“सांग दर्पणा…!! काय म्हणतेय माझे चरित्र?”; स्वाती मराडे

“सांग दर्पणा…!! काय म्हणतेय माझे चरित्र?”; स्वाती मराडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे काव्य परीक्षण

आठवतं मला.. लहान असताना मी कधीकधी रडायला लागले की आई माझ्यासमोर आरसा धरायची अन् म्हणायची ‘हे बघ, हे बघ..बाsssळ..!’ मला वाटायचे त्यातही एक बाळ आहे जे आपण करतो तसंच अगदी वागतं. मग मी हसून पहायचे, वेडावून दाखवायचे.. जसंच्या तसं तेच प्रतिबिंब पाहून मी खूप खूश व्हायचे… आता कळतंय तो आरसा म्हणजे माझे चरित्र. मी केलेल्या कर्माचे प्रतिबिंब दाखवणारा. अगदी मुखवटे चढवले असले तरी ते उतरायला लावून अंतरंगात डोकवायला लावणारा.

तोरा मन दर्पण कहलाये |
भलेबुरे सारे कर्मों को, देखे और दिखाये ||

थोडी मोठी झाल्यावर तर छंदच लागला सारखे त्यात पहायचा. नवीन कपडे घातले की आरशात पहायचे, कानातले असो की गळ्यातले. नवीन टिकली असो की नवी केशरचना. काहीही घातलं की आरशात पहायचं. जणू सांग दर्पणा मी कशी दिसते? बाह्य सौंदर्याने शरीर सजते मग चरित्र माझे कसे सजणार. हळव्या संवेदनशील मनाने, प्रामाणिक सचोटीपणाने, इतरांविषयीच्या सहानुभूतीने, ममतेने व दयाळूपणाने.. परोपकाराने, मदतीच्या हाताने, सांत्वनाच्या शब्दाने.. किती ही आभूषणे चरित्र सजवायला..!

कधीकधी अहंकार वाढतो सौंदर्याचा. पण मनाच्या आरशात स्पष्ट खुणा असतात चरित्र दाखवणा-या. भलेबुरे अनुभव दाखवणा-या, कठीण प्रसंगाच्या, संघर्षाच्या, हळवेपणाच्या.. त्या त्या प्रसंगी आपण खरे उतरलोत का हे त्याला खुशाल विचारावं मग.. चित्रपटातील प्रसंग पाहूनही माझे डोळे ओलावतात‌ ? जखमी झालेला कुत्रा असो की भुकेने व्याकूळ एखादा वृद्ध दिसो.. माझ्यातील हळवं मन जागं होतं नि मदतीसाठी धावून जातं ? इतरांच्या वागण्यानुसार माझा पारा चढतो किंवा उतरतो ? तूच ओळख.. सुंदरता की दयाघनता, शोभेची बाहुली की प्रेमळ सावली, दिसण्याचा अहंकार की गुणांचे अलंकार, स्वैर की स्वच्छंदी, केवळ अनुकरण की अवलोकन.. अंतरंगातील हा भाव टिपताना मन आतूनच स्वच्छ हवं नाही का..? नाहीतर धूळ चेह-यावर असल्यावर केवळ आरसा पुसून काय उपयोग?

दिवसातून एकदातरी मी
मनदर्पणी डोकावून पाहते..
उतरवून ठेवते सगळे मुखवटे
नि चरित्र माझे शोधते..!

आज चित्रचारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र दर्पणात व्याकूळ होऊन पाहणा-या स्त्रीचे.. काय शोधत असेल तिची ती नजर ? असाच मनास प्रश्न पडला. आजवर परिस्थितीशी केलेला संघर्ष, वाट्यास आलेल्या जबाबदा-या, कर्तव्य निभावताना होणारी कसरत.. व हे सर्व करत असताना एक मर्यादेचा उंबरठाही. एक अशी चौकट ज्यात तिचे चरित्र सुरक्षित आहे. इतरांच्याच नव्हे तर स्वतःच्याही नजरेत ती उच्च स्थानी आहे ना ? हेच तर ती डोकावून पहात नसेल? मी पाहिलेले मनदर्पणात, तसेच आहे ना चरित्र माझे? याच प्रश्नातून तयार झालेल्या अनेकविध रचनांनी मन वेधून घेतले. तुम्हा सर्वांच्या वैचारिक व वैविध्यपूर्ण लेखणीचे स्वागत व अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

सौ.स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक,कवयित्री,लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles