज्’ होणे आता पूर्वीसारखे अवघड राहिलेले नाही. त्यामुळे पडदा उघडण्यापूर्वीचा अंकही टाळ्या आणि हशा वसूल करतोय. मतदानाच्या दिवसापर्यंत आपले चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणे, हे नव्या भिडूंना आव्हान ठरणार आहे.

बापापेक्षा नेता मोठा मानणाऱ्या सदा बेरोजगार असणाऱ्या पक्ष कार्यंकर्त्यांना आपल्या घराप्रमाणेच शेजाऱ्याचे घरही दु:खात आहे, हे पाहणेही त्यांच्यासाठी उत्सवच असतो. राजकारणाचे डाव हे मैदानात कमी आणि मैदानाबाहेर जास्त टाकले जातात. त्यातून विरोधकांना मानसिकदृष्ट्या पराभूत करण्याचा प्रयत्न होतो. त्यात यश आले की, लढाईला तोंड फुटण्यापूर्वीच अर्धी लढाई जिंकता येते. आपल्या संगनिष्ठेत रामाचा आसरा घेत शेंडीला गाठ बांधून राजकारणात पाऊल टाकणाऱ्या विद्यमानांनी आताही दुसऱ्यांदा खासदार बनण्यासाठी राम नामाचा सहारा घ्यावा लागत आहे. मतदारसंघातील जनतेला गरीबी रेषेच्या खाली ठेवत पाच वर्षाच्या कार्यकाळात ३० कोटीची मोहमाया जमविणाऱ्या ‘महोत्सवजीवी’च्या गळ्यात पुन्हा ‘माला’ पडणार काय हे बघण्यासारखे राहील. संघटनेत लुडबुड करत तरण्याबांड नवख्यांना आपल्या परिणय बंधात अडकविणारा नेता विद्यमानांना मनातून सहकार्य करील काय हा ही प्रश्नच आहेच.
प्रेमात आणि युद्धात सारे काही माफ असते असे म्हणतात, त्यात आता राजकीय क्षेत्राचाही समावेश करण्यात येऊ लागला आहे. राजकीय क्षेत्रात सर्कशीतील कलाकारांना लाजवतील अशा कोलांटउड्या मारल्या जातात, कबड्डी, खो-खो, सूरपारंब्या असे भारतीय खेळ खेळले जातात. राजकारणात कालचा शत्रू आज मित्र बनल्याचे पहावयास मिळते. खच्चून विरोध करणारे विरोधक सत्ताधा-यांच्या मांडीवर कधी जाऊन बसतील ते सांगता येत नाही. राजकारणात कधी काय घडेल ते ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही. राजकीय नेते आपली टोपी कधी फिरवतील ते सांगता येत नाही. सत्तासुंदरीसाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. निवडणुका जाहीर झाल्या की राजकारणातील खेळाला खरा रंग चढतो. सध्या असेच ‘राज’कारण जिल्ह्यात रंगते आहे. देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

मूड ऑफ’ कोणाच्या पथ्यावर ?
लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट महायुतीत सामील झाल्याने भंडारा गोंदियाची महायुतीची जागा कायमस्वरुपी जरी भाजपाला आली असली तरी भाजपाच्या अतीउत्साही इच्छूक नेत्याची तिकिट कटल्याने निष्क्रीय उमेदवार द्यावा लागला असल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांचा ‘मूड ऑफ’ झाल्याचे दिसून येत आहे. त्याच भाजप कार्यकर्त्यांना ‘दादा’ ऐवजी ‘भाऊ’चा प्रचार करावा लागणार असल्याने त्यांचाही ‘मूड ऑफ’ आहे. आता या मूड ऑफचा फायदा बसपाच्या संजूभैय्यासाठी किती होतो, हे महत्त्वाचे आहे.

वाघायेच्या सेवकांमुळे धांदल होणार
साकोलीचे काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये (पाटील) हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर नाराज आहेत. पटोलेंनी लोकसभेसाठी ‘डमी’ उमेदवार दिल्याचा थेट आरोप ते खुलेआम करीत आहेत. मागील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पासून ‘वंचित’ होत पाटलांचा सिलेंडर पाहिजे तसा स्फोट करु शकला नाही. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ‘विश्वजीतां’साठी एक ‘कदम काँग्रेस की ओर’ म्हणत नमते घेतले खरं, पण या लोकसभेत नानांच्या राजीनामा अस्त्रापुढे पक्षश्रेष्ठींपुढे त्यांचे काहीएक चालले नाही. नाईलाजास्तव मग पाटलांना काँग्रेसचा जुना ‘सेवक’ बणून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत ‘कपाट’ (आलमारी) ‘मोक्षा’ची दिशेने वाटचाल करावी लागत आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद, विधानसभा व सहकार क्षेत्राच्या निवडणुका लढवल्या असल्याने परिसरात मोठा जनसंपर्क आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles